शब्द मी आहे असा....!

............................................
शब्द मी आहे असा....!
............................................

अर्थ माझा लावण्याचा यत्न साऱ्यांनीच केला!
शब्द मी आहे असा की, जो कुणालाही न गेला!

मी कवी झालो कशाला, कैकदा वाटून गेले...
शेवटी माझा कडेला जन्म कवितेनेच नेला!

पावलांनी या मनाचे ऐकले नाही कधीही....
हा जरासुद्धा न थांबे आणि रस्ताही हटेला!

खेळ काही चाललेला अंगणी जाई-जुईचा...
अन् तिथे ओठंगलेला तारकांचा एक झेला!

रोजच्या घायाळ खिंकाळ्या विचारांच्या नकोशा...
रोज आकांतामुळे त्या सुन्न मेंदूचा तबेला!

राहिले बाकी तरीही आठवांचे थेंब काही....
रिक्त होईना मनाचा पालथा घालून पेला!

रोज तो कोठे न कोठे भेटणाऱ्यांनाच भेटे...
वाटते काही जणांना, तो कवी केव्हाच मेला!

- प्रदीप कुलकर्णी

............................................
रचनाकाल ः १० एप्रिल २००९
............................................