आमची हुरडा पार्टी ..

योंदाच्या पारीला तरी व्हुरडा खावायला येनार नव्हं ताई बाई ? अशा लाडिक आर्जवानं कोणीही विचारलं की मी लहानपणी सदैव हुरडा खायला तयार असायची.. हुरडा  म्हणजे ज्वारीची कणसे चांगली भाजून रगडून त्याचे हिरवट दाणे गुळ आणि लसणाच्या चटणी बरोबर खाणे.. खरे तर मटकावणे ..
तर असा हा हुरडा पार्टीचा सगळ्यांचा दिवस ठरला की तो उगवेपर्यंत मला लहान असताना चैन पडायचं नाही, त्यामुळे तो दिवस उद्यावर आला कीच बहुधा मला सांगण्यात येत असावं. आमच्या ओळखीच्या एक आजी होत्या. त्यांच्या शेतावर हुरडा खाण्याचं निमंत्रण असायचं.. साधारण ४ -५ कुटूंबांचा ग्रूप असे. त्यामुळे १०-१२ पोरे कायम ठरलेली असायची. आमचा छान कंपूच झाला होता.. त्यांचं कळमणकर हे आडनाव त्यांच्या कळमण या गावामुळे त्याना मिळालं होतं हे प्रकरण लहान असताना जरा मजेशीरच वाटत असे मला.

साधारण रविवारी पहाटे जाण्याचे ठरवले जायचे, सुट्टीचा दिवस असूनही मला आठवतय पहाटे मी सर्वात आधी उठायचे. एरवी कधी ही लवकर न ऊठणारी आणि दहादा हाका मारायला लावणारी मी कुठे ट्रिप ठरली की लवकर ऊठून आंघोळ करून तयार असायचे. आमच्या घरी तांब्याचा बंब होता अर्थातच इलेक्ट्रिसिटी वर चालणारा, तो पहाटे साडे चार पासून ऑन व्हायचा. बाथरूमला भल्या मोठ्या गजाची एक छोटी खिडकी वरच्या बाजूस होती , बहुधा पुर्वी बंबात लाकुडफाटा जाळल्यानतर धूर जाण्याची व्यवस्था केलेली असावी .. पण नंतर लाकुडफाट्या एवजी इलेक्ट्रिसिटी वर चालणारा बंब आल्याने धुराची भानगड नव्हती , त्यामुळे आता त्या खिडकीला टिपीकल स्पिंग असलेला फुलाफुलांचा पडदा लावलेला होता. तरी त्यातून पहाटे च्या गार वार्याचे झोत अंगावर येत असत आणि त्या गुलाबी थंडीत आंघोळीच्या दगडावर बसून बंबाच्या गरम पाण्याने अंग धुवायला फार छान वाटत असे. विशेषतः दिवाळीत तर या सर्वांच्या जोडीला "ऊटणे" आणि "मोती" (साबण त्यातही "गुलाब" फेवरिट )असायचे, आणि बाहेर जोराने वाजणारे फटाके... दिवाळीची मजा काही औरच असते नाही?

तर अशा सर्व लहान सहान गोष्टीन्मधील मोठ्या मोठ्या मजा अनुभवून मी तयार होऊन बसत असे. माझ्या मित्रमैत्रिणींची वाट पाहत.. साधारण साडे सहाला सगळे आमच्या घरी जमा होत, सकाळी सकाळी सगळ्यांच्या गप्पा सुरू होत असत, लगेच वयाप्रमाणे ग्रुप जमायचे, आया काकवा लगेच "खाण्या पिण्याच्या काय काय गोष्टी आपण आणल्या आहेत " यापासून ते हळू हळू "कुलकर्णी वहिनींकडे जुनं पानं आहे म्हणे त्यामुळे त्या आल्या नाहीत हो.." वरती कधी येत असत त्यांचं  त्याना ही कळत नसे. एखादेवेळी एखादी वडिलधारी बाई, रेड लेबल टी बॅग्स आणि साखर वगैरे घेतली आहे का बरोबर हे कंफर्म करून घेत असत म्हणजे दुपारच्या चहाची ही सोय झालेली आहे हे नकी..
तिथून मग कळमण ला जाणारी बस पकडायला आम्ही सर्व निघत असू. बस मध्ये बचे कंपनीच्या अंताक्षरीला जोर येई, खरे तर ऊत हा बरोबर शब्द असावा. कळमणला बस पोचली की ३ -४ बेलगाडया येत असत आम्हाला न्यायला, मग कळमणकर आज्जी जातीने सगळी गडी माणसे कशी आहेत यांची  चोकशी करत असत.

बैलगाडी तून जायला तर अफलातून मज्जा येत असे. बैलाची शेपटीने मला एक दोन वेळा हलकासा प्रसाद दिलेला आहे. पण बैलगाडी हाकणार्या गड्याजवळ बसायला हवं असेल तर तो माफक प्रसाद सर्वानाच आवडायचा. बैलाला आम्ही ही "चक चक" असे जोर जोरात म्हणत असू आणि मग सर्व बैलगाड्यात एक प्रकारची शर्यतच लागत असे, तुम्ही पुढे का आम्ही पुढे वगैरे उल्हासित उद्गार काढत आम्ही कधी शेताजवळ येउन पोचायचो ते कळायचेच नाही.
साधारण अकरा वाजत आलेले असायचे आणि पोटात भुकेने कावळे कोकलायला लागलेले असायचे. शेतावर गडी लोकांची ३-४ खोपटे असायची त्यात नक्कीच एखादा पाळणा आणि एक रांगतं तर एक कडेवर असा त्यांचा संसार असायचा, गड्याची बायको मोठ्ठा तांब्या, भांडी, एखादी सतरंजी  आणून देत असे. तोवर च्यावम्याव म्हणून खायला गडी कोवळे हरभरे, हिरवे टोमॅटो, बोरे असा हरभरा माल आणून देत असत.

मग एखाद्या मस्त डेरेदार झाडाखाली आमच्या सर्वांची पथारी पसरत असे.पाय सोडून बसून विहीरीचे थंडगार पाणी पिऊन जरा खाऊ तोंडात टाकला की कमालीचे फ्रेश वाटायला लागे की पोरे लगेच हुंदडायला सुरू करत. मग कोठे चिंचा पाड, नाहीतर आवळे शोधत बस , बोरे चाख तर कधी एखाद्या माहिती देणार्याच्या मागे लागून कच्ची वांगी कशी असतात ते बघ, पालेभाज्या कशा येतात ते बघ असले उद्योग करायला आम्ही मोकळे होत असू.

साधारण साडे बाराला मग आम्ही बॅक टू सतरंजी येत असू, तोवर शेजारी एक खोल खड्डा केलेला असे आणि त्यात निखारा पेटवून ठेवलेला असे, शेजारी हा कणसांचा भला मोठा ढीग रचला जायचा. आणि एक एक करून ती भाजायला निखार्यात मातीखाली ठेवली जायची. ती भाजून होईपर्यंत सगळ्यांचे घरून आणलेले डबे रिकामे केले जायचे, ठरवून कोणी गूळ कोणी शेंगादाणे चटणी तर कोणी लसणाची चटणी, कैरीचं केप्र वगैरेचं लोणचं  आणायचे. सोबर पोळी, धपाटे ,धिरडी , पराठे, थालीपीठं, भाकर्या असेही अगणित प्रकार आणायचे. कोणी दही, लोणी आणायचे, मग तो सगळा सरंजाम मध्ये ठेवून भोवताली सगले लोक मस्त गोल करून बसायचे आणि केळीच्या पानावर नाहीतर कधी पेपर वर मस्तपैकी थाळी सजायची. सोबत ज्वारीची कणसे चांगली भाजून रगडून त्याचे हिरवट दाणे म्हणजेच "हूरडा" गुळ आणि लसणाच्या चटणी बरोबर असायचे. कधी कधी वांगी, टोमॅटो ही त्या निखार्यावर भाजून खाल्ले जायचे , शिवाय आम्ही जमवून आणलेला चिमणखाऊ असायचाच चिंचा बोरे आवळे वगैरे..मला त्यावेळी नव्यानच धपाटे आवडायला लागले होते. धपाटे लसूण चटणी आणि दही एकदम सॉलिड कॉंबिनेशन असायचे, सोबत हुरडा आणि गूळ ही मला खूप आवडत असे. तेव्हढ्यात गड्यांच्या बायका गावरान वांग्यांची फर्मास गरम गरम भाजी करून आणायच्या, मग काय भाकरी आणि भरली वांगी सगळे तुटून पडायचे. शेवटी मस्त खमंग फोडणी दिलेला दहिभात असायचा, शिवाय थंडगार ताक. त्यामुळे इतके स्वादिष्ट जेवण होई की बस..पोट टम्म फ़ूगे.

मग दुपारी गडी माणसांचे जेवण असे, मला लहानपणी आणि आत्ताही गम्मत वाटते त्याना हरीगडी किंवा कुशागडी याच नावाने संबोधले जायचे .. आम्ही त्याना काका वगैरे म्हणायचो. तर हे लोक चांगलेच राकट होते, त्यांच्या हाताला हुरडा भाजताना चटका कसा बसत नाही असे मी त्याना विचारायचे, त्यांचे हात आणि पायही दणकट आणि मातीत काम केल्याने रापलेले असायचे, हे लोक एकवेळी ४ पोळ्या पानात घ्यायचे मग ४ धपाटे , ४ थालीपीठं असाच मामला असायचा. चटणी तर सरळ मूठीनेच वाढली जायची . चिमूटभर खातानाही माझी तिखट लागून गाळण उडत असे तर हे लोक काय राक्षस आहेत का काय असे वाटायचे. पाणी सुद्धा  पिताना सरळ तांब्या ऊचलून तोंडाला लावत.

मग सगळे जरा वेळ वामकुक्षी घ्यावी असा विचार करत असतानाच कोणीतरी पत्ते काढायचं आणि एक एक करत सर्वांचीच झोपमोड होत असे आणि मस्त मैफल जमायची. ती संपायची जेव्हा कोणीतरी चला अता चहा घेऊन निघायला हवे असा सूर काढायचं..
चहासाठी मोट्टं भांड खोपट्यातूनच घेत असू . तो करायला मात्र तीन दगडांची चूल मांडायला लागत असे. तो फार म्हणजे फारच आवडता भाग असे. मग विहीरीच्या पाण्याचा घरून आणलेल्या साहित्यात फक्कड चहा बनवीत असत, गोठ्यातील गायीचे काढून ठेवलेले दुध मिळे आणि गाळायला एखादं स्वच्छं कापड.
त्या चहाला वेगळीच गोडी असायची. वाह! तरतरीत होऊन विहीरीवर हात पाय धुवून घरी जायला सगले सज्ज होत असत. आम्हाला मात्र वाटे की तिथेच अजून काही दिवस थांबावे पण शेतावर जमा केलेला चिमणखाऊ शाळेतल्या दोस्त लोकाना द्यायचाय या कल्पनेनं मग आम्हाला काढता पाय घेता येत असे. असा हा अवर्णनीय आनंद सोबतीला घेऊन आम्ही घराकडे निघायचो ते पुढच्या वर्षीच्या थंडीची वाट बघत...

अमेरिकेत ऍपल किंवा चेरी पिकींग ला जाऊया का? असा आमचा विचार सुरू झाला आणि  मला आमचे हुरडा पिकींग आठवले म्हणून हा लेखप्रपंच .....
ऍपल किंवा चेरी पिकींग ला गेलो तर नक्कीच ती मजा ही लिहायचं ठरवत आहे : )