हिरो हिरालाल, मोबाईल व स्वच्छतागृह प्रकरण

आमचा ७-८ मित्रमैत्रिणींचा कंपू महिन्यातून एकदा तरी एकत्र भेटायचा प्रयत्न करतो. कधी कट्ट्यावर बसून चणेफुटाणे खात, रस्त्यावरच्या लोकांवर शेलक्या प्रतिक्रिया करणे, तर कधी एखादा पिक्चर टाकणे किंवा मनमुराद भटकून एखाद्या छानशा रेस्टॉरंटमध्ये चापून पोटपूजा करणे आणि मस्त पान चघळत जगाच्या घडामोडींवर सणकून टीका करणे असे आमचे टवाळ उद्योग नित्यनियमाने चालू असतात. त्यांतून आम्ही सगळे एकमेकांना गेली ८-१० वर्षे ओळखत आहोत. त्यामुळे आपापसांतील उखाळ्यापाखाळ्या, चेष्टा-विनोद यांना तर आमच्या भेटींमध्ये विशेष स्थान! कोणी ह्या संमेलनास उपस्थित राहिले नाही की त्यांची जाहीर हजेरी ठरलेलीच... म्हणूनच घाबरून का होईना, सगळेजण धडपडत-तडमडत आपापली तोंडे दाखवण्याचा यथाशक्ति प्रयत्न करतात.
तर असेच आम्ही कँपात एकत्र भेटलेलो... पुण्याच्या एम. जी. रोड्वर सायंकाळी जी तरूणाईची उत्फुल्ल गर्दी असते ती न्याहाळण्यात आमच्या मित्रमंडळींना विशेष रस! म्हणूनच की काय, आमचे एक मित्रवर्य आपली मान अक्षरशः १८० च्या कोनांतून गर्र गर्र फिरवत ''अरे, कसली फिगर आहे राव! ''..... ''एकदम नंबर वन! "..... "मस्त रे! " अशा आम्हांला सवयीच्या आणि म्हणूनच कोणी फारसे लक्ष न दिलेल्या प्रतिक्रियांनी स्वतःचेच मनोरंजन करीत आमच्याबरोबर चालत होते. त्यांना अशा वेळी रस्त्यावरच्या रहदारीचे बिलकुल भान नसते, त्यामुळे त्यांना ढकलत ढकलत चालणे किंवा चालत चालत ढकलणे अशी कर्तव्ये आम्हालाच पार पाडावी लागतात.
दुसरे वीर म्हणजे एकदम हिरो हिरालाल! दिसायला एखाद्या मॉडेलसारखे देखणे... त्यांचा मोबाईल सतत त्यांच्या स्त्री चाहत्यांच्या कॉल्स ने खणखणत असतो. त्यामुळे एक कान मोबाईलला चिकटलेल्या अवस्थेतच ते आमच्याशी गप्पा मारतात. त्या दिवशीही आमचे हिरो मोबाईलवर गूढगुंजन, कुहूकूजन करण्यात गर्क होते. फिरून फिरून भुका लागल्यामुळे आम्ही रस्त्यावरच्या एका स्मार्ट ए. सी. रेस्टॉरंटमध्ये घुसलो. पहिले मित्र 'हिरवळ' पाहण्यांत दंग तर आमचे हिरो मोबाईलवर बोलण्यात!
भुकेने पिट्ट्या पडलेला असल्यामुळे आम्ही ऑर्डरी देऊन भराभर पोटपूजा आटोपली. हिरोंनी बोलण्याच्या नादात बर्फाळ पाणी जास्त प्यायले आणि खाल्ले कमी... परंतु आम्ही सर्वांनी कमालीच्या सूज्ञतेने ही बाब हिरोंच्या ध्यानात आणून दिली नाही. आखिर दोस्तीके नाते हमारा भी कुछ फर्ज बनता है। हँ, हँ, हँ!!!
असो. तर आमचे देखणे मित्रवर्य हिरो हिरालाल जशी बिल द्यायची वेळ आली तसे मोबाईलवर बोलत बोलतच जागेवरून उठले, वेटरला जवळ बोलावून त्यांनी 'करांगुली'निर्देशानेच त्याला स्वच्छतागृहाविषयी विचारले. वेटरनेही हात उडवीत स्वच्छतागृहाच्या दिशेने मान उंचावली व तो आपल्या कामाला निघून गेला. हिरो हिरालाल मोबाईल एका कानाला चिकटवून 'त्या' दिशेने जाऊ लागले. वाटेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या टेबलवर चार सुंदर रमणी गप्पा- हास्य - विनोद करीत बसलेल्या हिरोंच्या 'अँटेना'ने टिपल्या. मग तर काय, उगीच केसांतून हात फिरवत, कपडे ठीकठाक करीत हिरोंनी नेहमीचे इंप्रेशन मारण्याचे रुटीन सुरू केले. आम्ही हा संपूर्ण सोहळा खुदखुदू हसत बघत होतो. आमचे हिरो मित्र मोबाईलवरून आपल्या मैत्रिणीशी बोलत बोलत, समोरील सुकन्यांवर इंप्रेशन पाडण्यात एवढे गर्क होते की ते चुकून 'जेंटस' ऐवजी चक्क 'लेडीज' मध्येच घुसले! ते आत शिरले मात्र आणि मगाच्या टेबलवरून हास्याचा एकच फवारा उसळला. आम्हीपण सगळेजण हसू कसेबसे दाबत आमचे मित्रवर्य परत यायची वाट बघत होतो. फार काळ थांबावे लागले नाही. काहीच सेकंदांत आमचे हिरो मित्रवर्य तीरासारखे बाहेर आले आणि आमची वाटही न पाहता ''मी बाहेर थांबतोय" असे पुटपुटत तडक रेस्टॉरंटबाहेर पडले. आता मात्र आम्हांला हसू आवरेना.... अगदी पोट धरधरून हसत, अक्षरशः एकमेकांच्या अंगावर कोसळतच आम्ही बाहेर आलो व गोऱ्यामोऱ्या मित्राच्या पाठीत थापा, गुद्दे हाणत "आज अशी कशी वाट चुकलात राव! " करून त्याला भरपूर चिडवून भंडावून सोडले. ती सायंकाळ आमच्या द्रुष्टीने अविस्मरणीय ठरली. ह्या सर्वाचा परिणाम? आमचे 'हिरो' मित्र काही फारसे बदलले नाहीत.... फक्त त्यांनी तातडीने 'हॅंडस फ्री' विकत घेतला! आम्हांला मात्र हिरोची चेष्टा करायला एक नवा विषय मिळाला!