ठेव दरवाजा खुला...

जाहले आहे गझल, मी भेटणे म्हणजे तुला
भंगणे सानी, मनाचे भाळणे मिसरा उला

मी कधी वाईट ठरतो, चांगला ठरतो कधी
माणसाचा जन्म म्हणजे कागदाचा चौफ़ुला

दूरदेशी बातमी आली, तडकली वैभवे
'सोडताना जीव आई बोलली - ये रे मुला'

शेत हे आयुष्य आहे, माणसे बुजगावणी
प्राण आहे मुक्त वारा, वाहतो तोवर डुला

छापकाटा चालला आहे नशीबाचा तुझ्या
हेलकावे खात आहे रोज स्वप्नांचा झुला

हेच होते शेवटी जे आज माझे जाहले
एवढा हासू नकोरे आज आलेल्या फुला

मी तुझ्यापाशी पुन्हा येईन भूषण शेवटी
एवढा वाईट नाही, ठेव दरवाजा खुला