कोण आपणहून आले

कोण आपणहून आले, आणले गेले किती ?
काय कोणाला इथे, जगले किती, मेले किती

दंग रसपानात जे त्यांना कुठे कळले कधी ?
उमलण्याआधी इथे कोमेजले झेले किती

जी शिळा होऊन पडली तीच केवळ जाणते
स्पर्श कुठला पतित-पावन, मोह जडलेले किती

वस्त्र अतिथीचे टिपे निशिगंध वस्तीची नजर
लाज कोणी सोडली, संकोच ल्यालेले किती

द्वैत-अद्वैतात जेव्हा रंगतो कलगी-तुरा
पावती तादात्म्य मग शालू किती, शेले किती

तोबरा भरुनी मतांचा पिंक जो तो टाकतो
लावुनी जातो चुना; असले इथे ठेले किती?

अमृताचे थेंब थोडे देउनी गेलीस तू
दाखवू, साकी, कसे हृदयी रिते पेले किती?

कैक स्वामी अन् बुवा, बापू नि श्री श्री पाहिले
धर्म जगलेले किती अन् फक्त पढलेले किती...?

बोलणे, भृंगा, असे पूर्वी रुदन रानातले
लाभले संन्यास घेता भक्तगण, चेले किती !