रेडा...

कुणाची ही अदाकारी? कुणाची ही कलाकारी?
कुणाच्या रंजनासाठी युगांची चालते वारी?

स्वतःला 'मी' न समजावे असे सांगीतले आहे
कुराणे, बायबल, गीता, विनोदी पुस्तके सारी!

"भरारी घे, कुणाला छाट, अंती छाटला जा तू"
"नशीबाचा असे मांजा, पतंगा, काळ ही आरी"

यमाचा वेगळा, ज्ञानेश्वरांचा वेगळा रेडा
तसा होतोस तू मित्रा जसा लाभेल रंगारी

मिळावे घास थोडेसे, सुखाची झोप लागावी
जवानी याच चिंतेने बनावी जख्ख म्हातारी?

बरे झाले अताचे भक्त नाही पाहिले त्याने
पुन्हा होईल संसारी, तुका होईल व्यापारी

इथे आलोच आहे तर जिवाची जिंदगी व्हावी
कशाला आठवावे मी कसा होतो सदाचारी?

मला पश्चात माझ्या फारसे काही नको आहे
निघावे नाव थोडेसे, गळावी आसवे खारी

दुटप्पी धोरणांची इंद्रिये मिळतात साऱ्यांना
विवेकी वागताना होत जाते वासना भारी

जगाला नोकरी माझ्या चुकांची नोंद घेण्याची
पगारी ठेवली आहे मनाची सुन्न बेकारी