मेकींग ऑफ शेवंतीका

"शेवंतीका" चा सेट
कोणीतरी म्हणालं "अरे डायरेक्टर आले!!! "

"अरे तो नवीन लेखक आला का? "

"हा सर मी आलो!!! "

"तुम्ही???? ह्या अवतारात??? "

"काय झालं सर?? "

"मला वाटलं की तुम्ही कुर्ता पायजमा घालून, फ्रेंच दाढी ठेवून याल!!! तुम्ही चक्क जीन्स-टी शर्ट मध्ये आलात!! पुढच्या वेळेस नीट कपडे घालून या!! "

"सॉरी सर!!! "

"बरं बरं!! ठीक आहे!! तुमच्या आधी जो लेखक होता तो नुकताच वरती गेला!! आता तुमची पाळी, म्हणजे लिहायची. त्याने ४९८ भाग केलेत!! तुम्हाला आत उरलेले ५०२ करायचे आहेत. शेवंतीका बघितली आहे का? "

"हो सर, नुकतेच ३-४ भाग बघितले!! "

"मग हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जास्त काही सांगावं लागणार नाही. ४९९ लिहायला सुरुवात करा. पेन आणला आहे का? "

"नाही सर!! "

"म्हणजे तुम्ही बीना वस्तऱ्याचे न्हावी!! ए पप्पू, ह्या जावेद अख्तरला पेन आणि एक दोन कागद दे आणि त्या कोपऱ्यात बसव!! आणि ती शेवंतीका आली का? "

"आल्या आहेत सर त्या तिकडे बसल्या आहेत!! "

"तिथे कोणीतरी आजीबाई बसल्या आहेत. "

"त्याच आहेत सर जिजाउच्या सेटवरून इकडेच आल्या आहेत. म्हणतंय की परत जायचं आहे. "

"असं आहे होय!! ए जावेद अख्तर!! त्या शेवंतीकेला १५-२० भाग रोल द्यायचा नाही!! काय? "

"पण सर मालिका तर त्यांचीच.... "

"ते तू नको सांगू. मी सांगतो तसं कर!!! दामिनी मेल्यावर तिची सिरीयल ५ वर्ष चालली. आणि हो, त्या सुयश जळपडेला हिंदीत काम मिळालं आहे!! त्याला ३-४ एपिसोड मध्ये मारून टाकायचा!!! समजलं? "

"हो सर!! "

"जा आता ४९९ लिहून आण. "

"चला रे ४९८ चं शूटिंग सुरू करा!! पाहिला शॉट. सैपाकघरात सून असणार. तिथे सासू येणार. सूनबाई, तुम्ही भूत बघितल्यावर जसं दचकाल तसं दचकायचं!! दोघांवर कॅमेरा ७-८ वेळा क्लोझप घ्यायचा. समजलं का? चला करा सुरुवात!! "

शॉट ओके होतो.

"सर ४९९ लिहून आणला. बघा!! "

"हम्म!! "

"अरे काय लिहिलं आहे हे? अरे येव्हढ्या वेगात गेलास तर ६०० भाग सुद्धा होणार नाही. १० भाग एकात लिहिले आहेस. जा ह्याचे १० भाग करून आण!! "

"चला रे दुसरा शॉट रेडी करा. " शॉट रेडी होतो.

"हा. आत सासूबाई सुनेला म्हणतील 'मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे, ' तू लगेच आता ही जीवच मागणार असा चेहरा करायचा. परत ७-८ क्लोझप. मग तू विचारायचा 'काय? ' मग सासूबाई म्हणतील  'कढई! ' मग तू खरंच जीव मागितल्यासारखं चेहरा करायचा. बस्स!! "

२-३ टेक मध्ये शॉट रेडी होतो.

"हां!! अरे कॅमेरा किती मिनिट झालेत? "

"सर पंधरा!! "

"म्हणजे संपत आला की एपिसोड!!! आता एकच शॉट. उरलेल्या जाहिराती.. अरे जावेद किती झालं? "

"झालं सर!! "

" अरे वा!! दहा कागदांवर दहा एपिसोड!!! भले शाबाश! असंच लिहीत राहा. आता दहा दिवसांनी तोंड दाखवा. "

"बरं सर!! "

"चला रे पुढचा शॉट मोलकरणीवर. तिला रेडी करा. "

"सर ती तयार नाही. ती म्हणते की तिला डिझाईनर साडी हवी आहे. ती म्हणते की सगळ्या चांगल्या साड्या नेसतात, मग मीच का नाही नेसायच्या! "

"ती पण चांगल्या साड्या नेसते ना!! प्रत्येकावेळी नवीन साडी असते ना! बोलवा तिला. "

'मोलकरीण' येते.

"जाऽऽऽनू!!! कीत्ती क्यूट दिसतो तू. हाऊऽऽ आर यू?? "

"मी ठीक आहे डिअर. तू कशी आहेस.? "

"मी जाम अपसेट आहे!! बघ ना!! मला डिझाईनर साडी नेसू देत नाहीये. "

"जान अगं मोलकरीण डिझाईनर साडी कशी नेसेल? "

"सो व्हॉट जानू? तिचा वाढदिवस असेल तर? "

"बरं माझी आई नेस ती साडी. "

"मी काई तुझी आई नाही होणारे!!! "

"बरं बरं इथे प्रेम नको. चल तयार हो. शॉट घ्यायचा आहे. "

शॉट एकाच टेक मध्ये 'ओके' होतो.

"कॅमेरा झाले का वीस मिनिट?? "

"पर्फेक्ट सर!! "

"चला संपला ४९८. चला रे पॅकप करा. पॅऽऽऽऽऽकऽऽऽऽप्प!!! "