सोहळा

खेळ प्रेमाचा असा हा आगळा
सावजाला पारध्याचा कळवळा


युद्ध ठरले एकतर्फी आपले
आयुधांनी सज्ज तू, मी कोवळा


रोजचे घायाळ करणे हे तुझे
वेदनेचा रोज माझ्या सोहळा


शोध तू क्लृप्त्या नव्या, नखरे नवे
जून झाला लाजण्याचा सापळा


त्याच त्या देऊ नको तू वंचना
मी न उरलो आज भोळा-बावळा


तू रुसावे ह्याचसाठी छेडतो
लागला समजावण्याचा मज लळा


हाच कारावास दे आजन्म तू
बांधुनी तू ठेव मजला आंचळा


साधुया अद्वैत दोघे जीवनी
अर्चनेचा मार्ग येथे ओवळा