माझी मराठी फिल्लमबाजी

मराठी चित्रपटांना येणारी सध्याची दूरावस्था लक्षात घेता, मराठी चित्रपट उद्योगाचे पूनरज्जीवन (खरे तर पूनरुत्पादन, पूण्यवचन असे भारी भरकम शब्द आठवत होते. पण त्यातल्या त्यात अधिक अगम्य शब्द लिहीलाय  ) आम्हीही मायबोली मंडळाच्या वतीने मराठी चित्रपट काढायचा योजला आहे. कथानक तयार आहे. फक्त अर्थ पूरवठा (सरकारी अनूदाना व्यतीरिक्त) आणि प्रेक्षक पूरवठा झाला की चित्रपट लगेचच मूक्त (रीलीज हो) करू. बाकी कार्य सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ आहेतच
.............
(चित्रपटातील पात्र आणि घटणा (१९५० सालची नाय काय) पूर्णतहा काल्पनिक आहेत. तसले काही साम्य आढळल्यास आ. बू. दो. स किंवा मा. बू. दो. स )
.............
आमच्या कथेत श्री गणपा पाटील म्हणून एक सधन पाटील कूर्डूवाडी (खूर्द बर बूद्रूक नव्हे) मध्ये वास्तव्य करतात. ह्यांच खर नाव 'गणपत' आहे पण आपण त्यांना गणपा म्हणूया (गणपत म्हटल तर कोणी त्यांना 'दारू आण' म्हणून सांगेल ही भीती. तसेच 'गणपत पाटील' म्हटल तर एक विशीष्ठ 'व्यक्तीरेखा' डोळ्या समोर उभी राहते. म्हणूनच गणपा पाटील कस छान वाटत). तर ह्या गणपा च्या पत्नीच नाव रखमा. रखमा म्हण्जे यकदम हूबेहूब मधू कांबीकर आणि रंजनाच मिश्रण. सकाळी भाकऱ्या आणि दूपारी पोरांना बडवणारी गृह-कर्तव्यदक्ष अशी भारतीय नारी. ह्या जोडप्याला बघा ३ पोर. आता दोन पोर असली की एक हवालदार होणार दूसरा चोर होणार. मग दोन भावांच्या मध्ये भिंत उभी राहणार. एकाच्या हातून दूसरा मरणार. त्यापेक्षा ३ पोर बरी. तीघही जगतील सुखात. तर ह्या तिघांची नाव विटू, शिरपा आणि भैरू. (खर तर आम्ही राज, प्रेम आणि राहूल अशी 'चालू' काळातली नाव देणार होतो. पण मराठी प्रेक्षकांना काहीतरी आवर्जून वेगळ द्यायच म्हणून तो मोह टाळला. पण त्या सुप्रसिद्ध चित्रपटातला कुप्रसिद्ध संवाद थोडासा बदलून ' पाटील आडनाव तो सूना होगा' असा थोडासा बदलून देणार आहोत).
.............
आता रखमा आपल्या तिन्ही पोरांना बडवता बडवता गाण शिकवत असते. पूढे मागे पोर हरवलीच तर गाण्यावरून तरी ओळखता येतील हा दूरदर्शीपणा त्यामागे असतोच.
रखमा "विटू तू डाक्टर व्हायच बर. "
विटू चड्डी वर ओढत " जो आग्या माताश्री" (हा बी आर चोप्रांचा महाभारत इफेक्ट)
रखमा "आणि तू र भाड्या शिरप्या. तू इंजीनेर"
शिरपा " माये भूक"
रखमा " गूनाचा माजा पोर. शिक्षनाची भूक लागली नव्ह. शिक शिक शिकून मोटा मानूस हो"
शिरपा एकापायार दूसरा पाय आपटत राहतो
रखमा " आन भैरू तू कोन होनार? "
भैरू चा आभ्यास यकदम पक्का असतो " माय मी हिन्स्पेक्टर"
" मढ बशीवल रे तूझ मेल्या. आर मूडद्या तू हिन्स्पेक्टर नाय व्ह्यायच बाबा. तू व्हायच क्रिकेटीर. म्होप जाय्राती करायच्या. आय पी यल खेलायच काय समजलास?
चला आता गाण्याची वेळ झाली चला चला बीगी बीगी"
.............
तर आता ही पोर तरणी होतात. रकमाचे २ केस पांढरे होतात. गणपा 'ओसरी' वरून 'तसबीरी' मध्ये येतो. रखमा पाणावलेल्या डोळ्यांनी फोटू बगत बसते जूना फ्लॅश बॅक काढत राहते. तिन्ही पोर गावभर उंडारून येतात. जेवायला बसतात. गाण म्हणत म्हणत जेवतात.
" बेटा ही शेवंती कोन हाय? "
विटू चपापतो " कोन शेवंती गो माये? "
" आर तूझ्या. आता सांगतो का बऱ्या बोलान? "
" माये ती त्या माळ्याची पोर "
" मग आण की तीला यकदा घरी? "
" माय तूला ती पसंद हाये? "
" तर मग "
"आपल्या खानदानच्या इज्जतीत बसते? "
"तर"
"माये तू किती चांगली हायेस. मला वाटल तू रागावशील का काय माळ्याची पोर करतो म्हणून"
" तू मेल्या ७ वी पास तूला आता काय ती दिपीका पडूकोन मिळणार काय रे माकडा "
.............
विटू आणि शेवंती मळ्यात भेटतात. विटू न शेवंतीला आनंदाची गोष्ट सांगीतलेली असते आणि शेवंती पदराशी चाळा करत असते आणि विटू मिशीतल्या मिशीत हसत असते (आठवा मांडरे बंधू पैकी कोणी एक. किंवा अरुण सरनाईक. रवींद्र महाजनींना मिशी नसल्याने त्यांचा येथे विचार करण्यात आलेला नाहीये. क्षमस्व). इतक्यात...
गूलाबाचे ताटवे, प्रणयात गूंतलेले पक्षी (वातावरण निर्मीती हो दूसर काय बी नाय ) आणि प्रणय गीत सुरू.....
.
(चाल कॅश मधली ' यु माय माईंड ब्लोईंग माहीया. )
.
टींग टींग टीडीक टींग टींग टीडीक टीडीक टीडीक टींग टींग टीडीक
कस्स सांगू मी माझ्या बा ला की तू माजा राजा राजा राजा
घालेल फावड तो तूझ्या डोसक्यात तो आहे सणक्या सणक्या
आर आर मूडद्या सोड माजा हात आस करशील तर फूटतील माझ्या बांगड्या
आय यम मैंड ब्लोइंग शेवंता आय अम मैंड ब्लोवींग शेवंता
यू म्माय मैंड ब्लोवींग शेवंत्या यु माय मैंड ब्लोवींग शेवंत्या

क्रमश....

(चू भू द्या घ्या )
****
शेवंत्याच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण तीच्या बापाला लागते. शेवंताचा बाप म्हणजे यकदम निळू फूले स्टाईल (माळी नव्ह तो बी). भरगोस मिश्या, ब्येरकी (नवटाक मारलेले) डोळ्ये आन प्रत्येक वाक्याची सुरूवात 'च्या तिच्या मायला' अशी. शेवंताची माय फोटूत हार घालून टांगलेली. निळू फूले म्हणल्यार 'एक गाव बारा भानगडी आलच की वो'  
" शेवंत्ये शेवंत्ये हे आमी काय ऐकतोय? "
" काय झाल अप्पा? "
" ही असली थेर आमच्या घरात कदी कुणी केली न्हाईत"
एक कॅमेरा आईच्या फोटोवर. ढॅण्ण..
"... "
" समद्या गावात आमची छी थू होतेय नव्ह. आज तूझी माय असती तर तीला काय वाटल असत? "
पून्हा एक कॅमेरा आईच्या फोटोवर. तिन्ही कोनातून ढॅण्ण ढॅण्ण ढॅण्ण...
" ते काय नाय आजपासून तूझ घरातन बाहेर निगण बंद"
शेवंती रडत, दूड दूडत खोलीतल्या पलंगावर पडते. करुण वाद्य संगीत. (म्हंजीच हिमेश भाऊच कुटलही गाण चालल)
..............
शेवंताची आत्या (इंदिरा चिटणीस) ही कायम देवघरात बसलेली असते नायतर चूली पूढ हीच तीची दोन घर. माळ ओढत 'देवा क्रुष्ण राया तूच आता रक्षण कर रे बाबा' अस काहीस पुटपूटत असते. ही पैल्यांदाच आपल 'घर' सोडून ओसरी वर येते भावाला समजावते
" आर बापू अस वागून कस चालेल"
" आक्का तू मला काय बी सांगू नग"
" अरे आज कालच्या जमानात हे अस्च असत बघ"
"तूला काय ठाव अक्का? "
" तर रे ते सीरीयलीत असच दाखवतात ना"
"म्हंजी तू आस्था चॅनल न बघता स्टार प्लस बगतेस" (बा चा चेहेरा 'आजी म्या ब्रम्ह पाहीले असा)
" आता ते म्हत्वाच हाय का "
"बर राह्यल "
" तिच्या मनात तो पाटलाचा थोरला लेक आहे म्हण. "
" च्या तिच्या मायला. स्टार वर पण बातमी आली काय शेवंत्याची? "
" आर नाय र बाबा. तो नान्या बोललेला माग मला"
"आस्स"
" आर होऊन जाऊ दे बाबा तिच्या मना सारख "
" ठीकाय तू यवढा आग्रह करतेस तर. बोलाव तीला"
(पार्श्वसंगीत वेरी हॅप्पी इन माय हार्ट दील डांस मारे रे)
..............
दोन नंबरचा (म्हणजी भावंडात हो) शिरपा, शेतकी महाविद्यालयात जातो. गाणी म्हणायला, नाचायला (जमलच तर शिकायला). कॉलेजातला पैला दिस. कॉलेज म्हणजे ते फराह खान च्या चित्रपटातल. सर्कशीतल्या पोरी रिबीनी आणि रस्त्यावर सिग्नल वर विकायला येतात तशी 'कृत्रीम फूल' उडवत नाचताहेत. सतीश शहा, बोमन इराणी सारखे प्रोफेसर आणि बिंदू, अर्चना पूरणसिंग (आहा SSSSS) सारख्या प्रोफेशरीण वेडेवाकडे (म्हणजे नेहेमी सारखेच) चेहेरे करत बागडताहेत. बहूदा ह्यांचाही कॉलेजचा पैला दिवस असावा असे. आता हे सगळे काय शिकवत असतील हा प्रष्ण आहे. पण आपल्याला काय्य करायचय? तर आमचा शिरपा बूक सांभाळत कॉलेजात शिरतो. समोरच पोरींचा घोळका. त्यामध्ये एक पोरगी पाठमोरी. आता हीच आपली (आपली म्हणजे शिरपाची) हिरवीण हे प्रेक्षकांनी ओळखल असेलच. जोरात वाऱ्याचा झोत येतो आणि हिरवीणीची पूस्तकातली पान उडत उडत ( पहिल्याच दिवशी पान फाटली मग वर्ष भर कस काय वापरणार पूस्तक. वर रीफंड पण मिळणार नाय ) शिरपाच्या पायशी. हिरवीण लाजत मुरडत, चश्मा सांभाळत पान वेचतेय शिरपा तिला मदत करतोय (बॅक ग्राउंड या बाई या या बाई या शिरपाच्या पायाकडे पान वेचूया). दोघांची यकच नजरानजर आणि प्रथम दर्शनी प्रेम (कॉलेजात आल्याच सार्थक)
..............
(गाण क्रांतीवीर मधल 'मी पाहील तूझ्या डोळ्यांच्या थ्रू)

मी पाह्यल तूझ्या डोळ्यांच्या थ्रू
ज्या दिवशी झाल कॉलेज सुरू
कधी १०१ कधी १०२
तेंव्हापासून झाला खर्च सुरू
ना बघ मला अशी वेडी वाकडी
तूझा मेकअप वाटे मला बेगडी....

(पान संपतात आणि गाणही)

क्रमश.....
.
(चू भू द्या घ्या )

****
तीन नंबरचा भैरू हीन्स्पेकटर/ क्रीकेटीर न होता तात्या मास्तर चा अशीष्टंट बनून राहीला. तात्या मास्तर म्हणजे पूर्ण वेळ नाटक (म्हनजे रंगभूमीवरच हो) आणि फावल्या वेळात मास्तरकी करणारा एक जीव. ह्यांची पूर्ण हयात शाळेतल्या पोरांना अभ्यास आणि रंगभूमीवरच्या पोरांना अभिनय शिकवण्यात गेली. इतका कसलेला दिगदर्शक की शाळेतली पोरही न सांगता शिकण्याचा उत्तम अभिनय पार पाडत. मास्तरच्या पोरीच नाव रूक्मी. हीच आमच्या भैरूची हिरवीण (आठवा कच-देवयानी). आता हेच नाव भैरूच्या मायने धारण केलेल आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखल असेलच. पण लग्नानंतर आम्ही पोरीच नाव बदलणार आहोत त्यामूळे चिंता नसावी. लोभ असावा. आमचा हा भैरू अश्या ह्या मास्तरचा चेला. भैरू ची अंगकाठी सडपातळ आणि तलवार कट मिश्या (अगदी तरुणपणीच्या विक्रम गोखलेंसारख्या). मास्तरांच्या आग्रहाखातर आणि रुक्मीच्या हट्टाखातर कधी कधी स्टेजवर कामचलावू भूमिका निभवी. कधी तो पंख्याने वारा आणि डास उडवणाऱ्या दासीचे (स्त्री-पार्टी बर) काम करी, तर कधी 'कोण आहे रे तिकडे' वाल्या 'तिकडे' च. कधी लढाईत 'पून्हा पून्हा' मरणाऱ्या सैनीकाच.
......................
मास्तर सध्या भरपूर कामात आहेत. सध्या ते गणपतीचा कार्यक्रम म्हणून 'महाभारत' नावाच नाटक बसवताहेत. मास्तरांना वास्तववादी नाटकाचा भारी सोस आहे. शक्य असत तर त्यांनी गांधारीला, १०० कौरव, एक कौरवी, १ धृतराष्ट्र ह्यांच्या साठी चूलीसमोर बसून भाकऱ्या बडवायला लावल्या असत्या. सकाळ पासून संध्याकाळ पऱ्यंत चूली समोर बसून भाकरी बडवणारी गांधारी ही अधिक वास्तववादी झाली असती अस त्यांच म्हणण होत. भैरूलाही सध्या भरपूर काम आहे. म्हणजे आपल्याला कंपनीत क्लोजींग च्या वेळेला जेवढ काम असत ना तेवढ. मास्तरांना श्वास घ्यायला फूरसत नाही. भैरू सगळ्यांना त्यांच्या आकार मानानूसार आणि जमलच तर भूमिकेनूसार कापड चोपड मिळतय ना हे बघतोय. 'चकण्या' रंग्या शिंपी नाटकात 'धृतराष्ट्राची' भूमिका मिळण्याच्या बोलीवर सग़ळ्या पार्ट्यांना मोफत कपडे पूरवण्यास तयार झालाय. 'चकण्या' रंग्याला ही भूमिका ज्याम पसंद आहे. शून्यात बघत तो आपले संवाद आठवून आठवून म्हणतोय. पण नाटकाच्या २ दिवस आधी एक गडबड झालीये द्रौपदीच काम करणारी 'सखू' कुंभारीण शहरातल्या ड्रायवरचा हात धरून पळून गेलीये. त्यामूळे रुक्मीच्या हट्टा पायी आता द्रौपदीची पार्टी आता आपला भैरू निभावणार आहे. मिशी न कापता तोंडावर पदर घेऊन तो ती भूमिका निभावणार आहे. नाटक उद्यावर आलय. पण भैरूचे संवाद तोंडपाठ आहेत त्यामूळे चिंता नाही.
.....................
.
नाटकाचा दिवस उजाडलाय. आज सकाळ पासून पोर -टोर, बाया-बाप्ये, म्हातरे-कोतारे आणि उरलेले इतर हे सगळे जण खूप खुशीत आहेत. इतके दिवस बहूचर्चीत असलेला 'महाभारत' नावाच्या नाटकाचा आज प्रयोग आहे. आजच्या प्रयोगाच्या यशावर हा प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर न्यायचा का हे मास्तर ठरवणार आहेत. रात्री जेऊन खाऊन मंडळी नाटक बघायला आले आहेत. नागू पैलवान (भीम) सत्तू लोहार (धर्म), लखू कासार (अर्जुन) आणि मास्तरांच्या शाळेतले सलग ३ वर्ष मास्तरांबरोबर एकाच वर्गात बसणारे म्हमदू आणि दत्तू हे अनूक्रमे नकूल आणि सहदेवाच्या भूमिकेत आहेत. बरोबर भैरू (द्रौपदी) आणि इतर नेहेमीचे यशस्वी कलाकार आहेतच. खुद्द मास्तर विंगेत तळ ठोकून आहेत. स्टेजवर नारळ फोडून नाटकाची सुरूवात झालीये. एक एक पात्र रंगमंचावर येऊन आपला परिचय करून देतोय. फक्त एकच गडबड झालीये आज भिमाचा आवाज बसलाय आणि अर्जुन ओरडून ओरडून आपले संवाद म्हणतोय आणि नकूल सहदेव हे दिवसभरच्या श्रमामूळे निजेला आलेत नव्हे निजलेत.
......................
.
दूर्योधन: चल धर्मा एक डाव होऊन जाऊ दे
धर्म: नाय रे हल्ली मी खेलत नाय रे. त्यामूळे टच मध्ये नाय ( हे मास्तरांचे वास्तववादी संवाद )
दूर्योधन: अरे मी पण सध्या प्लस मध्ये नसतो रे ( दूर्योधन पण भूमिकेच बेयरींग सोडत नाय)
भीम (बसक्या आवाजात) : नाय दादा नाय असला अविचार करू नका
अर्जुन (दणदणीत आवाजात): दादा असे भरीला पडू नका.
(नकुल सहदेव अति श्रमांमूळे पेंगताहेत त्यामूळे नकूल सहदेवाच्या संवादाच्या वेळी दोन मोठ्ठे पॉज)
.
संवादाला जोर यावा म्हणून अर्जुन मोठ्या आवाजात 'हूंकार' भरतो. आणि जोरजोरात शड्डू ठोकतो. पण त्याच्या बारकाश्या अंगकाठी मूळे तो पेहेलवानी न दिसता 'हीव भरून' थडथडल्या सारखा दिसतो. अर्जूनाच्या अंगात भीमाची भूमिका शिरलीये त्यामूळे भीम आपल वजन एका पायावरून दूसऱ्या पायावर आणि 'बेगडी' कागद लावलेली गदा एका खांद्या वरून दूसऱ्या खांद्या वर अस काहीस करत राहतो.
.
त्यातच द्यूताचा डाव लागून धर्मराज (नेहेमी प्रमाणे) सर्व संपत्ती, बांधव हरतो. आणि शेवटी द्रौपदी (पक्षी भैरू) पणाला लाउन हरतो. दूर्योधन दू:शासनाला ' द्रौपदी ला भर सभेत घेऊन ये' अशी आज्ञा देतो. दू:शासन द्रौपदी च्या केसांना धरून फरफटून घेउन येतो. ह्या द्रुश्यात कधी नाही ते द्रौपदी (भैरूने तोंडावर पदर घेऊन मिश्या लपवल्या मूळे) बूरखा घेतल्या सारखी दिसते. दू:शासन द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यास सुरूवात करतो. ह्यावेळी साडी गेली तरी चालेल पण चेहेऱ्यावरचा पदर ढळता कामा नये म्हणून द्रौपदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असते. इतक्यात प्रत्यक्ष महाभारतात न घडलेली अशी एक अचाट घटना घडते. दू:शासनाने 'धीरे का झटका जोरसे' दिल्या मूळे म्हणा किंवा साडी पायात अडकल्या मूळे म्हणा, कोणाला काय होतय ते कळायच्या आधीच द्रौपदी तोंडावरच्या पदरासकट आणि पायातल्या साडी सकट तोंडघशी पडते. आणि महर्षी व्यासांनी न कल्पिलेले, दिग्दर्शक तात्या मास्तरांनी न योजीलेले असे सूरस आणि चमत्कारीक असे 'अलौकीक शब्द' द्रौपदीच्या तोंडून बाहेर पडतात. ते शब्द रंग्या शिंपी (पक्षी ध्रूतराष्ट्र) आणि 'धुसमूसळे पणाने' साडी खेचणारा दू:शासन ह्यांना उद्देशून असतात. प्रत्यक्ष महाभारतात जर असे 'शब्द' द्रौपदीच्या तोंडून जर बाहेर पडत तर पुढचे महाभारत नक्की टळले असते. सभा संपते तरी नकूल-सहदेव झोपलेलेच. शेवटी दूर्योधन आणि दू:शासन अनूक्रमे नकुल आणि सहदेव यांना त्यांची झोपमोड न करता स्टेजवरून उचलून घेऊज जातात आणि प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्यांच्या गजरात तात्या मास्तरांचे हे 'वास्तव वादी' महाभारत 'अति-वास्तववादी' होऊन संपते. आणि नाटकात खरा भाव खरा भाव खाऊन जातो तो आपला भैरू.
.
(काही अपरीहार्य कारणामुळे आमचा ह चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही)

खी टॉकीज. खी खीळ्यातलाअ खी खीरीतला