मिश्याऽऽऽऽऽ

सकाळी सुमारे ७:३० वा. गजर वाजतो. त्यामुळे रोहितला जाग येते. रोहित हा एक सर्व साधारण मुलगा आहो. जो एका नामांकित कंपनीत काम करतो, शनिवार रविवार सुट्टी घेतो. म्हणजे तुम्हा आम्हा सारखाच. पण फक्त फरक इतकाच की तो मिश्यांवर जबरदस्त प्रेम करतो. आता पुढे, तो गजर बंद करतो. आणि आळस देत आरश्या समोर येतो. आता तुमच्या अंदाजा प्रमाणे तो दात घासेल, पण तो सर्वात आधी मिश्यांवरून हात फिरवतो आणि मग दात घासतो. दात घासून झाल्यावर स्वच्छ तोंड धुतो, पुनः मिश्यांवरून हात फिरवतो, एक रुबाबात मिश्यांना पीळ देऊन हळूच गालातल्या गालात हसतो. स्वतःचे आवरतो (अंघोळ करत नाही बरंका, नाक धरू नका मी आधीच सांगितले की तो तुमच्या आमच्या सारखा आहे, जर तुम्ही रोज अंघोळ करत असाल तर तोही नक्कीच करेल) आणि घरातून बाहेर पडतो.

     एकदम रुबाबात रस्त्याने निघालेला आहे, त्याच वेळेस एका पारावर एक ३० - ३५ वर्षांचा माणूस दाढी करत बसला आहे. त्याच्या मनात विचार चालू आहे की 'मिश्या काढू की नको? ' त्याच वेळेस रोहित तेथे येतो, त्याला लगेच समजते की त्या माणसाच्या मनात काय चालू आहे. रोहित त्या माणसाकडे बघतो आणि फक्त मिश्यांचा पीळ कडक करतो. त्या माणसाला काय समजायचे ते तो समजतो आणि मिश्या काढायचा विचार मनातून काढून टाकतो. रोहित फक्त हसतो आणि पुढे चालू लागतो.

     आता रोहित एका केशकर्तनालया पाशी आला आहे. आत दुकानात जातो आणि खुर्चीवर बसतो. लगेचच रव्या येतो. रव्या म्हणजे रोहितचा वर्ग मित्र आणि त्या दुकानाचा मालक कम न्हावी. "काय रोह्या बऱ्याच दिवसांनी चक्कर मारलीस दुकानात, काही विशेष? " रवी म्हणाला. "काही नाहीरे असच" रोहित. "हा..... सहज म्हणजे मिश्या काढायला आलास ना? बरं झालं तू स्वत: आलास, नाहीतर मीच येणार होतो, डायरेक्ट सपाट करायला" हे बोलत असतानाच रवीचा वस्तरा रोहितच्या मिश्यांकडे सरसावला, हे बघताच रोहित फक्त नजरेनेच रवीला धोक्याचा इशारा देतो. रवीलाही आपली चूक कळते कारण दोघेही एकत्र मोठे झालेले असतात. रवी मग काहीच न बोलता रोहितचे केस कापतो.

     रोहित रवीला धडा शिकवून आता घरी निघाला आहे. चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आविर्भाव. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो. "रोहित, किती वाजले? आज तू मला सारस बागेत भेटणार होतास, सकाळी ९ वाजता" कविता (अर्थात रोहितची प्रेयसी). "अग, पण आता फक्त ८ वाजले आहेत..... " रोहित. "नेहमी सारखा उशीर करु नकोस, मी पण आवरते आणि निघते. बाय.......!!! " रोहित फोन ठेवतो आणि समोर बघतो तर एक ३० - ३१ वर्षाच्या काकू त्याच्या मिश्यां कडे एटकक बघत असतात. रोहित ओशाळतो आणि घरी येतो.

     आता जवळ जवळ ८ वाजून ४५ मिनिटे झाली आहेत. आणि त्याची अंघोळ सुद्धा झाली आहे.  आता तुम्ही म्हणाल हा एवढ्या वेळ काय करत होता? तर कसे आहे त्याला फक्त अंघोळीला अख्खा पाऊण तास लागतो, कारण तो अंगा साठी आणि केसांसाठी एकच साबण वापरतो आणि मिश्यांसाठी वेगळा पण महागातला. तसेच तेलाचेही म्हणजे डोक्याला हा साधे खोबऱ्याचे तेल लावतो आणि मिश्यांना मात्र डाबरचे बदामाचे तेल. आणि आता केसांचा भांग पाडल्यावर मिशांचा नको का पाडायला? म्हणून हा पाऊण तास. हे असे मिश्यांवरील सोपस्कार संपल्या वर एक घोट 'चहा' नको का घ्यायला? म्हणून चहा. पण चहा पिताना मिश्या खराब होतील म्हणून..... म्हणून 'स्ट्रॉ' बरंका. पण हे सगळे करताना त्याला वेळेचे भानच राहत नाही. रोहित घड्याळात बघतो तर काय ९ वाजून ३० मिनिटे.........

    रोहित आता सारस बागेत आला आहे. नेहमी प्रमाणे कविताही रुसून, चिडून बसली आहे. आता जेव्हा एखादी प्रेयसी चिडते तेव्हा भांडणे पण व्हायलाच पाहिजेत, त्या प्रमाणे भांडणं होतात. "रोहित तुझ्या ह्या मिश्यां पेक्षा तुला जगात काहीच महत्त्वाचे वाटत नाही करे? मला तर वाटत तुझं माझ्या वर सुद्धा प्रेम नाही, मीच आपली वेड्या सारखं तुझ्या वर प्रेम करते, पण तुला त्याचं काही नाही. ते काही नाही, आज सोक्ष मोक्ष लावूनच टाकायचा, एक तर तू माझ्यावर प्रेम नाही तर तुझ्या मिश्यांवर. तुझ्या मिशी आजकाल मला मला माझी सवत वाटायला लागली आहे. आणि उत्तर मला आज-आता-ताबडतोब पाहिजे आहे" कविताची शब्द रूपी तलवार थांबते आणि इतका वेळ शांत बसलेला रोहित तळपतो व लगेच एक घाव दोन तुकडे करतो, "मिश्या". हे ऐकताच कविता रागाने निघून जाते. रोहितही तिला थांबवायचा प्रयत्न करीत नाही.

    आता संध्याकाळ झाली आहे, तो मुळा-मुठा नदीच्या काठी बसून शांतपणे विचार करीत बसला आहे. आपण काय गमावले, काय मिळवले यांची बेरीज वजाबाकी मनाच्या कागदावर करत आहे. शेवटी त्याला वजाबाकीचे उत्तर मिळते. आणि तो कोणतेही भान न ठेवता जोरात ओरडतो, "नाही!!!!!!!! मी एकवेळ तुला सोडेन पण माझ्या मिश्या कापणार नाही. " लगेच भानावर येतो. आजूबाजूचे 'याच्या वर कोणी भानामती केली आहे का?' या नजरेने बघत असतात. शेवटी बाहेरच जेवण करून घरी परततो. आणि कमाल म्हणजे त्याला लगेच झोपही लगते.....त्याला एक सुंदर स्वप्न पडते. तो एका वडाच्या झाडांच्या बागेत फिरतो आहे, मोठ्या वडाच्या झाडांमधून खाली आलेल्या पारंब्या त्याला त्याच्या मिशी प्रमाणे दिसत आहेत. हां तिथे काही लहान वडाची झाडेही आहेत, ती त्याला त्याच्या 'लवांची' (कोवळ्या मिश्याची) आठवण करून देत आहेत. एका वडाखाली सकाळी भेटलेला माणूस मिश्यांना तेल पाणी करत बसला आहे, आणि अचानक समोरून कविता रवीला घेऊन येताना दिसते, रवीच्या हातात गवत कापायची कात्री आहे आणि कविता कडे खुरप. दोघं त्याच्याच दिशेने येत आहेत. रोहित पळण्याचा खूप प्रयत्न करतोय पण त्याला पळता येत नाही. शेवटी ती दोघं त्याला पकडतात. रवी, "मला तुझ्या सारख्या मिश्या नाहीत म्हणून नेहमी चिडवयचास ना, घे मग...... " रवी त्याची अर्धी मिशी कापतो. कविता, "ह्या मिशी मुळे तू मला सोडलंस ना, घे मग..... " तेवढ्यात गजर वाजतो, 'टरररररररररररररर'. रोहित घामाघूम झालेल्या अवस्थेत जागा होतो, पळत पळत आरश्या समोर जातो, बघतो तर काय? मिशी............ शाबूत आहे....... घड्याळात बघतो, ७ वाजलेले असतात. दात घासतो, त्या नंतर बरेच काही करतो, फ्रेश होतो म्हणजेच अंघोळ करतो. आणि बरोबर ९ वाजता सारस बागेत जातो. कविता तिथेच बसलेली असते, कविता, "रोहित!!!!!! तू.... तू.... तू माझ्या साठी तुझ्या मिश्या काढल्यास? थॅक्यूऽऽऽऽ"

लेखन - प्रसाद वैद्य.

९९२३४२०९९६