चीझी गोल्डन पोटॅटो रोस्ट

  • अर्धा कप घेवडा चिरून, वाफवून
  • ३-४ बटाटे उकडून, साली काढून
  • पाव कप स्वीट कॉर्न दाणे वाफवून
  • पाव कप किसलेले गाजर वाफवून
  • चीझ किसलेले / चीझ स्प्रेड/ चीझ स्लाईसेस ४-५
  • चवीनुसार मीठ, मिरपूड, लाल तिखट
  • १ चमचा लोणी
  • व्हाईट सॉस साठीः १ कप दूध, १ टेबलस्पून मैदा/ तांदळाचे पीठ
  • १ टेबलस्पून लोणी
२० मिनिटे
२ जणांसाठी

प्रथम व्हाईट सॉस करण्यासाठी पॅनमध्ये मंद आंचेवर लोणी वितळवावे. त्यात तांदळाचे पीठ/ मैदा घालून रंग बदलणार नाही इतपत परतावा. त्यात कोमट दूध थोडे थोडे घालून सतत ढवळत राहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. वाटल्यास थोडेसे पाणी घालून दाटसरपणा कमी-जास्त करावा. हा सॉस जरा घट्ट होऊ लागला व उकळी आली की गॅस बंद करावा.

ह्या व्हाईट सॉसमध्ये वाफवलेला घेवडा, स्वीट कॉर्न, गाजर, चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घालून त्यांचे सारण तयार करून घ्यावे.

उकडलेल्या बटाट्यांचे प्रत्येकी दोन तुकडे करावेत. ह्या अर्ध्या बटाट्यांच्या आतील भाग पोखरून घेऊन त्यांत खळगे तयार करावेत. व्हाईट सॉसच्या सारणात पोखरलेल्या बटाट्याचा भाग घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. आता प्रत्येक पोकळ बटाट्यांत हे सारण भरावे. वर किसलेले चीझ घालून ते जरा दाबून बसवावे म्हणजे बटाट्याचे तोंड बंद होईल. किंवा चीझ स्लाईसेस वा चीझ स्प्रेडने प्रत्येक बटाटा सीलबंद करावा.

पॅनमध्ये थोडे लोणी सोडून त्यांत हे बटाटे मंद आंचेवर सोनेरी-तांबूस परतावेत. परतताना चीझचा भाग तव्याला लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. चीझी गोल्डन पोटॅटो रोस्ट तय्यार! वाढताना बटाट्यांवर मीठ, मिरपूड/ लाल तिखट भुरभुरवून द्यावेत. गरम-गरम किंवा गारही छानच लागतात. ( तव्यावर परतण्याऐवजी मायक्रोवेव्ह मध्ये ट्रे ला थोडा लोण्याचा हात लावून बेक करता येतात. )

पोळी/ फुलका/ ब्रेड बरोबर खायला मस्त! किंवा नुसतेही खायला छान लागतात.

चवीला अतिशय सौम्य व चटकन पोट भरणारा खाद्यप्रकार!

माझे किचनमधील प्रयोग