धाडू नको बाजारी !

             खरेदीचा तिटकारा हा गुण माझ्या आईकडून माझ्या रक्तात उतरला असावा.दारावर येणाऱ्या मोळीविक्याकडून बरीच घासाघीस करून मोळी किंवा बोहारणीकडून आमचे जुने कपडे देऊन एकादेदुसरे भांडे घेण्यापलिकडे काही बिचारीच्या खरेदीची मजल गेली नाही.त्यातही पैसे मोजून घेण्याचे किंवा देण्याचे काम आम्हा भावंडांनाच करावे लागे.त्यालाही एक कारण होते.त्या काळी मुलींच्या हातावर पैसा पडणे ही गोष्ट अशक्य कोटीतीलच ! एकदा जन्माच्या कर्मी बिचारीला तिच्या आजीने बक्षीस म्हणून दिलेली पावली म्हणजे आजचे पंचवीस पैश्यांचे नाणे घेऊन ती सगळा बाजार फिरली आणि काय घ्यावे याचा निर्णय करता न करता आल्यामुळे तिन ती आपल्या नऊवारी लुगड्याच्या कडोसरीला  लपवून ठेवली आणि ती अगदी अचूकपणे माझ्या विधवा आत्याच्या नजरेस पडली.ही आत्या म्हणजे वडिलांची मोठी बहीण,तिच्यासमोर बोलण्याची त्यांचीही प्राज्ञा नसे मग आईला तर तो विचारही करणे अशक्य,अशात तिचा हा अपराध ,  मग काय विचारता,"आता काय अनुसया (माझी आई)स्वत:कारभार करू लागली ती आता आम्हाला काय विचारणार " असा इतका त्रागा आत्याने केला की त्यापुढे शाहूमहाराजानी स्वतंत्र कारभार सुरू केल्याबद्दल ताराबाई राणीसाहेबांनी केलेला त्रागाही फिका पडाबा.त्यामुळे संत तुकारामानीसुद्धा निदान दुकान चालवण्यासाठी तरी पैशाला हात लावला असेल ( हा उल्लेख समस्त वारकरी परिवाराची क्षमा मागून) पण त्या माउलीन मात्र त्यानंतर पैशाला कधी हात लावण्याचा आणि कसल्याही खरेदीचा व्यवहार करण्याचा अपराध केला नाही.
       माझ्या बाबतीत मात्र असे काहीही न घडताच खरेदीविषयी असलेले  माझे वैराग्य हा कदाचित माझ्या आळशी स्वभावाचाच भाग असावा.आमच्या गावात जो आठवडी बाजार भरायचा त्यातसुद्धा बाजारात मोकळ्या पिशव्या घेऊन जाणे आणि आमच्या व्यवहारचतुर भगिनींनी त्या भरून दिल्या की "फोडिले भांडार धन्याचाच माल  मी तो हमाल भारवाही"अशा नि:संग वृत्तीने त्या खांद्यावरून घरी आणून देणे आणि आईच्या ताब्यात देणे एवढीच आमची म्हणजे माझी आणि माझ्या धाकट्या भावाची-( त्यानेही अगदी लक्ष्मणासारखा वडील भावाचाच आदर्श समोर ठेवला होता) भूमिका असे.आपण काय आणि कोणत्या भावाने आणतो याविषयी आम्ही इतके अनभिज्ञ असायचो की.त्यामानाने कापूस आणि मीठ पाठीवरून वहाणारी इसापाची गाढवही जरा जास्त जाणीवपूर्वक  माल वहात असतील.पण त्यामुळे आम्हाला काहीही वस्तु खरेदी करून आणायला सांगण्याचे धाडस कोणी करत नसे. नाही म्हणायला वडिलांना दिवसातून एकवेळा लागणारे भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या उंटछाप विडीचे एक बंडल आणि त्याच्याकडे अधून मधून येणाऱ्या मित्रासाठी पिवळा हत्ती सिगारेट पाकीट या दोन वस्तूंची खरेदी मात्र करायला वडिलांना आमच्यापैकी कोणीही चालत असे.सुदैवाने त्या खरेदीचा चोरून उपभोग घेण्याचा मोह आम्हाला कधीच झाला नाही त्याचेही कारण खरेदी केलेली वस्तू ज्याच्यासाठी असेल त्याला एकदाची देऊन मोकळे होण्याची आमची वृत्तीच !
     मध्यंतरीच्या काळात महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात एकटा राहू लागल्यावर खरेदीतील हा माझा अनुशेष भरून काढण्याची संधी जरी मला प्राप्त झाली होती.तरी त्यासाठी लागणाऱ्या दामाजीपंतांची मेहेरनजर आमच्यावर नसल्यामुळे आणि  तशाही अवस्थेत जी काही आवश्यक खरेदी असे तीही पुण्यासारख्या शहरात करायची पाळी आल्यामुळे "आधीच उल्हास तशात फाल्गुनमास" अशीच परिस्थिती होती.आज पुण्याच्या बाजारपेठेत फिरणाऱ्यांना मी ज्याकाळचे वर्णन करत आहे त्यावेळच्या अतिउच्चसंस्कारित विक्रय तज्ञांची कल्पना करता येणेही जरा कठीणच आहे.आताही त्याचे काही सन्माननीय अवशेष पहायला मिळतात पण ते बरेच दुर्मीळ झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही.
       त्याकाळात पुण्यातील बाजारपेठेत व्यापार म्हणजे अगदी नाइलाजाने करावयाची गोष्ट असे मानणाऱ्या दुकानदारांचाच
जास्त भरणा होता.त्यामुळे पुण्यातल्या बाजारपेठेतील विक्रेते ग्राहकावर आपला कमीतकमी वेळ कसा जाईल याबाबतीत इतकी दक्षता घेताना दिसत की वेळ आणि हालचाल (time and motion)याचा अभ्यासक गिलब्रेथ याने पुण्याच्या बाजारपेठेचा फेरफटका मारला असता तर आपल्या एक डझन मुलांना वेळेचा जास्तीतजास्त कसा सदुपयोग करावा याचे धडॅ देण्यात आपला वेळ आपण उगीचच वाया घालवला त्याऐवजी त्यांना पुण्याच्या बाजारात  पाठवून द्यायला हवे होते असे त्याला वाटले असते .
          टिळक आगरकरांची तत्वपालनाविषयीची आग्रही वृत्तीही विक्रेत्यांच्या अंगी पूर्णपणे बाणली असल्यामुळे  आपल्याला काय हवे याची ग्राहकाला पूर्ण कल्पना असायला हवी असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे साडीच्या दुकानात गेल्यावर ग्राहकाने नुसते " साडी दाखवा " म्हटले तर हमखास "कसली हवी ?" हा प्रश्न विक्रेता विचारणारच. कारण याविषयी ग्राहकाने पूर्ण विचार करूनच आपल्या दुकानात पाऊल टाकायला हवे अशी त्याची इच्छा असे.   आपल्याला हव्या असणाऱ्या साडीचा रंग,पोत,काठाची आणि पदराची नक्षी याची किंवा छापील म्हणजे प्रिंटेड साडी हवी असेल तर छपाईत कोणते रंग, किती फुले,किती पाने प्रति चौरस सेंमी मध्ये असावीत याची पूर्ण कल्पना ग्राहकाला असायलाच हवी किंवा शर्ट किंवा पॅंटसाठी कापड हवे असेल त्यावर डिझाइन कशा प्रकारचे व रंगाचे हवे त्याचे साद्यंत वर्णन ग्राहकाने करावे आणि आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी दुकानदाराची अपेक्षा असे. यामागे साड्या किंवा कापडाचे तागे काढण्या आणि परत ठेवण्यात वाया जाणारा बहुमोल वेळ वाचवणे हाच साधा हिशोब असे.
       या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग हे दुकानदार  सामाजिक कार्यात म्हणजे भारताचे आर्थिक धोरण आणि त्याचे जगावरील परिणाम किंवा जागतिक मंदी आणि त्याचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम किंवा सामाजिक क्रांती अशा गहन  विषयावर चऱ्चा करण्यासाठी  करत आणि या चर्चेमध्ये ते इतके रंगत की कापड मोजतानाही ती चर्चा  बंद करणे त्याना मानवत नसे त्यामुळे ते आपल्याला हवे तेच आणि तेवढेच कापड देतात की नाही यावर आपल्यालाच डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागे.कापड फाडताना त्यांचा आवेश आपण प्रतिपक्षाच्या मताच्याच चिंधड्या चिंधड्या करत आहोत असा असे.
        विक्रेत्यांच्या या काटेकोरपणामुळे आणि माझ्या मुखदुर्बळपणामुळे बूट खरेदी करायला गेलेला मी बुटाबरोबर चपलाची जोडी पण खरेदी करून दुकानाबाहेर पडलो आहे असे होण्या ऐवजी विक्रेत्याने दाखवलेल्या कमीतकमी बुटांच्या जोडीमधूनच आपल्याला खरेदी करणे भाग आहे या कल्पनेने एकादी डगळ बुटांची जोडी गळ्यात पडल्याने त्यात कागदाचे पॅकिंग घालून आणि तरीही बूट पायातून निसटतात की काय या भीतीने हळूहळू चालणे किंवा फार घट्ट बूट गळ्यात पडल्यास ते घालून लंगडत चालणे किंवा ते बूट चावल्यामुळे झालेल्या जखमांमुळे अनवाणीच चालावयास लागणे अशाही संकटात सापडलो होतो.
       लग्नानंतर अर्थातच खरेदीचे खाते माझ्यावर सोपवण्यात आले नाही कारण त्यामुळे हव्या त्या वस्तु हव्या त्या वेळी घरात येणार नाहीत याविषयी गृहखात्याची खात्रीच असावी.त्यामुळे मी माझी नेहमीचीच दुय्यम सहाय्यकाची भूमिका इमाने इतबारे बजावत असतो. मात्र त्यामुळे एक महत्वाचा तोटा असा होतो की कधी कधी गृहखात्याने एकाद्या वस्तूच्या खरेदीविषयी असमर्थता व्यक्त केल्यास खरेदीसाठी तज्ञ व्यक्तीची नेमणूक करणे भाग पडते.घरगुती तज्ञ माझ्या  शत्रुपक्षातले म्हणजे  बायकोचे नातेवाईक असतात पण त्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी मात्र माझ्यावर असते. हा प्रकार कालिदासासारखे आपण झाडाच्या ज्या फांदीवर बसलो ती आपल्याच हाताने कापणे (तेही अगदी समजून उमजून) त्यातलाच प्रकार !
       या तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याविषयी माझा अनुभव काही फार उत्साहवर्धक नाही.त्या/तिच्या सल्ल्याने खरेदी करण्यात आलेली वस्तु हमखास खराब निघते किंवा बिघडते. पण तज्ञ व्यक्तीची नेमणूक  ती वस्तू का बिघडली किंवा ती बिघडण्यामागे आमचाच कसा हात आहे याचे विश्लेषण करण्यासाठीच असल्यामुळे   त्यांच्यावर टीका करणेही शक्य नसल्याने मीरेप्रमाणे हसत हसत हा विषाचा
प्याला प्यावा लागतो. त्यामुळे झालेला गोंधळ जरी मला निस्तरावा लागला नाही
तरी होणारे नुकसान मात्र घरंदाज घराण्यातील सुनेसारखे ( ही वस्तु दूरदर्शन
मालिकात मुबलक प्रमाणात दिसू लागली आहे)निमूटपणे सोसावे लागते
         मात्र ज्या पुण्याने माझ्या खरेदीतील अरुचीला जास्तीत जास्त खतपाणी घातले त्याच पुण्यात आज परिस्थिती बरीच सुधारलेली दिसते. कौंटरवर कापडाचे शेकडो तागे किंवा साड्या पडल्या आहेत तरीही समोरील पुरंध्री स्वत:च्या चेहऱ्याची घडी अजिबात बिघडू देत नाही पण त्यामुळे नाउमेद न होता पहिल्यापेक्षाही अधिक उत्साहाने आणखी तागे अथवा साड्यांचे ढीग हसतमुखाने काढणारा किंवा काढलेल्या ढिगातील खालून दुसरी किंवा तिसरी (हे या स्त्रियांच्या बरोबर कसे लक्षात रहाते हे त्यांचा निर्माताच जाणे ) साडी परत एकदा दाखवा या विनंतीला मान देताना तिची मानच चिरून टाकावी अशी मनातील तीव्र इच्छा लपवून ती आपल्याला एकादा गौरव पुरस्कारच देत असल्यासारखा चेहरा करून त्या ढिगात हात खुपसून बरोबर तीच साडी बाहेर काढणारा विक्रेता आपल्याला स्वप्नातच पहायला मिळेल असे मला वाटायचे पण ते आता प्रत्यक्षात उतरलेले दिसते.
      आता तर सगळीकडे अगदी मॉलामॉल झाल्यामुळे स्वत:च दुकानात हिंडून हव्या त्या वस्तु हातगाडीत टाकून बाहेर पडताना त्याची किंमत चुकती करण्याची पद्धत आपल्याकडेही बरीच रुजायला लागली आहे. त्यात हवी ती वस्तु न सापडण्याची एक किरकोळ अडचण असते पण त्यासाठीही त्यांचे सहाय्यक तत्परतेने मदत करायला तयार असतातच.हे लोक तर तुम्हाला खरेदी करायला लावण्याचा चंग बांधूनच बाजारात उतरले आहेत त्यामुळे एकावर एक (किंवा दोनसुद्धा )फुकट हा प्रकार इथेही रूढ झालेला आहे.इतक्या प्रलोभनामुळे तरी मी खरेदीचा आळस सोडेन असे वाटण्याचा काळ मात्र आता केव्हाचाच गेला आहे.मात्र याची पूर्ण कल्पना इतराना असल्याने "धाडू नको मज बाजारी " असे म्हणण्याची पाळी मात्र क्वचितच माझ्यावर येते.