... समाधी!

...................................
... समाधी!
...................................

पकडून उन्हाचा हात... निघालो आहे!
भेटेल मलाही रात... निघालो आहे!

प्रत्येक समुद्रातील परीला द्याया...
घेऊन फुले मी सात निघालो आहे!

होईल शहाणे कोण कुणाच्या मागे?
मी ठेच तरीही खात निघालो आहे!

रंगेल सुखांचा छान विडा रंगावा...
घेऊन व्यथांचा कात निघालो आहे!

माझे न कधी कळणार कुणाला गाणे...
मी मौन स्वरांनी गात निघालो आहे!

संपून तरी जाईन तिथे मी, किंवा -
-होईल नवी सुरुवात... निघालो आहे!

घेऊन समाधी दुःख कधी का संपे...
मी हेच बघाया आत निघालो आहे!!

- प्रदीप कुलकर्णी
................................
रचनाकाल ः २८ मे २००९
.................................