सौ. चा वाढदिवस..

सौ. चा वाढदिवस..

आज २९ मे.. म्हणजे आमच्या सौ. चा वाढदिवस.

तुम्ही म्हणत असाल.. 'वा!! काय छान नवरा आहे' बायकोचा वाढदिवस ह्याच्या बरोब्बर लक्षात आहे. कस काय जमते तुम्हाला?

खरं सांगायचं झालं तर तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागते, फार घोकमपट्टी केल्यावर हे लक्षात राहतेय.

मोबाईलमध्ये, पर्सनल लॅपटॉपमध्ये, ऑफीसकॉम्प्युटरमध्ये रिमांडर्स टाकून ठेवले आहेत (ज्या लोकांनी ह्या रिमांडर्स चा शोध लावला आहे त्यांना समस्त नवरा जमाती तर्फे कोटी-कोटी धन्यवाद.. असो). झालंच तर घरात असतील-नसतील तेवढ्या सगळ्या कॅलेंडर वर २९ मे कोरून ठेवली आहे. माझ्या मेंदूने जर मला ऐनवेळी दगा दिलाच तर हे सगळे मला आठवण करून देतील.

कधी-कधी तर मला अचानक रात्री जाग येते.. असे वाटते की मी बायकोचा वाढदिवस विसरलो की काय.. असो. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही दुसरे काहीही विसरा पण बायकोचा वाढदिवस विसरू नका. जगातले सर्व गुन्हे माफ पण हा गुन्हा नाही.

तुम्ही विचार करत असाल की.. 'हात तिच्या एवढंच ना!! ', पण नुसता वाढदिवस लक्षात ठेवून चालत नाही. तर दोघांनी 'पहिल्यांदा' केलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात असाव्या लागतात.

१. पहिली भेट 'कुठे' झाली.. जागा बिनचुकता दाखवता आली पाहिजे.. उदा: हॉटेल मध्ये कुठला टेबल होता हे बिनचूक दाखवता आहे पाहिजे. आठवत नसेल तर बायकोशी हुज्जत घालू नका.. अमेरिका जेवढ्या अचूकपणे ओसामालाही शोधू शकणार नाही.. तेवढ्या अचूकपणे बायको तो टेबल शोधून काढेल.

२. पहिली भेट 'कधी' म्हणजे वेळ लक्षात असणे आवश्यक. तुम्ही जर उशीरा(१-२ मिनिटे पेक्षा जास्त) पोहोचले असाल(ह्याचीच शक्यता जास्त आहे) तर दर वेळेस त्याचा उल्लेख करून माफी मागावी आणि सौ जर उशीरा(१-२ तासापेक्षा जास्त) आल्या असतील तर त्याचा उल्लेख टाळावा

३. पहिली भेट 'कशी' झाली.. म्हणजे भेट कोणी घडवून आणली... वगैरे (शक्यतो बायकोच्या माहेरच्या व्यक्तीला प्राधान्य द्यावे.. असो)

४. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे सौ. ने पहिल्या भेटीत काय घातले होते.. त्याचा रंग काय होता. हे सगळे लक्षात असणे आवश्यक.

तुम्ही म्हणाल या ४ गोष्टीचा वाढदिवसाशी काय संबंध?.. माझे एक स्पष्ट मत आहे.. "माणसाने युद्धासाठी सदैव तयार राहावे. " कोणावर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही.. असो.

तुम्हाला वाटत असेल झाला गढ फत्ते.. पण अजून महत्त्वाचा भाग म्हणजे.. "गिफ्ट".

तर  गिफ्टच्या बाबतीत खाली नमूद केलेल्या गोष्टी टाळाव्यात.

१. मागील कुठल्यातरी वाढदिवशी दिलेली भेटवस्तू पुन्हा देणे.. (तुम्हाला आठवत नसले तरी "शत्रू" प़क्षाकडे याची पूर्ण नोंद आणि पुरावा असतो. )

२. 'अग!! मागच्या महिन्यात तर साडी घेतली होती, म्हणून या वेळेस नाही आणली'.. हे वाक्य कुकिंग गॅस लीक झाल्यावर काडीपेटी जेवढ्या लवकर आग लावू शकते.. त्यापेक्षा कित्येक पटीने लवकर आग लावू शकते.

३. 'अग!! घाई-गडबडीत विसरलो.. आत्ता जातो.. '(... देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.. )

आता एवढे सगळे करूनही जर तुम्ही वाढदिवस विसरलात तर घाबरू नका. "शत्रू" प़क्ष तुम्हाला हिंट द्वारे एक संधी देणार. फक्त तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे.
खाली नमूद केलेल्या सर्व वाक्याचा अर्थ "तुम्ही माझा वाढदिवस विसरले आहात" असा होतो.
१. 'आज आपण बाहेरच जेवायला जाऊ या. तुम्ही लवकर या. '
२. 'आज जरा लवकर या ना ऑफीसमधून'
३. 'आज सकाळ पासून किती फोन येताय.. कंटाळा आला बाई फोन घेऊन-घेऊन'
वगैरे.. वगैरे... वगैरे...

असो.. माझा उपदेश पुरे झाला.. सगळ्या विसरभोळ्या नवरेमंडळीना..ऑल द बेस्ट!!!

पु. ल. देशपांडे नि दिलेला "उपदेश" नमूद करतो आहे

प्रसाद

(प्रवास..)