नफरत करनेवालोंके..

File:Johny Mera Naam 1970 film poster.JPG

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील काही अविस्मरणीय विनोदी नटांमध्ये माननीय श्री. देवानंदजी यांचे नाव घ्यावे लागेल. कारकिर्दीच्या पूर्वार्धातील त्यांचा तो केसांचा कोंबडा, त्यांची ती पक्षाघात झालेल्या तरसासारखी चाल, संधीवातावर उपचार म्हणून व्यायाम घ्यावेत तशी ती त्यांच्या सांध्यांची हालचाल वगैरे. 'पाकिटमार' मधल्या 'ये नयी नयी प्रीत है' या सुरेल गाण्यावर देवानंदजी स्प्रिंगच्या बाहुलीसारख्या हालचाली करतात. 'मुनीमजी' मधली गाणी बघताना तर हसू आवरत नाहीच, पण त्या गाण्यांच्या चित्रीकरणाच्या वेळी कॅमेरामन आणि सहकलाकारही हसून हसून खाली पडले असतील, असे वाटते.वर्षानुवर्षे फक्त सॅलडस खात राहिल्याने त्याने आपली कटी अगदी होती तशी राखली (त्याचे बुद्धीही अगदी होती तशी राहिली, हा त्यातला खेदाचा भाग! ) आणि पन्नाशीतही आपले देखणे रुप टिकवून ठेवले. (देवानंदचे वजन वाढले नाही, कारण त्याला क्रॉनिक आमांश आहे अशी एक फाजील वदंता आहे, पण ते सोडून देऊ! )
पण हा देवानंद हाच हिंदी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट हीरो. खराखुरा आणि एकमेव चॉकलेट हीरो. 'ज्युएल थीफ' मध्ये 'एक ऐसा हार पेश करुंगा जो आपके गले से लगकर हार नही बल्की जीत लगेगा'  हे तो असं काही म्हणाला की तनुजा राप्पकन त्याच्या प्रेमातच पडली. 'तू कहां ये बता' असं म्हणत त्यानं आवाहन केलं आणि सिमल्यातल्या थंड रात्री दरवाजा उघडून नूतन त्याला सामोरी आली.  'तीन देवियां' एकाच वेळी त्याच्या प्रेमात असणं शक्य आहे असं वाटावा तो देवानंद. सोनपापडीसारख्या साधनानं ज्याच्यासाठी 'तेरा मेरा प्यार अमर' अशी आळवणी करावी असा एकमेव देवानंद. अशा या देवानंदला काही मोजक्या चित्रपटांत त्याचाच भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी याच्या दिग्दर्शनाचा परीसस्पर्श झाला आणि देवानंद चक्क चांगले काम करून गेला. विजयानंद हा खरं तर एका वेगळ्या लेखाचाच विषय आहे.  गोल्डीने देवानंदमधले गुण ओळखले आणि त्याच्यासाठी अनुरुप अशा भूमिका लिहिल्या. गोल्डीच्या दिग्दर्शनाखालीच देवानंद ताब्यात राहिला, आणि म्हणूनच गोल्डी -देव या जोडीने काही फार मनोरंजक, फार वेगळे चित्रपट दिले. आर. के.  नारायणच्या कथेवर गोल्डीने 'गाईड' केला, ए. जे. क्रॉनिनच्या 'सिटाडेल' वर 'तेरे मेरे सपने' केला, बरीच उधार उसनवारी करून  'ज्युएल थीफ' हा भन्नाट प्रकार केला.  अशातलाच एक  तद्दन गुन्हेगारी मसालापट म्हणजे 'जॉनी मेरा नाम'. १९७० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट म्हणजे विजय आनंदच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाची, संवादलेखनाची, सर्व कलाकारांच्या अभिनयाची आणि गीत संगीताची जमून आलेली भट्टी. कोणताही सामाजिक संदेश नाही, कुठल्या प्रश्नाला हात घालणं नाही, काही नाही. फक्त करमणूक. शंभर टक्के अस्सल, निर्भेळ आणि दर्जेदार करमणूक. पण अगदी बांधेसूद आणि घट्ट पीळ असलेली करमणूक.
१९७० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही ताजातवाना वाटतो.हेमा मालिनी ही या सिनेमात केवळ - या शब्दाबद्दल माफ करा - 'चिकणी' दिसते. जुन्या जमान्यातला 'मारू' हा शब्द इथे वापरावासा वाटतो. पन्नाशीतला देवानंद आणि ऐन तारुण्यातली हेमा मालिनी यांचा जोडा अगदी रती मदनाचा वाटतो. देवानंदची या चित्रपटातली भूमिका बॉंडसारखी मिष्कील आहे. या रुपवान रेखाच्या आपण प्रेमात कसे पडलो याचा खुलासा प्राणजवळ करताना 'जब दरवाजा खुला... ' हा लांबलचक संवाद देवानंदची मिमिक्री करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय होता. हेमा मालिनीही देवानंदच्या तोडीस तोड वाटते. कुठेही तिचे नवखेपण या चित्रपटात दिसत नाही. प्रेमनाथ या नटाने  रणजीत आणि राय बहाद्दूर भूपेंद्र सिंग या भूमिका झोकात केल्या आहेत. त्याची ऐयाश वासनांध वृत्ती, स्वार्थी, कुणावरही विश्वास न टाकणारा स्वभाव आणि 'हुस्न के लाखों रंग' या गाण्याच्या वेळी शरीरात पेटत चाललेली वासनेची आग दाखवणारी त्याची देहबोली. प्रेमनाथला चांगले दिग्दर्शक मिळाले की तोही बऱ्यापैकी काम करत असे. (दुसरे पटकन आठवणारे उदाहरण म्हणजे 'बॉबी' मधला जॅक ब्रिगांझा, तिसरे गोल्डीच्या दिग्दर्शनाखालचेच 'तीसरी मंझिल' चे). तसेच प्राणचेही. प्राणचा मेलोड्रामा भरात असताना (शम्मी कपूर, मनोज कुमार हे हीरो आणि प्राण व्हिलन असलेल्या अनेक चित्रपटातला, उदाहरणार्थ) त्याच्याकडून नैसर्गिक अभिनय करवून घेणं हे निर्विवादपणे दिग्दर्शकाचं कसब मानावं लागेल. (दुसरे उदाहरण 'परिचय' चे) प्राणने 'जॉनी मेरा नाम' मध्ये मोतीच्या भूमिकेत बहार आणली आहे. मोतीची स्वामीनिष्ठा, तरीही  मालकाच्या ऐयाश वृत्तीबद्दलची त्याची नाराजी ही प्राणने सुरेख दाखवली आहे. प्राणच्या करड्या आवाजाचा विजय आनंदने छान वापर करून घेतला आहे. मुलीचे अपहरण केलेल्या पंडिताला बोलावताना त्याने 'पंडितजी इधर' असे काही म्हटले आहे की ज्याचे नाव ते. 'हेमा मालिनी गुन्हेगारी काम करायला नकार देते तेंव्हा 'रायबहाद्दूर भूपिंदरसिंगकी बेटी ये कह रही है?' या प्रश्नातला खवचटपणाही तसाच. आता 'जॉनी...' इतक्यांदा बघितल्यानंतर मोतीच्या जागी दुसऱ्या कुणाची कल्पनाही करवत नाही.
सामान्य नट-नट्यांकडून असामान्य काम करून घेणे हे चांगल्या दिग्दर्शकाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. आय. एस. जोहर या आचरटसम्राटाकडून विजय आनंदने धमाल काम करून घेतले आहे. जीवनही टेचात वावरला आहे. इफिखारचा चीफ इन्स्पेक्टर मेहराही झकास. हा इन्स्पेक्टरही खेळकर आहे, आणि सोहन-मोहनचा मानलेला काका आहे. भूमिकेतल्या अशा शेडस चितारणे हे दिग्दर्शकाचे विशेष.  अगदी नगण्य भूमिकेतले सज्जन आणि दुलारीही लक्षात राहातात.
'जॉनी मेरा नाम' मधले संवाद हे त्या चित्रपटाचे एक वेगळे बलस्थान आहे. त्याची उदाहरणे द्यायची म्हटले तर या चित्रपटाची पूर्ण पटकथाच उतरवून काढावी लागेल. 'पलभरके लिये' या गाण्याच्या आधीचा पूर्ण सीक्वेन्स आठवा. रायबहादुरांची चौकशी करणारी रेखा आणि तिचे प्रश्न टाळत प्रेमाच्या गोष्टी करणारा जॉनी. रायबहादुरांनी भेटायला नकार दिला हे ऐकून रेखाचे 'जॉनी, तुम जरुर मुझसे कुछ छुपा रहे हो' असे म्हणणे. 'छुपाने की कोशिश कर राहा हूं' जॉनी. 'क्या? ' रेखा. 'प्यार.. ' तिच्या गळ्यात हात टाकत जॉनी.त्याला हाकलून लावताना दाराच्या फटीतून घुसून खास देव अंदाजातला त्याचा प्रश्न 'केवल इतना बता दिजीये, आप हमसे प्यार तो करतीं हैं ना? '
'नहीं'
'झूठा भी नही? '
'नहीं... '
आणि मग ते केवळ पिक्चरायझेशन असलेले गाणे 'पल भर के लिये.. ' किशोरदांचा ऐन फार्मातला आवाज आणि कल्याणजी आनंदजींची बढिया धून. गाण्याची पिक्चरायझेशनस ही तर विजय आनंदची खासियतच होती. ('दिल का भंवर करे पुकार','तेरे घर के सामने','तुमने मुझे देखा','देखिये साहेबों','होटों पे ऐसी बात',' ये दिल ना होता बेचारा' अशी सहज आठवणारी नावे.)
गुन्हेगारी पार्श्वभूमीवरच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात विजय आनंद विशेष खुलून येत असे. त्यातले बारकावे टिपण्यात विजय आनंदचा हात धरणारा कुणी नाही. हीराकडे ऐंशी लाखाचे हिरे आहेत, म्हणून त्याच्या मागावर असलेले पोलीस आणि त्यांना गुंगारा देण्याच्या प्रयत्नातला हीरा. बंदरावर आपले सामान एका मोटारीत ठेवत असताना दुसऱ्या एका मोटारीकडे तो संशयाने बघतो. त्याचवेळी त्याला ओलांडून जाणारा एक अनोळखी माणूस पुटपुटतो, "वो गाडी पुलीस की है"
'जॉनी मेरा नाम' चे संवाद अगदी सहज बोलल्यासारखे आहेत. कमिशनर मेहरा काठमांडूत असताना त्यांना हीरा फोन करतो, "सुना है, बंबई के पुलीस कमीशनर यहां पर आये हुये हैं, क्या मै उनसे बात कर सकता हूं? " दुसऱ्या बाजूला इफ्तिखारच्या चेहऱ्यावर संशय येतो. तो सावधपणाने म्हणतो, "जी.. आपने गलत सुना है. आप कौन बोल रहे हैं? " यातला जीवनचा 'बंबई' हा शब्द खास त्याच्या 'नारायण, नारायण' स्टाईलने म्हटलेला... मजा आहे!  आणि आय. एस. जोहरच्या वाट्याला तर त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम संवाद 'जॉनी' मध्ये आले असावेत. हीराला अटक करण्याचा प्रसंग ( व त्यातले ते 'चू चू का मुरब्बा' वरून झालेले भांडण!), तुरुंगात हीरा व जॉनीवर पाळत ठेवतानाचा प्रसंग, जॉनीचा नकली बाप झाल्यानंतरचा प्रसंग आणि सगळ्यावर कडी म्हणजे मोतीच्या अड्ड्यावर वेटरची आणि पर्सरची गल्लत झाल्यावरचा मिशा उपटण्याचा प्रसंग....
"पहले अपने मूछों के बारे में तो बताओ"
"मूछों के बारे में क्या बतांऊ? "
"यही की इन मूछों का क्या मतलब है? "
"क्या नामर्दों का जमाना आ गया! मूछों का मतलब बताना पडता है! अरे भाई, मूछ मर्द की निशानी होती है.. "
" सो तो है. पर तुमने क्यों लगायी है? "
"लगायी? कौन सी जुबान बोलते हो भाई"
"मैं तो हिंदुस्तानी बोलता हो. तुम कौनसी समझते हो? "
"तो भाई, हिंदुस्तानी में मूछें लगाना नही बढाना कहते हैं"
"तो ये मूछें तुमने बढाई हैं? "
आणि मग नंतर 'खींचो इसकी मूंछे" चा गोंधळ. त्यातही व्ही. गोपालचे ते 'पकडी गयी, पकडी गयी... ' हसून हसून पुरेवाट!
'जॉनी..' मधली गाणी सदाबहार आहेत. बाबुल प्यारे, हुस्न के लाखों रंग, मोसे मोरा शाम रुठा, नफरत करनेवालोंके, पलभर के लिये.. ही नुसती नावे आठवली तरी मनात ती धून वाजायला लागते. 'ओ मेरे राजा' हे त्यातल्या त्यात फिके. पण त्या गाण्याचेही पिक्चरायझेशन वाहवाच आहे. 'बाबुल प्यारे... ' चा सुरवातीचा आलाप आणि मग सगळे गाणेच ऐकण्यासारखे. ''मोसे मोरा शाम रुठा मधला 'जय जय शाम राधे शाम' हा गजर तर नास्तिकालाही ठेका धरायला लावणारा. आणि 'हुस्न के लाखों रंग'  तर...... असो.
तर असा हा 'जॉनी मेरा नाम'. देवानंदच्या चाहत्यांसाठी मेजवानीच. ज्यांना देवानंद आवडत नाही अशानांही 'नफरत करनेवालोंके सीनें में प्यार भर दूं' या त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायला लावणारा.

देव आनंद - जॉनी / सोहन
हेमा मालिनी - रेखा
प्राण - मोती / मोहन
जीवन - हीरा
प्रेमनाथ - रणजीत / राय बहाद्दूर भूपेंद्र सिंग
आय. एस. जोहर - पहले राम / दूजे राम / तीजे राम
पद्मा खन्ना - तारा
रंधवा - बाबू
सुलोचना - सोहन आणि मोहनची आई
इफ्तेखार - चीफ इन्स्पेक्टर मेहरा
सज्जन - राय बहाद्दूर भूपेंद्र सिंग
दुलारी - पुजाऱ्याची बायको

संगीतकार - कल्याणजी आनंदजी
निर्माता- गुलशन राय
दिग्दर्शन , संवाद, पटकथा- विजय आनंद