पिंपळावरील भुतं

अवसेला पिंपळ सळसळतो, स्पर्श भुतांचा होत असावा
अथवा कोणा वेताळाच्या उच्छ्वासाचा झोत असावा

आडामधल्या कुवाँर माता अश्वत्थावर वसल्या होत्या
पंचक्रोशितिल सभ्य कुळांचा जमलेला गणगोत असावा

पारावरल्या मुंजाशी मी हल्ली गट्टी करतो आहे
विस्मृतीतल्या बाल्याचा धूसर धागा दोहोत असावा

अश्वत्थाच्या पानोपानी कर्मकहाण्या अन् रडगाणी
वेताळ्याच्या प्रश्नांचाही तोच, विक्रमा, स्रोत असावा

केवळ शीर्षासन केल्याने योगपुरुष का ठरतो कोणी?
मुळे ऊर्ध्व अन् खाली फांद्या असा तरू लाखोत असावा

भूतखेत, मुंजे अन् हडळी, ’मिलिंद' कसली तुझी शाहिरी?
शब्द भरजरी अन् कवनाचा गर्भरेशमी पोत असावा...