बदल

गेल्या वीस तीस वर्षांत जग किती बदलते आहे. मध्यमवर्गीय मराठी माणूस आणि आर्थिक सुबत्ता यांचं कधी नव्हे ते जुळतं आहे ..  त्याच्या हातातही बराचसा पैसा खेळू लागलाय. पण त्यामुळे पूर्वीचे अगत्य, नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याबद्दलचे मनापासून वाटणारे प्रेम, मिळून मिसळून वागण्याची पद्धत आणि मुख्य म्हणजे काटकसर या सर्वातही कमी जास्त बदल झाले आहेत. तंत्रज्ञानात तर अचाट बदल झाले. जादुई वाटणाऱ्या गोष्टी शास्त्रज्ञांनी साकार करून दाखवल्या.

आता हेच पाहा ना.. पूर्वी पोस्टमन एखादं टपाल देऊन गेला तरी वाचायची उत्सुकता असायची, लगेच त्याचे उत्तर देऊन पत्र पोस्टात टाकले ही जायचे.  शालेय अभ्यासक्रमात आम्हाला एका धड्यात पत्रांच्या विविध प्रकारांची ओळख होती आणि त्याच्या किमतीही होत्या. पोस्टकार्ड - ५ पैसे, आंतरदेशीय कार्ड - २५ पैसे ( जे नंतर लगेचच ७५ पैसे या भावाने पोस्टात मिळायचे त्यामुळे परीक्षेत मी ७५ पैसे लिहून आले आणि पुस्तकाप्रमाणे मात्र ते चूक असल्याने मार्क गेला होता .. ), पाकीट - १ रु. वगैरे. त्यावेळी सर्व पोस्टे गर्दीने भरून वाहायची. माझ्या नावाने ठराविक रक्कम बचत-खात्यात वगैरे टाकले जायची . शाळेमध्ये एक बाई हे काम करीत असत. त्या शिवणाचे वर्ग घेत. त्यांनीच आमचा बचतगट प्रस्थापित केला होता. ती लाल रंगाची पत्रपेटी आठवतेय?  हात पूर्ण आत घालून पत्र टाकायची? लहानपणी कधीकधी भीती वाटायची मला की एखादेवेळी हात अडकायचा म्हणून   मी तेव्हा पत्रे लिहायला सुरुवात केली ती आधी शिसपेन्सिलीने आणि पट्टीने रेघा मारून मग आत वळणदार अक्षरे काढून. 

त्यानंतर आले फोन. पण आमच्या कडे फोनही खूप उशिरा आला. त्यामुळे आम्हाला फोन करायला एस. टी. डी बूथ वर जावे लागायचे, आय. एस. डी. फोन करायचा झाल्यास तो बुक करावा लागायचा. अर्थात आम्हाला कधी परदेशी फोन करायची वेळ काही तेव्हा आली नव्हती. फोन बूथ वर मात्र पहिल्या लोकांचे बोलणे होईपर्यंत वाट पाहावी लागायची, आपला नंबर आला की आत जाऊन फोन फिरवायचा आणि तिकडून उचलला गेला की लगेच वरती लाल डिजीटस मध्ये  बिलींग सुरू व्हायचे.
मग उगाचच तिकडे लक्ष जात राहायचे आणि घाई घाईने आपला निरोप सांगावा लागायचा, फक्त निरोपच फोनवर बोलायला लागायचे, फोन वर गप्पा ही मारल्या जाऊ शकतात हे मला आमच्या घरी फोन येईपर्यंत माहीतच नव्हते.

फोन मध्ये तरी किती प्रकारचे शोध लागले पाहा, आधी होता तो बटणं फिरवायचा. ज्याला एक भोकं असलेली तबकडी होती आणि त्या त्या बटणात बोट घालून फिरवावे लागायचे. एक बटन फिरवलं की "की ऽऽऽ र कट कट कट" असले आवाज येऊन गेले की मग दुसरं बटन.
पण एक होतं म्हणा नंबर काही आता सारखे लांबलचक नसायचे. मला आठवत आहे तो छोट्यात छोटा नंबर म्हणजे माझ्या डॉक्टर काकाकडचा नंबर  "२४५". आता माझा विश्वासच बसत नाही की हा बरोबर नंबर होता :) त्याच्याकडे गेल्यानंतर (तेव्हा त्याचं लग्न झालं नव्हतं त्यामुळे ) आज्जीला आणि कधी कधी मला तो फोन घ्यावा लागायचा.  मला हॅलो म्हणायचीच मुळीसुद्धा सवय नव्हती त्यामुळे सुरुवातीला खूप मजा यायची.

नंतर आला तो पेजर. आपण फोन करून त्यांना सांगायचं की या या नंबर ला पेज करा की असा असा निरोप आहे या अर्थीचा. मी तेव्हा प्राथमिक शाळेत मराठी माध्यमात शिकत होते, आम्हाला इंग्रजी नसल्याने मला तर्खडकरांचे पुस्तक आईने आणून दिले होते आणि त्यामुळेच त्यातील काही शब्दांच्या जोरावर मी ते निरोप ठेवू शकायचे.
तर्खडकर .. बऱ्याच पिढ्यांना हे पुस्तक माहीत असावे. पण हल्ली सगळीच मुले इंग्रजी माध्यमात शिकू लागल्याने हे पुस्तक आता कित्येकांना माहीत ही असणार नाही.

आमच्याकडे फोन आला आणि काही वर्षातच "मोबाईल" नावाच्या अजून एक जादूने मला भुरळ घातली.

कॅमेरा.. तो घेण्याच्या आधी वाढदिवसाचे वगैरे फोटो काढायला आम्ही स्टुडिओत जायचो. कॅमेरामन कुठल्या कुठल्या गंमतशीर बॅगराऊंडस द्यायचे. त्यातली टिपीकल म्हणजे खोटा फोन आणि खोटी जीप. आमच्याकडे माझे आई बाबा जीप मध्ये बसले आहेत आणि मी मागच्या सीटवर उभी आहे, जीप अर्थातच बाबा चालवीत आहेत असा एक फोटो होता.
शिवाय फोन हातात घेऊन ही माझा एक वाढदिवसाचा फोटो आहे, समोर केक आहे आणि मी बावचळून कॅमेरामन कडे खोटा लाल फोन हातात घेऊन पाहत आहे अश्या चमत्कारिक पोझ मधले फोटो पाहून हसू आवरत नाही.

कॅमेरा आल्यावर ही आता सारख्या डिजीटल कॅमेऱ्याइतकी फटाफट मनसोक्त फोटो काढून नंतर नको ते "डिलीट' करायची सोय नव्हती. ३२ वा ३४ फोटोंचा एक रोल यायचा, तो जपून वापरला जायचा, निवडक क्षणांचे,सणावारांचे फोटो काढले जायचे आणि रोल डेवलपिंग होऊन घरी आलाऽ की खरी मजा असायची, आम्हाला रोल डेवलपिंग बरोबर एक मोफत अल्बम ही मिळायचा, मग तासभर फोटो पाहून ते लावले जायचे अल्बम मध्ये, त्यातही जे छान छान आले असतील ते आधी आणि त्यातल्या त्यात उभे काढलेले फोटो सेम पानावर आणि आडवे काढलेले फोटो एक पानावर असे लावायचे म्हणजे बघताना त्रास होत नाही.

दूरदर्शन आणि त्याचा अँटिना मात्र मला कळायला लागायच्या आत आमच्या घरी आला होता. दर रविवारी सकाळी
 "महाऽऽ भाऽऽऽऽ रऽऽत" अशी आरोळी यायची आणि बहुतेक सर्व मंडळी पोहे, खिचडी वगैरे जे काही केले असेल नाश्त्याला ते घेऊन टीव्ही समोर बैठक मारायचे. वाड्यात अनेक लोक आमच्या घरी टीव्ही पाहायला यायचे. त्यामुळे खूप मजा यायची कारण मला हिंदी तर कळायचे नाही मग आलेल्या लोकांच्या मुलांबरोबर माझे खेळ सुरू होत. त्या टीव्ही वर अनेकदा मध्येच खरखर यायची. या खरखरीला मुंग्या आल्या असे संबोधिले जायचे. गच्चीत जाऊन ऍंटिना वरील अनेक गोष्टी मग काढाव्या लागायच्या. लोक खरंच फार मजा करायचे, ऍंटिना वर कपडेच काय वाळत घाल, नाहीतर त्याला दोरी गुंडाळून  त्याला काहीतरी टांगच .. एक ना अनेक.
त्यानंतर काही वर्षांनी मग आम्ही कलर टीव्ही घेतला.
(हल्ली तर फ्लॅट स्क्रीन टीव्ही का जमाना झाला आहे, स्टेटस सिम्बॉल्स कसे बदलतात पाहा.. भारत-पाक मॅच साठी खास म्हणून एकाने परवा फ्लॅट स्क्रीन टीव्ही घेतला आणि समोर बसायला खास त्या उंचीची ऍडजस्टेबल खुर्ची..  )

फोन मोबाईल्स च्या पाठोपाठ इंटरनेट चे ही पेव फुटायला तेव्हा सुरुवात झाली होती.
त्याच्या आधी आमच्याकडे कंप्युटर आला. 'सी' शिकण्यासाठी अभियांत्रिकी कॉलेज मध्ये असताना तो घेतला खरा पण सुरुवातीला 'एम. एस. पेंट' आणि पत्तेच खेळले गेले त्यावर  

माझ्या मैत्रिणीकडे आणि माझ्याकडे घरी इंटरनेट यायच्या आधी एकदा आम्ही (अति)उत्सुकतेने ई मेल अकाउंट काढायला नेट कैफे वर गेलो होतो, त्यावेळी "याहू " नामक गोंडस बाळाचा नुकताच जन्म झाला होता.  शिवाय माझ्या मैत्रिणीला तिच्या मैत्रिणीकडून आणखी एक शोध लागला होता की इन्स्टंट मेसेजिंग ही करता येतं. त्यासाठीच वेळ ठरवून आम्ही जाणार होतो. माझे ईमेल खाते काढायचे प्राथमिक उरकल्यानंतर तिने माझ्याशी याहू च्या मेसेंजेर वरून संवाद साधायला सुरुवात केली  त्यावेळी खूपच धमाल आली होती.
तितक्यात कोणी "लव्ह२०००" वगैरे नामक  लंपटाने तिला पिंग केलं.. (मेसेंजेर  च्या भाषेत नमस्कार असं म्हणलं ) : आणि हळूच चालू केलं  की बरळायला काही बाही.. आम्ही अक्षरशः पाच मिनिटांच्या आत तेथून धूम ठोकली होती घरी..  

गंमत पाहा .. जेव्हा लोकं लांब होती तेव्हा त्यांना एकमेकांना भेटायची उत्सुकता असायची, परस्परांची किंमत वाटायची. .पण आता इंटरनेट मुळे आपण एका क्षणात हैदराबादच्या तर पुढच्या क्षणाला न्यू यॉर्क च्या माणसाशी बोलू शकतो त्याला पाहू पण शकतो.
याची ही हळूहळू सवय झाली आहे.
हल्ली तर याहू  वर अनेक  जण ऑनलाईन असतात पण कोणीच आपण होऊन कोणाशी बोलायला सुरुवात करत नाहीत. आणि एकतर्फी संवाद सुरू झालाच तर  एखादा शब्द ही संभाषण न होता सरळ  साईन आऊट झाल्याचा आवाज ही येतो कधी तरी..  कूऽऽधडाऽऽड.. मला स्वतःला हा आवाज अजिबात आवडत नाही, कोणाच्या तरी घरी गेलं आणि त्यांनी "आपल्याला हवे असलेले ते 'हे' घर नव्हेच मुळी" हे सांगितल्यानंतर आपण त्यांच्या दृष्टीआड व्हायच्या आधीच जर आपल्या तोंडावर धाडकन दार लावून घेतलं तर असा आवाज होतो.   

पूर्वी मुलांना सुट्ट्या वगैरे लागल्या की गावाला जाण्याची पद्धत होती, म्हणजे दर वेळीच जायचे असे नाही पण बहुतेक वेळा लोक प्रवास करत असत. मध्यम वर्गीय लोक काही आजच्या सारखे अफाट खर्च करून कुठे जाऊ शकत नसावेत म्हणून निदान नातेवाईकांकडे तरी हवापालट साठी जायची पद्धत निघाली असेल.  अगदी फारच ऐष म्हणजे लोक काश्मीरला जायचे.. मग ते टिपीकल काश्मिरी ड्रेस वगैरे घालून फोटो काढायचे. साधारण आता चाळीशी पन्नाशी ला पोचलेल्या अनेक बायकांकडे तसले फोटो असतील त्यांच्या तरूणपणीचे..
 (हल्ली तर काश्मीरला जायची काही सोयच उरलेली नाही. नाही का?)
 तर असे लोक त्या काळी परत येताना गिफ्ट म्हणून शाली, सफरचंदे  वगैरे आणायचे.

पण किती? अगदी बोटावर मोजतील अशी कुटुंबे अशी मज्जा लुटू शकत असावीत. बाकी सगळे मुंबई पुण्याचे लोक सुट्टीत रत्नागिरी कोंकण वगैरे ठिकाणी आपापल्या नातेवाईकांकडे जायचे यायचे आणि कधी  त्यांना आपल्या कडे बोलवायचे, पण एकूण मजा करायचे, त्यातून सुख मिळवायचे. मग भले कधी कधी काकी, मामी वर एक्स्ट्रॉ स्वयंपाकाचा भार का पडेना  पण आते मामे मावस भावंडे एकत्र येऊन धम्माल करायला मिळायची.
"आपल्या कडे आलेल्या पाहुण्यांना आपल्या कडे असलेल्यापैकी सर्वोत्कृष्ट असच द्यायचं, एकवेळ आपल्याला नाही मिळालं तरी चालेल पण त्यांची गैरसोय होऊ द्यायची नाही" अशी मानसिकताच होती..
पुरेश्या गाद्या नसल्या तर एक सतरंजीवर सर्व मस्त रांगेत झोपत असत. पत्त्यांची मैफिल रंगायची. हलके फुलके विनोद, चर्चा, गप्पा टप्पा चालायच्या, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना ही आपली सर्व नातलग मंडळी माहीत असायचीच,  शेजारीही यायचे आणि कधीच आपल्यातलेच एक होऊन जायचे.

मला नेहमी प्रश्न पडतो की तेव्हाच्या लोकांना काय प्रायव्हसी नको होती? कुठल्या काकी मामीना दिवसभर खपून जेवणाच्या पंगती घालत बसायला आवडत असेल? त्यांना ही आराम हवासा वाटतच असेल की. स्वतःची स्पेस हवी असेलच, पण ऍडजस्ट करायची सवय खूप महत्त्वाची ठरली .

 तेव्हाही भांडणे होती, भाऊबंदकी होती, सक्खे-सावत्रपणा होता, पण मुलांपर्यंत त्याची झळही पोहोचत नसायची. त्यामुळे सख्ख्या भावंडांपेक्षाही कधी कधी चुलत मामे भावंडांशी चांगले सूत जमत असे. चुलत बहीण म्हणजे अगदी परमप्रिय मैत्रीण वाटे. गुपिते सांगितली जात, भातुकल्या मांडल्या जात. 

तर आज काल अमेरिका, मलेशिया,  सिंगापूर, लंडन  वगैरे लोकांच्या अगदी सहजपणे जाण्याच्या जागा झाल्या आहेत.  जो तो उठसूठ टूर्स अरेंज करायला लागला आहे.  चिकाऽऽ र पैसे खर्च करायचे आणि मजा करायची,  अशी मानसिकता मोठ्या प्रमाणावर तयार होऊ घातली आहे. मराठी माणसाने समृद्धी कडे वाटचाल सुरू केली हे छानच आहे.

पण पण हम दो हमारे एक किंवा दो च्या जामान्यात ऍडजस्ट्मेंट हा शब्दच गायब नको व्हायला. हम करे सो कायदा असा प्रत्येकच माणसाचा नूर होऊ लागला तर या स्पर्धात्मक युगात एकमेकांशी पटणेच कमी होईल.
एकदा आम्हाला अमेरिकेतच नातलगांकडे राहायला जाण्याची वेळ आली, खरे पाहता आम्ही हॉटेल बुक केले असते तर बरे झाले असते असे म्हणायची वेळ नंतर आमच्या वर आली..
आम्ही आदल्या रात्री जेवायला आणि नंतर २ दिवस राहायला जाणार होतो. ते आम्हाला स्टेशन वर न्यायला येणार होते. आम्ही बरोबर ठरल्याप्रमाणे फलाटावर आलो आणि वाट पाहत उभे राहिलो. बाहेर प्रचंड थंडी.. खूप हुडहुडी भरली होती. बाहेर कोणीच आलं नव्हतं न्यायला अजूनही.. मग त्यांना फोन लावला, तर ते अजून घरीच होते, त्यांना यायला वीस मिनिट होती आणि नेमके छोटे स्टेशन असल्याने तेथील हीटर बंद होता.
ती वीस मिनिटे कुडकुडत काढण्यापेक्षा सरळ टॅक्सी करून गेलो असतो असे वाटले. त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी आम्हाला सरळ आतल्या खोलीत पाठवले बॅग्ज्स घेऊन आणि त्या खोलीचे दार बाहेरून लावूनच घेतले. आम्हाला काही कळेचना हा काय प्रकार आहे ते.. तितक्यात त्यांनी बाहेरून टक टक करून विचारले (खरे तर बजावलेच) की फ्रेश होऊन जेवायलाच या. बरं म्हणून कपडे बदलून आम्ही मुकाट्याने बाहेर आलो,  तर हाईट म्हणजे त्यांनी सर्वांनी आमच्याआधी जेवूनही घेतले होते..  आम्हाला जेवायला भाजी पोळी आणि भात होता. भाजी संपतच आली होती. आणि पोळ्याही संपल्या.  मला एकदम वाटून गेलं की मी कोणाला ही जेवायला बोलावलं की नेहमी काहीतरी गोड करते आणि पुरून थोडेसे उरेल इतके करते.. याच लोकांना आम्ही जेवायला बोलावले होते त्यावेळी मी केलेले श्रीखंड त्यांना आवडले म्हणून डबा भरून त्यांना घरी ही दिले होते. आम्ही मात्र त्यांच्याकडे अर्ध्या पोटीच सतरंजीवर कुडकुडत झोपून गेलो..
म्हणतात ना की संगतीला राहिल्याखेरीज आणि पंक्तीला जेवल्याखेरीज माणूस कळत नाही. त्याची अगदी प्रचिती आली.
त्यांनंतर आम्ही प्लॅन बदलला असे सांगून  हॉटेल शोधायला लगोलग सटकलो ते सटकलोच.
आधी माझ्या एका मैत्रिणी कडे गेलो, कोण कुठली ती. अशीच ओळख झालेली आमची पण तिने मात्र आमचा फार छान पाहुणचार केला, जेवायला साधच पण चविष्ट.. पोळी आमटी भाजी भात खीर आणि कोशिंबीर करून आम्हाला तृप्त केलं. आणि हॉटेल वगैरे बुक करू नका एका दिवसासाठी..  मी आहे ना इथे? मग माझ्या कडे अगदी बिनधास्त राहा असे म्हणाली.
लोकांना इतरांसाठी काही करायला नकोसे झाले आहे की काय असे वाटून खरंच मनोमन दुःख झाले होते पण मैत्रीने नेहमीप्रमाणेच दुःखावर हलकी फुंकर घातली आणि माणुसकी अजून शिल्लक असल्याचे जाणवले.

काळ बदलला तसा काही माणसंही बदलली. कालाय तस्मै नम:!! हेच खरंय! 
कोण जाणे .. कदाचित बेल बॉटम च्या पॅंट आणि आखूड शर्टांसारखी अगत्याची आणि आपलेपणाची फॅशन, सर्वत्र परत ही येईल.