एक नाते...!

...............................................
एक नाते...!
...............................................

गाडताही येत नाही; जाळताही येत नाही!
एक नाते; जे मला सांभाळताही येत नाही!

जीव देणारे जिवाला भोवताली कोण आहे...?
जीव मज कोणावरी ओवाळताही येत नाही!

जीर्ण झाले आपले संबंध आता एवढे की -
पान एखादे स्मृतींचे चाळताही येत नाही!

वाटते जाऊ नये; पण जायचीही वेळ आली...
काढत्या पायासवे रेंगाळताही येत नाही!

एकदा अगदीच वैतागून कंटाळा म्हणाला...
'दुःख माझे हे, मला कंटाळताही येत नाही! '

गैरसोईचीच ना ही एवढी जवळीकसुद्धा?
नीट काहीही कसे न्याहाळताही येत नाही!!

मज कळेना कोणती जादू असे लिहिण्यात माझ्या...
कौतुके होती न; पण हेटाळताही येत नाही!!

एकदा का उलगडाया लागला की लागला हा...
आठवांचा गालिचा गुंडाळताही येत नाही!

एकमेकांची करू या चौकशी आता जराशी...
भेटलो आहोत; तेव्हा टाळताही येत नाही!

रंग मज माझा बदलता पाहिजे तेव्हा न येई...
पाहिजे तेव्हा मला गंधाळताही येत नाही!

स्वप्न तू उसळून येण्याचे पहा; बंदी न त्याला...
तूर्त ध्यानी ठेव; तुज फेसाळताही येत नाही!

- प्रदीप कुलकर्णी

..............................................
रचनाकाल - २२ जून २००९
..............................................