जाणीवा भरकटलेल्या

शहरी जाणीवांचे नकाशे प्रत्येक क्षणाला अजूनच पोकळ आणि चुरगळलेले बनत चालले आहेत. साध्या साध्या गोष्टींना प्रतिक्रिया देण्यास मन निरुत्सुक होत चालले आहे. एखादी गोष्ट त्यातूनही मनाला भिडलीच तरी तिला नेमका काय प्रतिसाद द्यावा, आपल्या भावना नेमक्या कशा व्यक्त कराव्यात यांचे मायनेही अनेकदा गोंधळलेले, भडक सवंगतेने जडावलेले दिसतात.

अगदी परवाचीच गोष्ट घ्या ना! मी घराच्या बाल्कनीत संध्याकाळी हवा खात उभी होते. अर्थातच एक नजर खालच्या वर्दळीच्या, वाहत्या रस्त्याकडे होती. आमच्या रस्त्याला दुतर्फा दुकाने असून रोज पी१, पी२ असे पार्किंग असते. ज्या बाजूला पार्किंग असते त्याच्या समोरच्या बाजूचे दुकानदार आपल्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकाची गैरसोय होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे 'आज पार्किंग समोर आहे' असा फलक आपल्या दुकानांच्या काचेवर लावतात. परवादेखील असाच फलक समोरच्या दुकानदारांनी लावलेला, म्हणजेच पार्किंग आमच्या बाजूला होते. अर्थात नेहमीच्या सवयीने अनेक लोकांनी त्या पाट्यांकडे सोयीचे दुर्लक्ष करून आपापली वाहने दोन्ही बाजूंना अगदी कश्शीही पार्क केली होती. संध्याकाळची गर्दी असल्याने रस्त्यात वारंवार वाहतूक-कोंडी होत होती. घरी जाण्याच्या घाईत असलेले वाहनवीर कर्णकर्कश्श हॉर्न्स वाजवून ध्वनीप्रदूषणात आपले मोलाचे योगदान देत होते.

अचानक तिथे वाहतूक पोलिसांचा, नियमबाह्य पार्किंग केलेली वाहने उचलणारा टेंपो आला. सोबत मोटरसायकलवर आरुढ एक महिला पोलिस कर्मचारीही अवतीर्ण झाली. टेंपोतून भराभर दोन-चार मुले उतरली व त्यांनी आमच्या बाजूला उभी असलेली वाहने टेंपोत चढवायला सुरुवात केली. पाच-दहा मिनिटांत टेंपोची बातमी वाऱ्यासारखी पसरली असावी, कारण अनेक लोक आपापल्या वाहनांच्या काळजीने घटनास्थळी एकच धावत आले. जीवाच्या आकांताने त्या पोलिस कर्मचारी महिलेच्या व टेंपोत गाड्या चढविणाऱ्या मुलांच्या गयेवयेने विनवण्या करू लागले. कोणी तिथल्या तिथे काही 'चिरीमिरी' देऊन मामला मिटतोय का याचा शोध घेऊ लागले. एव्हाना हा सर्व तमाशा पहायला बघ्यांची व आजूबाजूच्या दुकानांत काम करणाऱ्या माणसांची दुतर्फा गर्दी होऊ लागली होती. परिणामी वाहतुकीची अधिकच कोंडी होत चालली होती. जमणाऱ्या गर्दीची, रस्त्यात खोळंबलेल्या वाहनचालकांची अस्वस्थता मिनिटागणिक वाढत होती. हलक्या स्वरातली कुजबूज संपून कंटाळलेले लोक हळूहळू गलका करू लागले होते. कोणी कान किटेपर्यंत हॉर्न पिरगळत होते तर कोणी माना उंचावून, हातवारे करत, शिट्ट्या मारत आपल्या वाहनाला पुढे सरकू देण्यासाठी अथक प्रयत्न करीत होते.

त्या सर्व रामरगाड्यात ती पोलिस महिला कर्मचारी कमालीच्या शिताफीने व ठामपणे तिचे काम करीत होती. तिच्या हालचालींमधूनही कडक शिस्त जाणवत होती. बघता बघता टेंपो भरला! तरीही एक-दोन मोटरसायकली आत घालायच्या शिल्लकच होत्या. त्यांना आत जागा करून देताना टेंपोतल्या मुलांनी आत ठेवलेल्या दोन स्कूटरी व एक मोटरसायकल पुन्हा बाहेर काढली. टेंपोतली सगळी मुले व ती पोलिस महिला गाड्यांना आत जागा करण्याच्या प्रयत्नांत असतानाच बाहेर जी मोटरसायकल तात्पुरती काढण्यात आली होती तिच्या मालकाने तिला बेमालूमपणे तिथून नेऊन हळूच पोबारा करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. अर्थातच त्या महिला पोलिसाने त्याला खडसावले व त्याच्या ताब्यातून त्याची गाडी घेण्यास हाताखालच्या मुलांना सांगितले. तोपर्यंतही प्रकरण ठीक होते. पण त्या वाहनमालकाने कांगावा करून आरडाओरडा करायला, अर्वाच्य शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याचे अजून एक-दोन मित्र त्याला येऊन मिळाले आणि तिघे मिळून त्या महिलेशी हुज्जत घालू लागले. आजूबाजूची गर्दी फक्त बघ्यासारखी ढिम्म उभी होती. सभोवतालच्या इमारतींच्या बाल्कन्यांमधील प्रेक्षकांची संख्या वाढली होती. सगळेजण चवीचवीने समोर घडणाऱ्या फुकटच्या तमाशाची मजा चाखत उभे होते. खाली त्या चुकार वाहनचालकाची महिला पोलिसाबरोबर बाचाबाची चालूच होती. एक तर त्याने नियम मोडून पार्किंग केलेले, पण स्वतःची चूक मान्य करून मिळेल तो भुर्दंड सहन करण्याऐवजी हे महाशय परस्पर पोबारा करण्याच्या तयारीत होते, आणि तिथेही डाळ न शिजल्यावर त्यांनी आरडाओरडा, दमदाटीचे असभ्य शस्त्र उगारले होते. गलका वाढत वाढत एवढ्या थराला पोचला की शेवटी त्या महिलेला आपला दंडुका परजावा लागला. मग मात्र फटाफट गोष्टी हलल्या. तोपर्यंत टेंपोतील मुलांनी सर्व वाहने आत घेतली होती. टेंपो सुरू केला होता. महिला पोलिसानेही आपल्या मोटरसायकलवर मांड ठोकली व गाडी स्टार्ट केली. टेंपो थोडा पुढे गेला, आतून दोन मुलांनी माकडाच्या चपळाईने बाहेर उड्या मारल्या, त्या भांडणाऱ्या वाहनचालकाची मोटरसायकल त्याला काही कळायच्या आत झटकन उचलली व टेंपोत चढवली. तो भानावर येऊन 'अरे अरे' म्हणेपर्यंत टेंपो चालू असतानाच त्या दोघांनी आत उड्या मारल्या व टेंपोचे खालचे दार लावून घेतले! पुढे ती महिला पोलिस व मागून वाहनांनी खचाखच भरलेला टेंपो काही क्षणांत दिसेनासे झाले.

आता त्या वाहनचालकाकडे त्या टेंपोला, मुलांना व पोलिसांना शिव्या घालण्यावाचून इतर काहीच करण्यासारखे उरले नव्हते. त्यामुळे जणू आपल्यावर किती घोर अन्याय झाला आहे अशा थाटात त्याने आपल्या रडगाण्याने काही वेळ आजूबाजूच्या लोकांची सहानुभूती मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. पण लोकांसाठी तो बिनपैशाचा तमाशा संपला होता. त्यांना आता त्या वाहनचालकाच्या बोलण्यात स्वारस्य नव्हते. 'पैसा वसूल' च्या थाटात जमलेली गर्दी आपापल्या गंतव्याच्या दिशेने पांगू लागली होती. शेवटी त्या माणसाबरोबर फक्त त्याच्या आरड्याओरड्यात त्याला साथ देणारा एकमेव मित्र तिथे उरला. दोघेही हताशपणे गेलेल्या टेंपोच्या दिशेने मान हलवीत, हातवारे करीत जड पावलांनी तेथून निघाले.

एव्हाना कोपऱ्यावरच्या चहा-वडापावाच्या टपरीवर चांगलीच गर्दी जमली होती. पुढच्या तासाभरासाठी तरी 'कटिंग' चहाबरोबर चघळायला व गर्दी खेचायला गिऱ्हाईकांना एक झकास विषय मिळाला होता. वाण्याच्या दुकानात काम करणारा पोऱ्या कान कोरत पांगलेल्या गर्दीकडे रिकाम्या डोळ्यांनी पाहत उभा होता. चकचकीत शो-रूमच्या नोकरांना मालकांची खेकसणाऱ्या सुरातील एकच हाक पुरेशी होती. बाल्कन्यांमधली मंडळी आपापल्या घरांत दूरचित्रवाणीमालिकांमधील नव्या थरार नाट्याची मजा लुटायला भक्तीभावाने टी. व्ही‌. समोर स्थानापन्न झाली होती. मोडलेल्या नियमांचे, अडकलेल्या रहदारीचे, वाया गेलेल्या वेळाचे आणि चार लोकांनी भर रस्त्यावर एका महिला पोलिसाशी केलेल्या बाचाबाचीचे कोणालाच फारसे सोयरसुतक नव्हते. कोणालाच त्या वर्तनात काही खटकल्याचे वरकरणी तरी दिसून येत नव्हते. त्यांच्या मते याला पर्याय नव्हता... जाणिवा हरवत चाललेल्या, संवेदना बोथट होत जाणाऱ्या महानगरीच्या दैनंदिन जीवनातील तो एक अविभाज्य, सवंग करमणुकीचा, फारसे महत्त्व नसलेला भाग बनला होता! 

--- अरुंधती कुलकर्णी.