पाकिस्तान अमेरिकेला ब्लॅकमेल करीत आहे

सध्या पाकीस्तान अमेरिकेला 'तालीबान्यांचा मुकाबला करण्यास मदत द्या नाहीतर पाकीस्तानांतील अण्वस्त्रे तालीबान्यांच्या हातात पडण्याचा धोका आहे' असे प्रच्छन्नपणे सूचित करून अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर उकळत आहे. अमेरिका या ब्लॅकमेलिंगला बळी पडत आहेच पण भारताने दहशतवादाबद्दल पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊ नये म्हणून भारतावरही दडपण आणीत आहे. थोडक्यात पाकीस्तानने भारत व अमेरिका या दोघांनाही कोंडीत पकडले आहे. आणि सध्या तरी अमेरिकेला पाकीस्तानच्या तालावर नाचण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे वाटत असल्याचे सकृद्दर्शनी दिसते.

साधारणपणे ब्लॅकमेलर आपल्या सावजाला 'माझी मागणी पूर्ण न केल्यास सर्वनाश ओढवेल' अशी धमकी देत असतो. सर्वनाशाची कल्पनाही भयानक असल्यामुळे सहसा त्याला कोणी तयार नसतो व ब्लॅकमेलरचे फावते. पण समजा, एखाद्या ब्लॅकमेलरच्या कोंडीत सापडलेल्याने सर्वनाशाची तयारी ठेवली तर? 

अशा परिस्थितीत काय होते त्याचे उदाहरण अमेरिकेच्याच अलीकडच्या इतिहासात आहे. अमेरिकेप्रमाणेच विघटनापूर्वीचा सोव्हियएट रशिया एक महासत्ता व अमेरिकेसाठी डोकेदुखी होती. रशियाचे क्यूबाशी अमेरिकेविरुद्ध संगनमत होते. त्यावरून दोघांमध्ये शीतयुद्ध चाले. जॉन केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष असतांना एकदा रशियाने क्यूबाला लष्करी मदत म्हणून युद्धनौका पाठवली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तणाव निर्माण झाला. जॉन केनेडी यांनी रशियाला युद्धनौका परत बोलावण्यास सांगितले व तसे न केल्यास अमेरिका युद्ध करायला मागेपुढे पाहणार नाही असेही बजावले. सर्व अमेरिका युद्धाच्या तयारीला लागली. त्यावेळी दोन्ही महासत्तांकडे अण्वस्त्रे होती. केनेडींच्या कणखर भूमिकेमुळे जग सर्वनाशाच्या उंबरठ्यावर होते. पण केनेडी अविचल राहिले. परिणाम? रशियाने युद्धनौका परत बोलावली. जगाने सुटकेचा निश्वास सोडला. अमेरिकेच्या सध्याच्या अध्यक्षांना हा इतिहास माहीत नसेल असे वाटत नाही. कदाचित अमेरिका त्या दृष्टीने तयारी करीतही असेल.

आपणास काय वाटते?

नपुसकासारखे जीवन व सर्वनाश यांतून तुम्ही कशाची निवड कराल? दुसऱ्यांना कशाची निवड करण्याचा सल्ला द्याल?