साहसे!

.................................
साहसे!
.................................

कुणीही बोलले नाही कसे काही?
कुणीही ऐकले नाही जसे काही!

प्रयासाने किती ही लागली तंद्री...
सुचू लागेल आता छानसे काही!

तडे हे चेहऱ्यांचे सांध तू आधी...
रुसू दे भंगलेले आरसे काही!

उन्हाला चांदण्याची पाहिजे मैत्री...
जरी होणारही नाही असे काही!

उद्या काढील कोणी माग डोळ्यांनी...
इथे तू सोड स्वप्नांचे ठसे काही!

तशी वाया न गेली भेट दोघांची...
जरी हाती न आले फारसे काही!

कुणाच्या ओंजळी सांडूनही गेल्या...
रितेही राहुनी गेले पसे काही!

बघू या पाडता येतात का पैलू...
मला आणून दे तू कोळसे काही!

मनाचे कोपरे सारे चला शोधू...
जिथे दडलीत वेडी साहसे काही!

- प्रदीप कुलकर्णी

.................................
रचनाकाल ः १ जुलै २००९
.................................