`पग' घुंगरू

मूळ प्रेरणा : ही पाहा

"गद्दारांना शिवसेना भवनात स्थान नाही! '' उद्धव ठाकरे गरजले, तशी सर्वांचीच पळापळ झाली.
विधानसभेच्या निवडणुकीला अवकाश असताना कोण गद्दार शिवसेनेत पुन्हा घुसण्याचा किंवा शिवसेनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, हे काही कळेना. सध्या तरी तशी काही वार्ता कानावर नव्हती. उलट, मनसेमध्ये गेलेल्या श्वेता परुळकर शिवसेनेत परत आल्या, तेव्हा त्यांच स्वागतच झालं होतं. आज पुन्हा त्या शिवसेना भवनात उद्धवजींना भेटायला आल्या होत्या. सोबत डॉ. नीलमताई गोऱ्हेही होत्या. त्यांच्याबाबतचा निर्णय जाहीर झालेला असताना उद्धवजी त्यांच्याबाबत असं म्हणणं शक्यच नव्हतं. त्यामुळेच तिथे उपस्थित असलेले तमाम "मावळे' बुचकळ्यात पडले होते. शिवसेनेतून उडू पाहणारा हा "कावळा' कोण, याचा शोध सुरू झाला.
सर्व "सोर्सेस' वापरून झाले. इतर पक्षांतल्या मित्रांनाही फोनाफोनी झाली. तरीही काही छडा लागण्याची चिन्हे दिसेनात. बऱ्याच प्रयत्नांनंतर तिथे उपस्थित निष्ठावंत शिवसैनिकांच्या लक्षात आलं, की "पग' जातीचा एक कुत्रा शिवसेना भवनात आला आहे आणि त्यानं धुमाकूळ घातला आहे. शिवसैनिक असलेल्या शैलेश पाटलांनी तो कुत्रा उद्धवजींसाठी खास मागविला होता. उद्धवजींचं वन्य प्राण्यांवरचं आणि पाळीव प्राण्यांवरचं प्रेमही सर्वश्रुत होतं. त्यांना आधीच्या 'व्होडाफोन'च्या जाहिरातीतला हा लोभसवाणा कुत्रा आवडला होता. त्यांची ही आवड पूर्ण करण्यासाठी शैलेश पाटील यांनी त्यांच्यासाठी मुद्दाम एक "पग' आणला होता. पण शिवसेना भवनात आल्यावर भगवा हाती घेण्याऐवजी त्यानं बंडाचा झेंडा फडकावून सगळीकडे धुमाकूळ सुरू केला होता. त्यामुळेच उद्धवजी संतप्त झाले होते.
झालं! एवढ्या हौसेनं आणलेल्या "पग'नं निष्ठा न दाखवता उलट उपद्रवच सुरू केल्यानं त्याला पकडण्यासाठी आटापिटा सुरू झाला. भवनात खलबतं करण्यासाठी जमलेली मंडळी मूळ काम सोडून याच मोहिमेवर लागली.
श्वेता परुळकरही या वेळी शिवसेना भवनात अवतरत्या झाल्या होत्या. या "पग'नं त्यांच्याशीही जुळवून घेतलं नाही. या गोंधळात आपलं मूळ कामच त्या विसरून गेल्या. उद्या ही बातमी बाहेर फुटली, तर विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत मिळेल आणि त्यांच्या प्रतिक्रिया कायकाय असतील, असा विचार काही शिवसैनिकांच्या मनात तरळून गेला.
"शिवसेना भवनात आलेला एक साधा प्राणीही उद्धव ठाकरेंचे आदेश पाळत नाही, तर शिवसैनिक कसे पाळणार, ' असा प्रश्न नारायण राणे कदाचित विचारतील.
"उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कुत्र्यालाही आपली निष्ठा विसरायला लावणारं आहे, ' अशी टीका कदाचित राज ठाकरे करतील.
"ऐसी छुटपुट घटनाओं पर मैं टिप्पणी नहीं करता, ' असं आर. आर. पाटील म्हणू शकतील. मनोहर जोशी सरांना प्रतिक्रिया विचारली, तर मात्र "मी त्या वेळी शिवसेना भवनात नव्हतो. तो कुत्रा कुणी आणला, कोणत्या जातीचा आहे, कुठल्या देशातून आलेला आहे, याची माहिती घ्यावी लागेल. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. अशा किरकोळ घटनांनी त्यावर काही परिणाम होऊ शकत नाही, ' अशी प्रतिक्रिया देतील, ही खात्री मात्र प्रत्येकालाच होती.
... शेवटी महत्प्रयासानं तो "पग' एकदाचा हाती लागला. या "पग'ला घुंगरूनी नव्हे, दोरीनं बांधल्यानंतर त्याची रवानगी शिवसेना भवनाबाहेर झाली. पुन्हा नियमित व्यवहारांना सुरवात झाली.
थोड्या वेळानं जरा निवांत झाल्यावर शिवसेना भवनातून "व्होडाफोन'च्या महाव्यवस्थापकांना फोन गेला.
उद्धवजी बोलत होते, "व्होडाफोन'नं जाहिरातीतून 'पग'ला आधी काढलं, मग परत घेतलं. त्याच्या निष्ठेबद्दल तुम्ही परत एकदा खात्री करून घ्या, एवढंच सांगायचं होतं! ''