द्रौपदी

(महाभारतातील एका अतिशय नाट्यमय प्रसंगावर आधारीत ... )

सगळीकडे दाटले आहे भयाचे काहूर .
क्रूर, पाशवी शक्तींनी, पुन्हा एकदा, .... सत्यधर्मावर विजय मिळवला.
माझे पाच परमेश्वर ....
शरमेने मस्तक झुकवून , असहाय होऊन बसले आहेत.
अतिरथी, महारथींनी सुशोभित ही कौरव सभा ...
आज आत्मग्लानीने क्लांत होऊन निश्चेष्ट, आणि अचल झाली आहे.
जन्मांध धृतराष्ट्र आणि महासती गांधारी,  
आपल्या पुत्राच्या आमानुषते पुढे हतप्रभ झाले आहेत.
गांधारी परोपरीने आपल्या पुत्रास विनविते आहे. पण ...
दुर्योधनाचा मद इतका अनावर आहे, की प्रत्यक्ष जन्मदात्या मातेचा अधिक्षेप करण्यात त्याला काहीच गैर वाटत नाहीये.

हा सूतपुत्र कर्ण ---- 
अपमानाचे डंख मनात जागवत, बेभान होऊन, अधर्माला कवटाळतो आहे.

हा युवराज दुर्योधन -----
दुष्ट, दीर्घद्वेषी, आणि कपटी .
कपटद्युतात मनाजोगे दान मिळाल्याच्या उन्मादात धुंद झाला आहे तो .

हा दुः शासन -----
आज्ञा पालन एव्हढेच कर्तृत्व असलेला, एक परप्रकाशित कौरव.
त्याच्या पापी हातात माझे वस्त्र धरून ....

कृष्णा ----- तुला काहीच दिसत नाही का रे ?
तुझी 'कृष्णा' भर सभेत अपमानित होते आहे. एखाद्या सामान्य दासीला सुद्धा, एक स्त्री म्हणून जो मान मिळतो, तो मला...
या इंद्रप्रस्थाची साम्राज्ञी असलेल्या द्रौपदीला नाकारला जातो?
माझ्या दासीपणाचे मला दुःख नाही, पण कृष्णा-- ही विटंबना कशी सोसू ?

माझा आकांत कोणालाच ऐकू कसा येत नाही?
कसला भयंकर कल्लोळ उठतो आहे हा?
या दिशा, आज अवेळीच का अंधारत आहेत?
तो सहस्त्ररश्मी आपल्या पुत्राचे हे अघोर पाहून काळवंडला तर नाही ?

हे महाप्रतापी भीष्म, द्रोण ... मस्तक झुकवून स्तब्ध का आहेत?
त्याच्या शरीराला , प्राण सोडून तर गेले नाही ना? मग ते इतके निश्चल का आहेत?

तो शाल्वराज,  -- तो शकुनी -- , उद्दामपणे नजर रोखून पाहत आहेत, --- या याज्ञसेनी कडे
त्यांची जळून राख कशी होत नाही ?

दूर कुठेतरी एक अस्पष्टसा आवाज येतो आहे , या पापातली भागीदारी नाकारणारा.
कोण आहे तो? ---- हा तर राजपुत्र विकर्ण .. एक कौरव
खूपच दुबळा आहे तो . पण या भयाच्या आवर्तामध्ये, त्याचाही आधार वाटतो आहे.

आता हे सर्व मला माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहवत नाहीये.........
कृष्णा---  तूच माझा त्राता.
कसली परीक्षा पाहतो आहेस तुझ्या कृष्णेची?
आजपर्यंत तूच तर होतास ----
माझ्या प्रत्येक संकटात सहाय्यकर्ता .
मग आज काय झाले? की तूही निर्बल झाला आहेस, या पातकी खल-पुरुषा पुढे ?

नाही--- नाही ---- असं होणं शक्यच नाही.
बघ..... मला तुझ्या बासरीचे सूर ऐकू येतायत. तुझ्या मुकुटावरचे मोरपीस, माझ्या मिटल्या डोळ्यांसमोर झुलतं आहे.
कृष्णा --- तुझ्या सुदर्शन चक्राचं तेज, तुझ्या कंठातील चंदन हाराचा सुगंध ----
सारं --- सारं काही मला जाणवतं आहे.
तुझ्या देवदत्त शंखाच्या नादाने, या क्रूर अशांतीला तडे जाताहेत.
माझा सारा देह, तुझ्या तेजाने झाकला गेला आहे. त्या तेजाचा आश्वासक स्पर्श मला धीर देतो आहे.

भयाचे सावट दूर होते आहे. सारी कुरू सभा आनंदली आहे. एका अघोरी पातकाला साक्षी राहावं लागलं नाही म्हणून सुटकेचा निःश्वास टाकते आहे.

आणि कृष्णा--- तो बघ .. तो दिनमणी, पुनः आपल्या संपूर्ण तेजाने आकाशात तळपतो आहे.