हा पसारा पाहिला की वाटते

माझ्या 'नकाशे' या एका गजलेत एक शेर होताः

हा पसारा पाहिला की वाटते
काय आहे चाललेले आपले

हा शेर सुचण्याचे कारण फार इंटरेस्टिंग आहे. मला माझ्या एका सहकाऱ्याकडून एक इमेल आली होती. त्या इमेलचा विषय होता 'वॉव्ह'! इमेल उघडल्यानंतर आत लिहिले होते ( अर्थातच इंग्रजीमध्ये ) की 'हळूहळू पाहा काय होते ते'!

प्रथम आपली पृथ्वी दाखवली होती.

एका विशिष्ट कालावधीनंतर त्या पडद्यावर एक एक ग्रह / तारा दिसायला लागला. तसतसा, पृथ्वीचा आकार कमीकमी होत गेला. दिसलेले ग्रह असेः

पृथ्वी
चंद्र ( येथपर्यंत पृथ्वीच्या पडद्यावरील आकारात फरक पडला नाही. )
बुध ( पृथ्वीच्या पडद्यावरील आकारात फरक पडला नाही )
शुक्र -  ( पृथ्वीच्या आकारात फरक पडला.)
मंगळ -  ( एकंदर सगळेच ग्रह तुलनेने लहान झाले)
युरेनस व नेपच्यून - येथे आधीचे सर्व ग्रह खूपच छोटे झाले.
शनी - युरेनस व नेपच्यून लहान झाले. पृथ्वी तरीही व्यवस्थित दिसत मात्र होती.
गुरू - अजूनही पृथ्वी दिसत होती. चंद्रही एक ठिपका दिसत होता.

आता तारे सुरू झालेः

सूर्य - येथे सगळे ग्रह लिंबू टिंबू झाले. मात्र, पृथ्वी अजूनही दिसत होती व चंद्र पाहायला त्रास होत होता.

सिरियस - सूर्यापेक्षा कित्येक पटीने मोठा तारा पडद्यावर आला.

पोलक्स - इथे तर सिरियसही लहान झाला व पृथ्वी फक्त १ पिक्सेल या साइज़ची!

ऑर्क्च्युरस - पोलक्सहून बराच मोठा तारा! पृथ्वी पूर्णपणे अदृश्य! गुरू हा ग्रह फक्त २ पिक्सेल या साईज़चा!

रिगेल - आता येणारा प्रत्येक तारा आधीच्या ताऱ्याहून काही पटींनी मोठा होता.

अल्डरबरन - सूर्य एक ठिपका झाला. आपली सौरमाला आता ( सूर्य हा ठिपका सोडून ) अदृश्य झाली.

बिटेलिगस - इथे सूर्य म्हणजे एखादा जंतू असावा तसा दिसत होता. जवळजवळ दिसतच नव्हता, लिहिले होते म्हणून समजले इतकेच!

इटा कॅरिनो नेब्युला - इथे सिरियस हा तारा एक ठिपक्यासारखा दिसू लागला.

अँटेर्स - इथे पोलक्स हा तारा ठिपका वाटू लागला.

व्ही ३८२ कॅरिने - काही पटीने मोठा तारा!

व्ही ८३८ मोनोसिरॉटिस - काही पटीने मोठा तारा!

व्ही ५०९ कॅसिओपाय - येथे ऑर्क्चुरसच्या आधीचे सर्व तारे लुप्त!

के वाय सिग्नी - बिटेलिगसच्या आधीचे सर्व तारे लुप्त!

एम यु सेफेई - व्ही ८३८ मोनोसिरॉटिस च्या आधीचे सर्व तारे लुप्त!

बायनरी स्टार्स व्ही व्ही सेफेई - व्ही ८३८ खूपच लहान आकाराचा तारा!

व्ही वाय कॅनिस मेजॉरिस - मानवाला 'ज्ञात' असलेला सर्वात मोठा तारा! येथे, व्ही ५०९ कॅसिओपाय हा तारा चार आण्याच्या नाण्याइतका तरव्ही वाय कॅनिस मेजॉरिस हा तारा साधारण 'वाटीच्या' आकाराचा!

( या डिटेल्समध्ये काही चूक झाली असल्यास किंवा त्रूटी असल्यास ती मेल वाचलेल्यांनी / जाणकारांनी दुरुस्त करावे. मला वाटते की व्ही ३५४ नावाचा आणखीन एक तारा होता जो एम यु सेफेईच्या नंतर होता, नक्की आठवत नाही.)

ही मेल वाचल्यानंतर आपले अस्तित्व किती दुर्लक्षनीय, दखल ने घेण्याजोगे व बिनमहत्वाचे आहे असे वाटले.

अवकाश अजब आहे. आपले आयुष्य अगदीच किरकोळ!

:-))