सत्याशी सामना कसा करणार?

सध्या सगळीकडे स्टार प्लस वरील 'सच का सामना' या कार्यक्रमाने धुमाकूळ घातलाय. या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या व्यक्तीला तिच्या अगदी खासगी आयुष्यातल्या नाजूक विषयांवर, खरं तर समाजमान्य नसलेल्या गुपितांवर प्रश्न विचारले जातात. त्या व्यक्तीने दिलेली उत्तरे खरी की खोटी हे पॉलिग्राफ यंत्र ठरवते.

नुकत्याच झालेल्या एका गृहिणीच्या प्रश्नोत्तरानंतर तर फारच खळबळ उडाली आहे. राज्यसभेतही त्यावर ताशेरे ओढले जात आहेत. काही लोकांना हे भारतीय समाजव्यवस्थेला तडा देणारं वाटतंय तर काहींना 'सत्य कबूल करण्यासाठी एक योग्य व्यासपीठ' वाटतंय. काही लोक या कार्यक्रमाची तुलना M TV वरील कार्यक्रमांसोबत करतंय. तर काही वृत्तवाहिन्या या कार्यक्रमाला नको तेवढी प्रसिद्धी देत आहेत, वारंवार जाहिराती दाखवत आहेत.

यानिमित्ताने काही बाबतीत मनोगतींची मते जाणून घ्यायची इच्छा आहे :

१) 'सच का सामना' बद्दल आपल्याला काय वाटतं? सामान्य नागरिकांचे व्यक्तिगत आयुष्य असे चव्हाट्यावर आल्याने भारतीय समाजव्यवस्थेला खरंच काही बाधा होईल का? की लोक हे मनोरंजन म्हणून बघून सोडून देतील?

२) असे कार्यक्रम संपादित (सेंसर) करून दाखवावेत का?

३) या कार्यक्रमाची तुलना M TV वरच्या 'रिऍलिटी शोज्' बरोबर व्हावी का? की M TV वरच्या 'रिऍलिटी शोज'ना हाताबाहेर गेलेली गोष्ट म्हणून सोडून द्यावे?

४) महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 'टीव्हीचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे. तुम्हाला हवं ते बघा, नाही आवडत ते नका बघू. ' हा उन्मत्त युक्तिवाद कितपत योग्य आहे?