ह्या कशा उबदार ओळी...

ह्या कशा उबदार ओळी, शब्द हे कसले पुन्हा
हाय! सच्च्या कल्पनेला चांदणे डसले पुन्हा

"मोगरा, जाई, जुई, चाफ्याविना कविता कशी? "
उमललेले चेहरे झटक्यात आक्रसले पुन्हा

हुडहुडी भरली मनाला, आसवेही तापली
काय माझे विकतचे दुखणेच ठसठसले पुन्हा?

कागदांवर मावली नाहीच का नियमावली?
कायदे धाब्यावरी जाऊनही बसले पुन्हा!

एक कडवे प्रेयसीला, एक आईला दिले
"काय आम्ही वारलो का? " देव खेकसले पुन्हा

ही गजल लिहिताच आला सर्रर्रकन काटा जुना
मी पुन्हा फसताच सारे लोकही फसले पुन्हा

"आयला! असला कवी नाहीच झालेला! " म्हणे
आज केले माफ! पण बोलू नका असले पुन्हा