'ऋतू गझलांचे' सी. डी. प्रकाशन सोहळा संपन्न

मराठी संकेत-स्थळांवर सातत्याने होणाऱ्या साहित्यनिर्मीतीने गेल्या चार-पाच वर्षात मराठी साहित्य-विश्वात अतिशय महत्वाचे स्थान मिळवले आहे. त्याला खरे तर एक- ’सायलेंट रिव्होल्युशन’ हे नाव यथार्थ ठरेल. परंतु प्रिंट मिडीया अथवा आपल्या आजुबाजुला असलेल्या प्रस्थापित साहित्य-विश्वाने त्याची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही.
 संकेत-स्थळावरील ह्या साहित्य-मंथनातून , साहित्य-निर्मीतीची उत्तम क्षमता असलेले अनेक होतकरु परंतु आपल्याला परिचीत नसलेले अनेक कलाकार समोर आले आहेत. मनोगत, सुरेश भट, मायबोली, मराठीगझल, मिसळपाव ही संकेत-स्थळे तर,  कविता, गझल, प्रवास-वर्णने, स्फुट-लेखन, व्यक्ती-चित्रण, विनोदी लेखन, पाक-कृती,ताज्या घडामोडींची चर्चा ह्यांनी अक्षरश: समृद्ध झालेली आहेत. आपले मराठी साहित्य-विश्व त्याने खचितच बहरले आहे. ह्या कलाकारांसाठी ,मी"अमुक-अमुक संकेत-स्थळावर नियमीतपणे लिहितो, आणि मला उत्तम प्रतिसाद मिळतात’ असे म्हणणे, ही खरे तर ’माझे अमुक अमुक साहित्य प्रकाशीत झाले आहे’ असे म्हणण्या इतकीच समर्थ ओळख होतेय; किंबहुना साहित्यीक परिचयाची ती एक नवी परिभाषाच ठरु बघतेय.
ह्या संकेत-स्थळांवर गेली चार-पाच वर्षे सातत्याने कविता आणि गझल लेखन करणाऱ्या श्री.जयंत कुळकर्णी ह्यांच्या ’ ऋतू गझलांचे’ ह्या डोंबिवली येथे संपन्न झालेल्या सी.डी. प्रकाशनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अलिकडेच योग आला. अगदी सहज-सुलभ भाषेत परंतु तरीही आशयगर्भ काव्य-लेखन करणारे म्हणुन श्री. जयंत कुळकर्णी नेटीझन्स मंडळींना सुपरिचीत आहेत. "हा अबोला, हे दुरावे का असे?.. जवळ तू अन मी झुरावे का असे?".. ह्या प्रेमातील अबोल्यावर मोजक्याच शब्दात बोलणाऱ्या ओळी असोत, अथवा "एवढीशी काच आहे आरसा.. केवढा पण जाच आहे आरसा!" ह्या जीवनातील सत्यालाच तापदायक मानणाऱ्या प्रवृत्तीवर प्रभावी भाष्य करणाऱ्या ओळी असोत, श्री.जयंत कुळकर्णी ह्यांची गझल जीवनातील अनुभवांना सच्चेपणाने शब्द-बद्ध करत असल्याचे जाणवते.
सदर सी.डी.तील गझलांना, व्यवसायाने दंत-वैद्यक असलेल्या आणि कलागुणांनी संगीतकार असलेल्या श्री.अश्विन जावडेकर ह्यांनी संगीत दिले असून, सुप्रसिद्ध गायक श्री रविंद्र साठे, विनायक लळित, पल्लवी केळकर, आणि आलाप जावडेकर ह्यांनी त्या गायल्या आहेत.
ह्या प्रकाशन सोहळ्याचे  मुख्य आकर्षण दस्तुरखुद्द श्री. रविंद्र साठे, गझल-नवाझ श्री. भीमराव पांचाळे, आणि उर्दूतील नामवंत गझलकार श्री. संदीप गुप्ते ह्यांची उपस्थिती, हे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री. संदीप गुप्ते ह्यांनी हिंदी-उर्दूतील आपल्या ओघवत्या मनोगतात उर्दू गझल हिंदुस्थानात कशी आली ह्याचा थोडक्यात आढावा घेतला. प्रांतीय भाषांमधे मराठीतील गझल अतिशय प्रगत झाली असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. जयंतरावांच्या गझलेने आपल्याला प्रभावित केले आहे, असे प्रशंसोद्गारहि त्यांनी काढले.
 संगीतकार श्री.अश्विन जावडेकर ह्यांनी ह्या सी. डी. ची निर्मिती प्रक्रिया ही एक निखळ आनंद देणारा अनुभव होता, ह्या भावुक शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
गझल-नवाझ श्री.भीमराव पांचाळे ह्यांनी, गझल जशी गायकाच्या नावाने ओळखली जाते, तशीच ती शायराच्याहि नावाने ओळखली जावी, अशी एक रास्त अपेक्षा व्यक्त केली. शायराला त्याच्या कलेचे श्रेय मिळणे जरुरी असल्याचे ते म्हणाले.
 श्री.रविंद्र साठे ह्यांनी, "गझला म्हणताना आम्हाला बरेचदा गझलेच्या वृत्तात सुधारणा करावी लागते परंतु ह्या सी.डी. तील गझलांमधे वृताच्या अथवा गेयतेच्या दॄष्टीने कुठेहि चूक आढळली नाही" अशी गुणात्मकतेची पावती दिली.
  श्री.जयंत कुळकर्णी ह्यांनी आपल्या हॄद्य मनोगतात आपला लेखन-प्रवास कसा होत गेला ते कथन केले.
   शास्त्रीय संगीतातील, बैरागी भैरव, अहिर भैरव, तोडी, तिलक कामोद इ. रागांचा चाल बांधताना केलेला समर्पक उपयोग हे ह्या सी.डी.चे अजून एक वैशिष्ठ्य आहे. गझल-प्रेमींनी ह्या गझला जरुर ऐकाव्यात.
 श्री. जयंतरावांची शायरी त्यांच्या "त्या तुझ्या मिठीचा मामलाच न्यारा! वादळे मुलायम, मखमली किनारा" ह्या मिसऱ्यासारखीच चिर-तरुण राहो ही शुभेच्छा!
                                                                          -मानस६