मिठीत तोच गोडवा

बराच काळ नांदले शरीर जीवना अता
जुनी रदीफ मागते नवीन काफिया अता

कधी कधी 'न बोलणेच' छान वाटते तुझे
मधेमधे स्वतःकडे हवे बघायला अता

तुझा नवीन प्रश्नही जुनाच वाटला मला
तुला उगीच वाटले 'बरा मिळेल हा अता'

म्हणायचात 'सर्व संपले तुझे, खलास तू'
तुम्हीच चाललात, हा प्रकार शोभला अता?

पुन्हा न थाप मारुनी कधीच दूर जायचो
'तुला हवेच ते', तुझा विचार जाणला अता

मिठीत तोच गोडवा, कधी तुझी, कधी तिची
तुम्हात एकदा समेट व्हायला हवा अता

नसेल वा असेल मद्य, एकसारखेच ते
करून सिद्ध जाहले, 'भरा अता, भरा अता'