माझा धांदरटपणा - किस्सा क्रमांक १

एका रम्य सकाळी घरातील चहा पिऊन झाल्यावर नेहमीप्रमाणे जवळच्या टपरीवर चहा प्यायला व कालचे पश्चात्ताप व आजच्या संभाव्य चिंता 'धुरात' उडवायला निघालो. होंडा ऍक्टिव्हा नावाच्या काळ्या रंगाच्या स्वयंचलित दुचाकीने टपरीवर पोचलो. दुचाकी टपरीबाहेर लावली. आत जाऊन धूम्रकांडीसंदर्भातील काही महत्त्वाच्या आर्थिक उलाढाली पार पाडून निवांत चहाचे घुटके घेत दूर दूर जाणाऱ्या वलयांकडे पाहत आज नोकरीत घडू शकणाऱ्या 'संभाव्य फायरिंग'बाबत स्वतःची बाजू स्वतला सुचवत बसलो.

दहा मिनिटांनी सर्व प्रकारचे आत्मिक समाधान प्राप्त झाल्यावर बाहेर आलो तर दुचाकीवर कुणीतरी परटाकडच्या इस्त्रीच्या कपड्यांचा गठ्ठा ठेवलेला होता. मला राग आला. मी इकडेतिकडे पाहिले. टपरीला लागूनच एक किराणा दुकान होते त्यात काही गिऱ्हाइके उभी होती. मला 'हे कुणी केले' हे लक्षात न आल्यामुळे मी जवळच टपरीचा बाह्यभाग झाडण्याचा अभिनय करणाऱ्या एका लहान मुलाला विचारले की 'हे कपडे इथे कुणी ठेवले? '

तो म्हणाला 'ते त्या दुकानात उभे आहेत त्यांनी'!

मी त्या माणसाला शुकशुक केले. त्याने माझ्याकडे पाहिल्यावर मी म्हणालो 'हे आपले आहे काय? '

त्याने होकारार्थी मान डोलावताच मी तो गठ्ठा उचलून जवळच्या एका कट्ट्यावर ठेवला व दुचाकीला किल्ली लावू लागलो.

पण किल्ली काही लागेना! ते प्रयत्न चालू होते तितक्यातच तो माणूस आला व म्हणाला काय झाले?

तोपर्यंत 'किल्लीने' मला हळूच कळवले होते की 'हे कुलुप माझे नाही'.

ती दुचाकी त्याची होती व त्याने माझ्या दुचाकीच्या अगदी जवळ लावली होती. नादात असल्याने माझे लक्ष माझ्या दुचाकीकडे न जाता त्याच्याच दुचाकीकडे गेले.

नंतर थोडासा प्रेमळ संवाद झाला इतकेच!