कधीतरी तू थांबशील... !

.............................................
कधीतरी तू थांबशील... !
.............................................

रोज मला येतात नव्या विश्वाच्या हाका !
आकाशाच्या पलीकडे माझा आवाका !

बरे नव्हे हे अनोळखी होणे इतकेही...
कुणी घेतल्या, कधी घेतल्या आणाभाका ?

भेटलास मज डौल घेउनी कलहंसाचा...
चोच परंतू मारलीस तू जाताना का ?

निघून कोठे चाललात माझ्या दुःखांनो ?
करा सुखांचा धीट सामना...प्रसंग बाका !

कुणीतरी भेटेल तुम्हालाही उंचीचे...
उंच तुम्हीही व्हाल; परंतू आधी वाका !

हिंस्र होउनी या देहाची भूक गुरगुरे...
आठवतो मी... कधीपासुनी पडला फाका !

वीण उसवली या एकाकी आयुष्याची...
भेट तुझी पण घालत जाई त्याला टाका !

रोज नव्या चौकात मागते भीक बिचारी...
'कुणीतरी द्या लक्तर; माझी अब्रू झाका !'

कधीतरी हे संपतील जन्मांचे फेरे...
कधीतरी तू थांबशील काळाच्या चाका !

- प्रदीप कुलकर्णी

.............................................
रचनाकाल ः  6 ऑगस्ट 2009
.............................................