अर्ध्या गट्टूची किंमत!

"अहो मॅडम, ते नेतायत ती गाडी तुमची आहे का? " माझ्यामागून हे विचारणाऱ्याचा हात कुठल्याबाजूने निर्देश करतोय तिकडे बघत मी पाहिले तर माझीच ऍक्टीव्हा होती. मी धावतच त्या अवैध ठिकाणी पार्कींग केल्याबद्दल गाड्या उचलून नेणाऱ्या गाडीकडे धावत गेले.
"है मिस्टर, हाऊ यू डेअर्ड टू टच माय ऍक्टीव्हा? "
"काय रे, हे कालेजातलं पाखरू काय फिसफिस करून ऱ्हायलंय इंग्लिसमदी? "
"थोबाड संभाळून बोल बे. जास्त फडफड करू नको. गपगुमान माझी गाडी खाली उतरव नाहीतर... " एव्हाना माझा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. योग्य ठिकाणी गाडी लावूनही ही दमदाटी ऐकून घ्यायला मी काही पोचट नाही.
"न्हाईतर काय? "
"नाहीतर काही खास नाही. माझी ऍक्टीव्हा तुम्ही चोरलीत अशी पोलिसात तक्रार करेन फक्त. बस्स! " असे म्हणून मी परत गुरूनानक मध्ये जायला लागले.
"गाडी चुकीची लावत्या त्ये लावत्या आन वर ही शिरजोरी व्हय? "
मी चवताळून वळले. "इथे कोणालाही विचारून घ्या माझी ऍक्टीव्हा बरोबर लावलेली होती की नाही ते. एकजरी साक्षीदार मिळाला तर तुम्ही म्हणाल तितके पैसे देते शिक्षा म्हणून. "
त्याने खरेच एका माणसाला बोलावले.
"काय वो सायेब ही ऍक्टीव्हा हितं या पेवमेंटच्या हर्द्या गट्टूवर व्हती की नाय? "
"गाडी बरोबर लावलेली होती. हो पण आता गाड्या इतक्या खचाखच भरलेल्या आहेत तर आता तुमचा तो अर्धा गट्टूबिट्टू ते काय माहिती नाही. अर्ध्या गट्टूवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मी तितके नीट पाहिले नाही त्यामुळे.. "
"बस्स. बस्स. जालं तुमचं काम. जावा तुमी. " असे त्या माणसाला म्हणत, "आता बोला म्याडम. काय म्हनत व्हता तुमी? म्होरं बसलेल्या सायेबाकडून घ्यावा जा पावती.. "
आता मात्र माझं डोकं जामच सटकलं होतं. याचा साहेब कोण तीसमारखां आहे आणि आणिक काय तारे तोडतो ते पाहावे म्हणून गेले.
"सायेब, हे कालेजातलं पाखरू भिरभिरून ऱ्हायलं व्हतं नो पार्कींगमध्ये गाडी लावून. मांडवली करायचं म्हनतंय.. "
त्या साहेबाची मुक्ताफळे ऐकून मग काय बोलायचे ते ठरवायचे असे ठरवले तरीही गप्प बसायला खूप कष्ट पडले मला.
"किती पैसे आहेत तुझ्याकडे आत्ता? "
"२०० रुपये. "
"नो पार्कींगमध्ये गाडी लावायचे ७५० रुपये घेतो आम्ही... लायसन्स दाखवा. "
"गाडीच्या डिक्कीत आहे. "
"ते माहिती नाही. आत्ता आहे का तुझ्याकडे? नाही. मग त्याचे आणखीन १५० रुपये. गाडीची कागदपत्रं? तीपण नसणारच.. त्याचे आणखीन १५० रुपये. "
एव्हाना डोकं तडकलं होतं माझं. माझी अख्खी पर्सच गाडीच्या डिक्कीत होती ज्यात हे सगळे सामान होते. मी फक्त पैशाचे वॉलेट घेऊन साबुदाण्याची खिचडी घ्यायला गुरूनानकमध्ये गेले होते!
"हे सर्व असंच्या असं लिहून पावत्या फाडा. मी देते १०५० रुपये. अजून काही सुचत असेल तर तेही जोडून घ्या. नाही.. काय आहे.. काही राहून जायला नको ना.. "
"इतकी पावती देत नसतो आम्ही. फक्त ५०ची पावती देऊ. आडनाव सांग तुझं.. "
"शेख. "
"काय? शेख???!!! "
"आडनावातही प्रश्न आहे का? जोडून घ्या त्याचेही १००-२०० रुपये. "
"नाही. तुझ्याकडे बघून वाटत नाही शेख असशील असं.. "
"तूर्तास शेखच आहे.. परवातेरवा धर्मांतर करून ज्यू धर्म स्विकारणार आहे मग बदलेन हवेतर. तसा मला कश्मिरी पंडीतांचा धर्मही पटलाय.. झालंच तर.. "
"बस्स बस्स.. अकलेचे तारे तोडणे बस्स झाले. आडनाव सांग काय ते. "
"शेख. " एकेका अक्षरावर जोर देत मी म्हणाले.
"शेवटचं सांगतोय.. सेन्सिबल बोल.. "
"तुम्ही जितकं सेन्सिबल बोलताय तितकंच मीही बोलतेय. पेव्हमेंटच्या अर्ध्या गट्टूवर गाडीचा काही भाग आला म्हणून ७५० रुपये आणि तुम्ही जप्त केलेल्या गाडीच्या डिक्कीत असलेली कागदपत्रं मी तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणून ३०० रुपये?! तुमच्या या गाडीचा नंबर मी लक्षात ठेवणार आहेच शिवाय तुमचा चेहराही.. हे पाखरू कालेजात फिरायला नाही तर कोर्टात समर्थपणे उडायला जन्मलंय हे तर तुम्ही बघायलाच पाहिजेय साहेब. पावती फाडा... नाव.. मिस. वेदश्री शेख. "
माझी नजर खुनशी झाली होती एव्हाना..
"हे बघा मॅडम, कोर्टाबिर्टाची भाषा काढायची काय जरूर आहे? " अचानक अगंतुगंवरून अहोजाहोवर???.. ह्म्म.. थांब बेट्या..
"पावती फाडताय ना ५०ची? उशीर होतोय तुम्हाला साहेब. ही एक गाडी जी अख्खी पेव्हमेंटवर आहे ती उचलायची बाकी आहे की अजून. एकाच पावतीत इतका वेळ गेला तर... "
"हे बघा मॅडम.. जास्त ताणू नका. पोरांकडून चूक होते कधीकधी. गाडी काहीशी का होईना नो पार्कींगमध्ये होतीच की नाही? मग? चला.. तुमचं नाही माझं नाही.. १५० देऊन टाका. "
"दिडशेची पक्की पावती देणार का? "
"हो. देतो. पब्लिकसमोर पंचनामा करू नका प्लिज. "
दिडशे रुपये दिले.
"मॅडम, आतातरी खरे आडनाव सांगा. "
"जोशी. "
दोन पावत्या फाडून माझ्या हवाली केल्या गेल्या.
"मॅडमची ऍक्टीव्हा उतरव रे खाली. " असे साहेब ओरडले.
ऍ़क्टीव्हा नीट जागी लावायला मी घेऊन जात होते तर त्या साहेबाचे शब्द ऐकू आले.
"काय रे बेअकलीच्या.. पाखरू पाखरू काय करत होतास? ही कुठल्यातरी राजकारण्याची नातेवाईक असणार नक्कीच. कोणाच्याही गाड्या उचलत जाऊ नको.. कळलं काय रे कावळ्या? "
त्या बेअकलीच्या साहेबाचा झालेला गैरसमज दूर करायच्या भानगडीत मी पडले नाही. हकनाक दिडशे रुपयांचा भुर्दंड पडला असला तरी मला पाखरू म्हणणाऱ्याचा कावळा झाल्याबद्दल मात्र अतोनात आनंद झाला होता. अर्ध्या गट्टूची किंमत पुरती कळली मला आता.. १५० रुपये!