बोलट १ - के. के. मेनन

'नाटका - सिनेमात ज्याची चलती आहे तो नट, म्हणजे लौकिकार्थाने जो हीरो तो नट आणि बाकी सारे 'बोलट'' या भिकार कोटीचा पहिला बळी जनार्दन नारो शिंगणापूरकर असेल, पण असे सगळे तिसऱ्या चौथ्या रांगेतले बोलट काही जनार्दन नारोइतके भिकार असतात, असे नाही. त्यातले काही बोलट हे त्या नटांना खाऊन टाकतील इतके सामर्थ्यवान असतात; पण नाटका-सिनेमाची दुनिया अशी विचित्र आहे की जिथे प्रसंगी नवीन निश्चल, अनिल धवन, विक्रम, विजयेंद्र घाटगे, सचिन पिळगावकर असले नट चालून जातात. अशाच काही त्यामानाने अपरिचित कालच्या आणि आजच्या 'बोलटां'चा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न.
यातला पहिला बोलट म्हणजे के.के.मेनन. पुण्यात आणि मुंबईत लहानपण, मुंबईतून पदवी (बी. एस‌‌.सी) आणि पुणे विद्यापीठातून एम. बी. ए. असे चांगल्यापैकी शिक्षण घेतलेला हा 'किचू' म्हणजे कृष्णकुमार मेनन. (केके या गायकाशी याची गल्लत करू नये) चांगल्यापैकी शिक्षण एवढ्यासाठी की हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना  शिक्षण,वाचन,लेखन याचे बऱ्यापैकी वावडे आहे. संस्कारांचे तर आहेच आहे. (चिरंजीव सलमान खान, सन्माननीय संजय दत्त, आदरणीय फरदीन खान वगैरे. कपूर खानदानातला पहिला पदवीधर कोण? रणवीर कपूर? चिकित्सकांनी अधिक शोध घ्यावा) अमिताभ बच्चन, बलराज सहानी, नसिरुद्दिन शाह वगैरे अपवादच. अन्यथा गेल्या जमान्यातली एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते तसे. 'पुस्तक? मी तर आयुष्यात एकही पुस्तक वाचेलेले नाही!' आणि ही अगदी यशाच्या शिखरावर वगैरे पोचलेली अभिनेत्री. तर ते असो. म्हणजे के. के. हा तसा मराठी माणूसच. त्याला पदव्युत्तर शिक्षण संपवूनही जेमतेम दहा वर्षे झाली. म्हणजे दरम्यान 'चित्रपटात काम कण्यासाठी गोंडस रुपडे असणे आवश्यक नाही' हे अगदी हिंदी चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनाही पटले होते. के. के तसा सामान्य रुपाचाच, पण जरा बरे कपडेबिपडे घातले की स्मार्ट दिसणारा. एरवी एकदोन दिवसाची दाढी वाढली की बाकी चेहऱ्यावर चोरून गावठी दारू विकणाऱ्याची कळा. केकेचे डोळे मात्र किंचित सुजल्यासारखे वाटत असले तरी (का ते येथे महत्त्वाचे नाही) बोलके आहेत.आधी जाहिरात कंपन्यांमध्ये वगैरे काम करणाऱ्या के. के. ची चित्रपटसृष्टीतली सुरवात चाचपडत अशीच झाली. २००३ साली प्रकाशित झालेल्या 'हजारों ख्वाईशे ऐसी' ने तो प्रकाशात आला. त्याला मिळालेल्या सुरवातीच्या भूमिका नकारात्मक, किंचित विकृतीकडे झुकणाऱ्या अशा होत्या, पण त्यात केकेने स्वतःला टाईपकास्ट होऊ दिले नाही (थोडक्यात त्याचा नाना पाटेकर वा काशिनाथ घाणेकर झाला नाही - अजूनतरी!) 'दीवार' आणि 'सरकार' मध्ये तो अमिताभच्या पुढ्यात आत्मविश्वासाने उभा राहिला. (केकेचे बालपण पुण्यात गेले हे कळाल्यावर 'सरकार' मधले मराठी संवाद त्याने इतक्या सफाईने कसे म्हटले हे ध्यानात येते. त्या मानाने अमिताभ मराठी बोलताना अगदी अवघडल्यासारखा वाटतो. 'सरकार' मध्येही आणि 'लक्ष्य' मध्येही. पण तेही असो. 'हम तो यू. पी. वाले हैं, हम तो हिंदी में बात करेंगे..' वगैरे ) 'सरकार' मध्ये रामगोपाल वर्माने केकेच्या भेदक नजरेचा सुरेख वापर करून घेतला आहे. केकेने साकारलेला विष्णू हा चित्रपटनिर्माता आहे, पण बापाच्या साम्राज्याची गुर्मी आणि मस्तीत अगदी बेताल झालेला आहे. आपल्या चित्रपटाची नायिका ही जणू आपली खाजगी मालमत्ताच आहे, या समजातला मस्तवाल, उर्मट, व्यसनी विष्णू केकेने समजून केला आहे. पुढे 'कार्पोरेट' मध्ये केकेला मोठा आणि महत्त्वाचा रोल मिळाला. 'कार्पोरेट' मधला रितेश हा एकदा अपयश पचवून बसलेला आहे. आपली बहीण, आपल्या उद्योगपती मेहुणा आणि आपली प्रेमिका यांच्यासमोर त्याला आता काही करून दाखवायचे आहे. यात त्याच्यासोबत असलेली निशीगंधा एकदा त्याला एक संपूर्ण प्रोजेक्ट देते आणि तो त्याने मॅनेजमेंटपुढे ठेवावा असे सुचवते. या प्रोजेक्टचे श्रेय त्याला मिळावे आणि त्याची प्रतिमा उंचावावी अशी तिची भूमिका असते. हे तिने सांगताच केकेचा राकट चेहरा एकदम मृदू होतो. त्याच्या अफिमी डोळ्यांत विलक्षण प्रेमाचे, कृतज्ञतेचे भाव येतात आणि तो निशीगंधाच्या कपाळाचे चुंबन घेतो. 'कार्पोरेट' मधला मला हा आवडलेला प्रसंग.
'हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि. ' या चित्रपटातली केकेची पार्थो सेनची भूमिका अफलातून आहे.  चारचौघांत अवघडलेला, न्यूनगंडग्रस्त असा हा पार्थो. आपली बायको आपल्यापेक्षा रुपाने, गुणाने खूप उजवी आहे, याचा गंड बाळगणारा. या पार्थोला कुणीतरी फसवून शीतपेयातून ड्रग्ज घालतो आणि मग हा लाजरा, माणूसघाणा बंगाली जो सुटतो, त्याला तोड नाही. 'सजना की वारी वारी.. ' या गाण्यात केकेने जो 'पावटा' नाच केला आहे, तो केवळ भन्नाट.
'लाईफ इन अ मेट्रो.. ' हा तसा धक्का देणारा चित्रपट. त्यात केकेने साकारलेला रणजीत या 'जनरेशन एक्स' चा प्रतिनिधी आहे. मूल्यं, निष्ठा वगैरेंचा त्याच्याशी दूरान्वयानंही काही संबंध नाही. आपल्या सेक्रेटरीशी शारीरिक संबंध ठेवताना त्याला कसलाही अवघडलेपणा वाटत नाही. तिचा उपभोग घेऊन झाल्यावर ती सुन्न होऊन 'मला आता माझ्यावर खरोखर प्रेम करणारा कुणीतरी पाहिजे आहे. ' असं म्हणते तेंव्हा केकेचे 'तो फिर ढूंढ लो ना कोई. रोका किसने है? ' हे 'मॅटर ऑफ फॅक्ट' बोलणे एकदम भानावर आणून जाते. आपले विवाहबाह्य संबंध आपल्या बायकोला कळाले या शंकेने उध्वस्त झालेला, पण तिचंच काहीतरी अफेअर आहे हे लक्षात आल्यावर हळूहळू पुरुषी अहंकार जागृत झालेला रणजीत कोणत्याही पिढीतल्या संशयी पुरुषाचे प्रतिक वाटतो. बायकोबाबतचे - म्हणजे बायकोच्या शरीराबाबतचे त्याचे 'पझेसिव्ह' असणे आणि ती तिच्या प्रकरणाची कबुली देऊन ढसाढसा रडत असताना त्याचे (जणू तिला अधिक घायाळ करण्यासाठीच की काय) 'सोयी हो उसके साथ? डिड ही यूज माय बेडरुम? बच्ची तो मेरी है ना? ' हे विचारणे म्हणजे संपूर्ण पुरुषी इतिहासातील संशयग्रस्त मनाचे प्रश्न आहेत. या प्रसंगातील केकेचे खुनशी प्रश्न इतके प्रभावी आहेत, की त्यांसमोर आपण रडताना शिल्पा शेट्टी फारच विनोदी दिसते हे विसरून जातो.
'मुंबई मेरी जान' चित्रपटात मुस्लीम समाजाविषयी घाऊक तिटकारा असणाऱ्या एका हिंदू तरुणाची तशी लहान भूमिका केकेने साकारली आहे. ही भूमिका अधिक वाढवून प्रभावी करता आली असती, असे माझे मत आहे (परेश रावलचे कंटाळवाणे फुटेज टाळून). केकेचा 'गुलाल' हा चित्रपट बाकी पहायचा राहिला याची खंत वाटते.
'कार्पोरेट' या चित्रपटात एक 'टेक ओव्ह्र डील' करताअना केके म्हणतो, 'अगर आपको हमारी डील पसंद आ गयी, तो आप हमे दाद दे सकते है'. केकेच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल त्याला अशीच दाद द्यावीशी वाटते.