भजन

वेदात सांगितलेल्या प्रकारात, देवाचे नामस्मरण किंवा भजन हा प्रभावी भक्तीचा एक प्रकार आहे. यात देवाचे नाव गाण्यात घेतात. भजनाला किंवा किर्तनाला स्वतःची अशी सुंदर ओळख आहे. ज्यावेळेस संगीत साधनाच्या लयीत भजन किंवा किर्तन म्हटले जाते तेंव्हा त्याच्या सुंदर स्वरमाधुर्यात माणूस खूप आनंद घेतो व आपले दुःख कांही काळ विसरतो. अत्यंत सुंदर प्रासादिक भाषेत ही भजने वेगवेगळ्या देवतांना उद्देशून केलेली असतात. या भजनात निसर्गाचे सुंदरता वाढवणारे अतिशय सुंदर वर्णन केलेले असते. तसेच देवांच्या गुणांचे तपशीलवार वर्णन केलेले असते आणि देवाकडे आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा प्रकट केलेल्या असतात.

साधारण माणसाला तपश्चर्या करण्यासाठी सभोवतालचे वातावरण उपयोगी पडत नाही व तशी त्याची कुवतही नसते. ध्यानधारणा करणे, योग करणे किंवा धर्मग्रंथाचे अध्ययन करणे हेही त्याला तेवढेच कठीण असते. मग अशा असंख्य साधारण लोकांची मुक्तता या युगात कशी करावयाची? शास्त्रांनी ही परिस्थिती ओळखली व त्यानी सूचित केले की जर देवाचे गुणगान करणारे पवित्र भजन श्रद्धेने म्हटले तर त्याना देवाचे अस्तित्व समजून येईल.जर देवाच्या पवित्र नावाचा दृढविश्वासाने व मनापासून जप केला तर देवाची कृपा त्याच्यावर होईल असा साधा व सोपा परिणामकारक मार्ग सांगितला आहे. या पद्धतीला कोणतीही जादा साधने लागत नाहीत, तसेच कोणतीही जागा व कोणतीही वेळ चालते. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता अशा प्रकारची भक्ति सर्वांना करता येईल. माणसाच्या मनातील अहंकार, लोभ व लालसा या दुर्गुणांना नष्ट करणारे अत्यंत गुणहारी औषध म्हणजे देवाच्या पवित्र नावाचा जप होय. शब्दांचा अर्थ न कळता अनावधानाने जरी देवाचे पवित्र नामस्मरण केले तरी त्याचा आश्चर्यकारक परिणाम घडलेला दिसतो, हे गुणकारी औषध जरी आपघाताने घेतले तरी ते आपल्या शरीरातील दोष नाहिसे करते. आजारी माणसाला या औषधाची माहितीची आवश्यकता नसते, तरी ते औषध परिणामकारकरित्या आजार नाहिसा करते

अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देताना माणूस बऱ्याचवेळा असहाय्य व निराश होतो. हे आघात सोसण्यासाठी आपल्या धर्माने बरेच वेगवेगळे उपाय सुचवले आहेत. ह्या कलियुगात देवाच्या पवित्र नावाचा जप केल्यास मनुष्यास कधीच अपयश येणार नाही. त्याला भितीपासून मुक्ती मिळेल. धर्मग्रंथात लिहिलेल्या देवाच्या अनेक पवित्र नावाचा जप केला तर जगात अशी कोणतीही अडचण नाही की जिच्यावर मात करता येणार नाही किंवा अशी कोणतीही गोष्ट नाही की जी मिळवता येणार नाही. प्रत्येक पवित्र नावात एकप्रकारची धार्मिक शक्ती आहे. पण त्याच्या गुणकारत्वा विषयी शंका घेणे म्हणजे मूर्खपणा आहे. एकादा आजारी माणूस औषधाची गोळी घेतांना कधीही ती गोळी कुठल्या घटकांनी बनली आहे याचे पृथःकरण करत नाही. त्याचा परिणाम चांगला की वाईट होईल याची माहिती नसूनही तो ती गोळी घेतो. तसेच इश्वराचे नामस्मरण करताना त्याच्या परिणामाविषयी मनांत शंका कोणीही ठेवू नये. ज्याप्रमाणे एकाद्या मोठ्या हॉलमधील अंधार लहानशी पेटवलेली मेणबत्ती नाहिसा करते किंवा वाळलेल्या गवताच्या भाऱ्याला काडेपेटीतील एकादी काडी आग लावून नष्ट करते त्याप्रमाणे देवाचे पवित्र नाव घेतल्याने माणसाचे दुर्गुण नष्ट होतात. देवाच्या पवित्र नावाचा पुन्हा पुन्हा जप केला तर भक्ताचे मन पवित्र होते व देवाबद्दलचे त्याचे विचार ठाम होतात. सारांशाने असे म्हणता येईल की सतत देवाचे नामस्मरण करणे म्हणजे देवाला केलेली आर्त प्रार्थनाच होय. ज्याप्रमाणे प्रत्येक विचाराला त्याच्या शब्दांची किंवा अक्षरांची ओळख आहे त्याप्रमाणे प्रत्येक मूळ अक्षर त्याच्यातील गूढ अर्थ विशद करते. मूळ अक्षराचे सतत स्मरण करणे हे धार्मिक जागरुकता निर्माण करते व इश्वराचे प्रेम भक्ताच्या हृदयात वाढत जाते.

ज्या मज्जातंतूवर नवीन औषधाचा किंवा उपकरणांचा उपयोगहोत नाही त्यावेळेस नुसते देवाचे भजन ऐकल्यास कल्याणकारक परिणाम होवून मज्जातंतूत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.