उरी भावनांचा महापूर आहे
मिठीचा किनारा परी दूर आहे
तिचे स्पष्ट नाकारणे चालते पण
रुकारात संदिग्धसा सूर आहे
तिची वाट पाहून शिणलेत डोळे
पहा स्वप्नरंजन किती क्रूर आहे
"दिवेलागणीला तुझे नेत्र ओले ?"
नयनदीप विझले तरी धूर आहे...
मना, लाभले काय हळवेपणाने ?
फुका रक्तरंजित उभा ऊर आहे