हरलो बुवा !

      एक जादुगार एका छोट्या जहाजावर प्रवाशांचे मनोरंजन आपल्या जादूच्या प्रयोगाने करत असतो.प्रवासी नेहमी बदलत असल्यामुळे
त्याच्या प्रयोगांची संख्या फारशी जास्त नसूनही तेच तेच प्रयोग करूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असे आणि त्याचा व्यवसाय
व्यवस्थित चाले.वर्ष दोन वर्षे याप्रमाणे जातात.त्या काळात त्या जहाजावर असलेला एक पोपट त्याचे हे प्रयोग पहात असे आणि अनेकदा पाहून सर्व प्रयोगांचे बारकावे त्या पठ्ठ्याच्या बरोबर लक्षात आले.आणि मग कोणतीही जादू करताच लगेच त्यातील रहस्य   लगेच प्रेक्षकांना सांगून त्याने जादुगाराची पंचाइत करायला सुरवात केली .उदाहरणार्थ जादुगाराने फुलांचा गुच्छ नाहीसा केला की हा ओरडू लागे "त्याच्या पाठीमागे पहा, त्याच्या पाठीमागे पाहा "अशाने जादुगाराच्या जादूतील गंमतच गेली.आणि लोकांना त्यात काहीच तथ्य नाही असे वाटू लागले. त्या नालायक पोपटाची मुंडी पिरगळावी असे जादुगाराच्या अनेक वेळा मनात आले पण तो तसे करू शकत मव्हता कारण त्या पोपटाचा मालक होता खुद्द जहाजाचा कप्तान.
     एके दिवशी अचानक जहाजास भोक पडून जहाज बुडू लागले .जादुगार स्वत:स वाचवण्याच्या धडपडीत जहाजाच्याच एका तुटलेल्या फळीस धरून तरंगू लागला. बरोबर त्याच  फळीच्या दुसऱ्या टोकास तो पोपटही बसला होता.दोघे एकमेकाकडे पहात होते.बोलत कुणीच नव्हते.अखेर तीन दिवस असेच गेल्यावर त्या पोपटास कंठ फुटला आणि तो जादुगारास म्हणाला " आज मात्र मी हरलो बुवा,ही जादू काही नाही   ओळखता येत आपल्याला. खर सांग तू जहाज कुठे गायब केलस ?"