नियती

साडेसातच्या लेक्चरला निघायला रमाला आज थोडा उशीरच झाला होता.  आदल्या रात्री आपल्या दहावीतल्या लेकाबरोबर अभ्यास करत ती बसली होती.  त्यानंतर तिचा अभ्यास आणि थोडंसं अवांतर वाचन या सगळ्यात रात्रीचा एक वाजून गेला.  तरीही पहाटे उठणं काही चुकलं नव्हतं.  सवयीने ती कामं उरकत होती.  बहुतेक वेळा रमा लेक्चरनंतर महाविद्यालयाच्या उपहारगृहातूनच कॉफी आणि नाश्त्यासाठी काहीतरी मागवायची. पण आज आदिसाठी, तिच्या लेकासाठी डब्यात सँडविचेस होते, म्हणून ती ही डबाच नेणार होती.  आणि तिला उत्तरासाठीही आवर्जून काहीतरी न्यायचच होतं.  उत्तरा तिच्या महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणारी एक प्राध्यापक.

काही दिवसांपूर्वी, म्हणजे सत्राच्या सुरुवातीला हेडक्लार्क कामठे रमाच्या रुममध्ये उत्तराला घेऊन आले. " या प्रा. उत्तरा मुरलीधरन. आपल्याकडे या सत्रापासून शिकवणार आहेत.  पहिल्या आणि दुसऱ्या तासाच्या मधल्या वेळात या तुमच्या खोलीत थांबल्या तर चालेल का?" रमाची काहीच हरकत नव्हती. महाविद्यालयाचे बहुतेक वर्ग आणि कॉमन रुम दुसऱ्या इमारतीत असल्यामुळे या इमारतीत साडेनऊ पर्यंत तसा शुकशुकाटच असायचा. रमाचं पहिलच लेक्चर असल्यामुळे तिची खोली मात्र उघडली जायची.  उत्तरा केरळची होती.  तिचा दाक्षिणात्य चेहरा, दाक्षिणात्य हेल घेऊन आलेलं पण अचूक इंग्लीश आणि जमेल तस हिंदी, कपाळाला रोज न चुकता भस्म, चमकदार, हसरे डोळे आणि त्यातलं वयाला साजेसं कुतुहल हे सगळंच रमाला आवडून गेलं. गुरुवार ते शनीवार रोज तिची आणि उत्तराची भेट व्हायला लागली.  सुरुवातीला एकमेकींना हाय, हॅलो म्हणण्यापुरतीच असलेली ओळख हळूहळू वाढायला लागली.  उत्तराच्या प्राध्यापकी कारकीर्दीची ही सुरुवातच होती.  रोज तिच्याकडे वर्गातल्या, विद्यार्थ्यांच्या वागण्याबद्दलच्या नवनव्या गोष्टी असायच्या. रमाला रोज ती त्या सांगायची.  " मॅडम. यू नो व्हॉट हॅपन्ड टुडे... " अशी सुरुवात ऐकली की आता काहीतरी किस्सा ऐकायला मिळणार अशी रमाची खात्री व्हायची.  मात्र लेक्चरसाठीचा अभ्यास चोख केलेला असायचा.

उत्तराचं दीडदोन वर्षापूर्वीच लग्न झालेलं होतं.  तिचा नवरा कुवेतमध्ये नोकरी करत होता. ती सुद्धा काही दिवस तिकडेच होती. आता मात्र तिने आपल्या करीअरला सुरुवात केली होती.  गावात ती तिच्या मावशीकडे राहायची. इकडचं वातावरण, परिसर हे सगळचं तिच्यासाठी खूप नवीन होतं.  ती हळूहळू सगळ्याशी जुळवून घेत होती.  गौरी गणपतीचा सणही तिने अंगभूत उत्साहाने अनुभवला.  शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे जाऊन गौरीची आरास पाहून आली. दुसऱ्या दिवशी लगेच रमाजवळ त्याचं भरभरून वर्णन!  विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर मात्र जाम वैतागली होती. " क्या मॅडम. कल कुच बी पडाई नही हुआ, कितना शोर करते है! " तरी रमाने तिला सांगितले की बाई ग, स्वाईन फ्लू मुळे हे जे काही होतं ते फारच कमी होतं. 

रमा काही थोड्याशा ओळखीवर गळ्यात पडणाऱ्यांपैकी नव्हती. पण उत्तराच्या लाघवीपणामुळे त्यांच्यातलं अंतर कमी होत गेलं.  सकाळी उत्तरा यायची तेंव्हा रमा ने तिचा डबा उघडलेला असायचा. उत्तरालाही ती आग्रह करायची, पण तिला बहुतेक वेळा उपास असयचा.  काही खास केरळीयन रेसीपीज ही तिने रमाला सांगितल्या होत्या. केरळबद्दल ती नेहमीच भरभरून बोलायची.  रमाच्याही नकळत तिला उत्तराची, तिच्या ठराविक वेळ तिथे असण्याची, तिच्या विषयावर किंवा महाविद्यालयाच्या एखाद्या उपक्रमावर तिच्याशी चर्चा करण्याची सवय लागून गेली.

आज उत्तराचा उपास नव्हता.  म्हणून आज रमाने तिच्यासाठीपण सँडवीचेस बनवून घेतले होते.  आजचं तिचं लेक्चर संपलं तरी उत्तराचा पत्ता नव्हता.  ती चौकशी करण्यासाठी म्हणून ती ऑफिसात कामठ्यांकडे गेली. ते गंभीर होते. नेहमीसारखा कपाळाकडे सॅल्यूटच्या अविर्भावात हात नेऊन ते 'नमस्ते' असंही म्हणाले नाहीत, तेंव्हाच रमाला काहीतरी वेगळं जाणवलं. 'बसा' ते म्हणाले. 'सकाळी फोन आला होता.  आपल्याकडे त्या मॅडम आहेत ना, उत्तरा मॅडम, त्या आज येणार नाहीत कारण त्यांचे मिस्टर एक्स्पायर झाले. " "क्काय? " रिकाम्या ऑफिसात रमाचा आवाज चांगलाच घुमला.  तिला कालचाच संवाद आठवला.  उत्तरा सांगत होती, "तो येणार आहे."  ईदची सुट्टी, उत्तरालाही तीन दिवस आलेली सलग सुट्टी, तिचा केरळला नवऱ्याला भेटायला जायचा बेत आणि हे सगळं सांगताना फुललेला मनमोराचा पिसारा, चेहऱ्यावरची उत्कंठा, लाज आणि अपरिमीत आनंद यांची रंगपंचमी यातलं काहीच ती रमापासून लपवू शकली नव्हती.  रमानेही मग तिची भरपूर थट्टा करून तिला छळले होते. आजच दुपारी ती केरळला जायला निघणार होती.

"आजच्या याच गाडीने त्या नवऱ्याला भेटायला जाणार होत्या.  गाडी तीच, जाणारही त्याच पण कारण किती वेगळं! " कामठ्यांच्या या वाक्याने रमा भानावर आली.  कामठ्यांसारख्या 'कडक' माणसाच्या डोळ्यात सुद्धा पाणी तरारले होते. " माझी धाकटी मुलगी त्यांच्याएवढी आहे" ते म्हणाले. " तुम्ही नीट ऐकलंत ना.. दुसरं कोणीतरी असेलं.... " रमा पुटपुटली.  पण 'बातमी' खरी होती. अशा घटना असणाऱ्या कथा, कादंबऱ्या रमाने वाचलेल्या होत्या. पण आपल्या निकट परिचीत व्यक्तीबाबत ही असे काही घडू शकेल हे तिला पचवायला जड जात होते.

उत्तरा परत येईल ना? डिसेंबरमध्ये ती नेट-सेट करणार होती. ती कशी तोंड देईल याला? किती लहान आहे ती! पुढे काय? रमाचे विचार दाही दिशांना धावत होते. उत्तराशी लगेच बोलणे शक्य नव्हते.  रमाने तिच्या इतर मैत्रीणींनाही ही बातमी सांगितली. वाईट तर सगळ्यांनाच वाटले पण रमाइतकी उत्तराशी कोणाची जवळीक नसल्याने त्या चटकन तो विषय मनावेगळा करू शकल्या.  रमाच्याही विचारांना दिशा सापडली. लगेच नाही तरी काही दिवसांत उत्तराशी बोलायला पाहिजे. उत्तरासारख्या जीवन रसरसून जगण्यासाठी उत्सुक असणाऱ्या व्यक्तीने नियतीच्या अशा क्रूर घावामुळे मिटून जावे, असे व्हायला नको. तिच्या कुटुंबाविषयी काही माहिती नाही, पण आपण मात्र नक्कीच तिला यातून बाहेर काढायला मदत करायची असे ठरवून ती तिच्या टेबलाकडे येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्याला सामोरी गेली.