येत्या विधानसभा निवडणुकीत भाषिक अल्पसंख्यांकांचे कार्ड वापरण्याचा मोह टाळा

मराठी भाषा, समाज व संस्कृतीसाठी काम करणाऱ्या संस्थांचे
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन – १५ सप्टेंबर २००९
येत्या विधानसभा निवडणुकीत भाषिक अल्पसंख्यांकांचे कार्ड वापरण्याचा मोह टाळा

राष्ट्रीय कॉंग्रेसचे संसद सदस्य श्री संजय निरुपम यांनी महाराष्ट्रातील मुंबईसह उपनगरात हिंदी भाषकांच्या लोकसंख्येतील प्रमाणाच्या आधारावर त्यांच्यासाठी ३५ मतदारसंघांची  मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षातील उत्तरप्रदेशीय कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे डावपेच आखायला सुरुवात केल्याचे वर्तमान पत्रांतील बातम्यांवरून निदर्शनाला आले आहे. या सर्व घटनांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.
राष्ट्रीय कॉंग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री  कृपाशंकर सिंह यांनी गृहराज्यमंत्री असताना बहुसंख्य उत्तर भारतीयांची  विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करून त्याचे समर्थनही केले होते. उत्तरप्रदेशींना सत्तेतही बरोबरीचा वाटा मिळाला पाहिजे अशी त्याची मागणी असते. गुजराथी आणि दाक्षिणात्य समाजाची मुंबईत लक्षणीय लोकसंख्या असूनही त्यांनी (निदान उघडपणे) अशी मागणी केल्याचे ऐकिवात नाही.
धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर निवडणुकांत विजय मिळवण्याचे डावपेच सुरुवातीला यशस्वी ठरतात. (अशा डावपेचांमुळेच मुंबईच्या नशिबी मराठी भाषाही न समजणारे व महाराष्ट्र, मराठी भाषा, समाज व संस्कृतीशी काहीच देणेघेणे नसणारे उपरे खासदार आले आहेत. ) आता हे उपरे आपली किंमत वसूल करू पाहात आहेत. मुंबई महापालिकेच्या कारभाराची भाषा हिंदी करण्याची मागणी मागे झाली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजातही हिंदीचा समावेश करण्याची मागणी उद्या होऊ शकते. (आजही काही मंत्री प्रश्नांची उत्तरे हिंदीतून देतात). आज लोकसंखेच्या बळावर केवळ विधानसभा निवडणुकीची तिकीटेच मागितली जात आहेत. उद्या मंत्रिमंडळातही वाटा मागितला जाईल. हे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. दुर्दैवाने अशी परिस्थिती केवळ महाराष्ट्रातच येऊ शकते.
अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना एक पथ्य पाळण्याची विनंती करतो. ते म्हणजे (जे अनेक पिढ्या महाराष्ट्रात राहातात व उत्कृष्ट मराठी बोलतात त्यांचा अपवाद करता) कोणाही अमराठी व्यक्तीला विधानसभेचे तिकीट देऊ नका. आपली राजकीय लढाई आपापसात होऊ द्या. उपऱ्यांच्या मदतीने स्वकीयांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू नका.
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षातील मराठी कार्यकर्त्यांनाही आमचे सांगणे आहे की नेत्यांना मराठी उमेदवारच द्यायला भाग पाडा. तुम्हाला राजकीय महत्त्वाकांक्षा आहे की नाही? तुम्ही काय केवळ मांडवातील सतरंज्या उचलण्याचेच काम करणार काय?
   शेवटी महाराष्ट्रातील मराठी जनतेला आमचे आवाहन आहे की जे पक्ष अमराठी उमेदवार उभे करतील (मग ते कुठल्याही मतदार संघात असोत) त्यांच्या उमेदवाराला मते देऊ नका. आजवर अनेक अमराठी उमेदवार मराठी समाजात सामावून गेले आहेत त्यामुळे त्यांना इथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळाली आहे. मात्र संजय निरुपम, कृपाशंकर सिहं, यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. अशा फुटीरतेच्या जाणिवेतून उभ्या राहणाऱ्या पस्तीस काय एकाही उमेदवाराला मत देउन विजयी करू नका. कारण हेच लोक महाराष्ट्राच्या व  मराठी समाजाच्या मुळावर येणार आहेत.   

प्रा. दीपक पवार, मराठी अभ्यास केद्र        deepak@marathivikas.org  ९८२०४३७६६५
 शांताराम दातार –  मराठी भाषा, संरक्षण व विकास संस्था                                   shantaramdatar@yahoo.com
प्रभाकर पुरंदरे – मराठी महासंघ                     ९८१९६०१८५४
प्रा. अनिल गोरे – समर्थ मराठी  marathikaka@gmail.com  ९४२२००१६७१