पहिला धडा

केशव गजाभाऊ कदम. वय वर्षे २२.
नोकरीत फारसा रस नसलेला एक पदवीधर;
आई वडील नोकरी शोध म्हणून मागे लागलेले असताना आजकाल काही नवे सवंगडी भेटलेला, आपणही त्यांच्यातलंच एक व्हायचं या वेडानं हळूहळू झपाटायला लागलेला एक पदवीधर;
ना उच्च, ना कनिष्ठ, नुसत्याच मध्यमवर्गाचा तरूण प्रतिनिधी असा एक पदवीधर.

गेले काही दिवस केशव खूप उत्साहात होता. निवडणुका जाहीर होणार होत्या. पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मिरवणारे केशवचे नवे सवंगडी त्याला अधूनमधून ‘समाजविधायक’ कामांमध्ये मदत करायला बोलवत असत. केशवनं ओळखलं होतं की हीच संधी आहे. आपण मन लावून, तहानभूक विसरून, झपाटून पार्टीचं पडेल ते काम करू. कॉलेजातली पदवी तर मिळवून झाली पण आता या निवडणुका संपेस्तोवर आपल्या नावापुढे ‘पार्टीचा तरूण कार्यकर्ता’ ही पदवीही झळकायलाच हवी.
त्यादृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे हे देखील केशवनं तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा सातआठ दिवसांपूर्वी दिनेशकरवी संभादादांनी त्याला अनपेक्षितपणे बोलावून घेतलं होतं. त्यादिवशी दादांनी त्याच्यावर सोपवलेली एक महत्त्वाची कामगिरी आज त्याला पार पाडायची होती.
‘आता आई-आप्पांना समजेलच थोड्या दिवसांत की त्यांचा मुलगा नऊ ते पाच नोकरीच्या बंधनात अडकण्यासाठी जन्माला आलेलाच नाही. ’... संभादादांच्या गोटात शिरण्यात आपण यशस्वी झालो याचा केशवला कोण आनंद झाला होता.

पहाटे पहाटे केशव उठला तेव्हा तो याच धुंदीत होता. चहा आंघोळ उरकून तो बाहेर पडला तेव्हा बाहेर फटफटलं पण नव्हतं. सदा आणि नितीन त्याला स्टेशनवरच भेटणार होते. त्या दोघांना कामाबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती अजून. संभादादांनीच सांगितलं होतं - ‘ओळखीच्या एकदोघांना बरोबर घे पण अगदी आदल्या दिवशी सांग त्यांना. आधीपासून गवगवा केला की दहा जण गोळा होतात! ’ केशवला वाटलं, संभादादा किती बारीकसारीक गोष्टींचा विचार करतात; अश्याच माणसांचा निभाव लागतो राजकारणात.
पहाटेच्या पहिल्या लोकलपाठोपाठ केशवही स्टेशनात शिरला. नितीन आणि सदा आधीच येऊन पोचले होते.
गाडी सुटली तसं आपल्याला उजाडता उजाडता भायखळा भाजी मार्केट का गाठायचं आहे ते केशवनं त्या दोघांना समजावून सांगायला सुरूवात केली. संभादादांनी सांगितलं होतं तसंच, त्यांच्याच पद्धतीनं...

"हे बघ, केशव, मी तुला ये-जा म्हणणार हं, आधीच सांगतो. त्यामुळे आपलेपणा वाढतो. आपल्या दिनेशनं सांगितलं पोरगा कॉलेजात शिकलेला आहे, कामाचा आहे म्हणून. म्हटलं घे बोलावून त्याला. कामाची सुरूवात करायला याहून चांगला मुहूर्त कुठला! तर केशव, पुढच्या गुरूवारी आपल्या जानगुडेसाहेबांचा वाढदिवस आहे. जानगुडे साहेब कोण? माहीत आहे ना? अरे, अश्या गोष्टी आता यापुढे लक्षात ठेवायच्या, बरं का, एकदम पर्फेक्ट! यंदाच्या निवडणुकीत त्यांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर जानगुडेसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं स्वस्त भाजी विक्रीची मोहीम चालवायची आहे. आपल्या पार्टी ऑफिससमोरच भाजी विक्रीचा स्टॉल उभारल जाईल. वीस ते चाळीस टक्के कमी दरानं भाजीची विक्री केली जाईल. अरे, महागाईनं जनता किती पिचली आहे. जानगुडेसाहेबांना याची जाण आहे. मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा अशी छोटीछोटी कामं करूनच आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करायचाय, हो की नाही? तर, त्यादिवशी तिथे विकल्या जाणाऱ्या भाजीची व्यवस्था करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर टाकतो. दिनेशकडून सगळं काम समजावून घे. काय लागतील ते पैसेही तोच देईल तुला. ठीक आहे ना? तेव्हा, केशवराव, आता वेळ दवडू नका, कामाला लागा..."

-------------------

केशव, सदा आणि नितीन तिघांनी रिक्षातून भाज्यांचे भारे स्टॉलपाशी उतरवले तेव्हा आठ वाजत आले होते.
भायखळ्याहून परतताना लोकलमध्येच केशवनं भाज्यांचे नवीन भाव आकडेमोड करून टिपून ठेवले होते. सदा आणि नितीन आपल्याकडे आदरानं बघतायत असा त्याला सारखा भास होत होता.
स्टॉल उभारण्याचं काम जवळजवळ झालंच होतं. स्टॉलच्या एका बाजूला जानगुडेसाहेबांचं तर दुसऱ्या बाजूला राज्याचे पार्टीप्रमुख धायरीकर साहेबांचं मोठं होर्डिंग झळकत होतं. केशवनं तिथल्या मजुरांना कनातीच्या खालच्या कडेला आठ दहा हूक ठोकायचा हुकूम सोडला. संभादादांनी सांगितल्याप्रमाणे छोटे बोर्ड त्यानं आदल्याच आठवड्यात तयार करून ठेवले होते; एकट्यानंच खपून. गवगवा न करण्याचा कानमंत्र विसरून चालणार नव्हतं. ध्येय साधायचं तर असली मेहनत करायलाच हवी.
भाज्यांचे नवीन भाव टिपून ठेवलेला कागद केशवनं सदाकडे दिला आणि मजुरांचे हूक ठोकून होईपर्यंत एकेका बोर्डावर एकेका भाजीचं नाव आणि खाली विक्रीचा नवा दर असं लिहायला सांगितलं. मात्र काल संभादादांनी ‘फक्त कांदे-बटाटे वीस टक्के कमी दरानं आणि बाकीच्या भाज्या चाळीस टक्के कमी दरानं’ असा निरोप दिनेशमार्फत का बरं पाठवला ते अजून त्याच्या नीटसं लक्षात आलं नव्हतं.
स्टॉलच्या आत एका कोपऱ्यात भाज्या भरून ठेवायचे प्लॅस्टीकचे ट्रे येऊन पडले होते. केशवनं ते एकात एक घातलेले ट्रे सुटे केले. मोजले. दोनतीन ट्रे कमी पडतील असं त्याला वाटलं. लागल्यास दुकानं उघडली की जाऊन आणावे लागतील का असा विचार करत असतानाच त्याच्या मोबाईलवर संभादादांचा फोन आला.
"अरे केशव, आहेस ना तू तिथे स्टॉलपाशी? म्हणजे मला काळजी नाही. जानगुडे साहेब ठीक दहा वाजता पोचतील तिथे. बरोबर महापौर, उपमहापौर, आयुक्त सगळेच असतील. तयारी एकदम कडक झाली पाहीजे, काय!"
"होय दादा. होतच आलीये तयारी. तुम्ही आधी याल ना?"
"जास्तीत जास्त दहा मिनिटं आधी येईन. मला जानगुडे साहेबांबरोबर राहावं लागतं, बाबा! अरे, त्यांचं माझ्याविना पान हलत नाही. बरं, आता बोलण्यात वेळ घालवू नको. तू तुझी कामं उरक, आम्ही आमची उरकतो. चल, ठेवतो फोन."
घाईत असूनही संभादादांनी आपली चौकशी केली याचा केशवला खूप आनंद झाला. बोर्डांचं काम संपवून सदा आणि नितीन चहा प्यायला गेले होते. मी ही जरा दहा मिनिटं जाऊन चहा पिऊन येऊ का असं दादांना विचारावंसं वाटत होतं केशवला. पण दादा इतके घाईत असताना त्यांना हे विचारणं त्याला प्रशस्त वाटलं नाही. आपण गेलो तर स्टॉलकडे कोण लक्ष देणार, चहा काय नंतरही पिता येईल असा विचार करून त्यानं भाज्यांची वर्गवारी करायला सुरूवात केली.
कांदे, बटाटे, वांगी, भेंडी, तोंडली, कोबी, फ्लॉवर, दोडका, पडवळ; एक छोटं पोतं भरून मिरच्या, कोथिंबीर वगैरे हिरवा मसाला; तिघांनी मिळून जास्तीत जास्त जितकी भाजी आणता येईल तितकी आणली होती. इतकी ताजी आणि स्वस्त भाजी पाहून लोकं किती खूष होतील; जानगुडेसाहेबांना, संभादादांना दुवा देतील - भाज्या ट्रेमध्ये भरताभरता केशवच्या मनात विचार येत होते.

‘स्वस्त दरात भाजी विक्री योजना’ असा मोठा फलक पाहून हळूहळू स्टॉलच्या आसपास बायामाणसांची गर्दी व्हायला लागली होती. तेवढ्यात तिथे एक रिक्षा येऊन थांबली आणि त्यातून दोन माणसं खाली उतरली. त्यातल्या एकाच्या हातात कॅमेरा होता. केशव ते पाहून आश्चर्यचकित झाला. वार्ताहर, पत्रकारांना वगैरे आमंत्रणं होती म्हणजे त्याला वाटलं होतं त्यापेक्षा आजचा कार्यक्रम मोठा होता.
दहा केव्हाच वाजून गेले होते. केशवनं भाज्यांच्या वर्गवारीचं कामही संपवत आणलं होतं. त्यानं आणलेल्या भाज्यांच्या तुलनेत दिलेले ट्रे छोटे होते. पोत्यांमधून अजून भाजी शिल्लक होती. पण केशवनं ठरवलं - कार्यक्रम संपेपर्यंत आपण इथेच मागे उभे राहू. जानगुडेसाहेबांच्या, दादांच्या हस्ते विक्री होईल, त्यांना लागतील तश्या भाज्या पोत्यातून काढून आपणच देऊ. त्यानिमित्तानं दादांनी आपली जानगुडेसाहेबांशी ओळख करून दिली तर चांगलंच आहे. आता एकदा दादा इथे आले आणि त्यांनी हे सगळं नजरेखालून घातलं तर बरं होईल. जमल्यास त्यांना विचारून चहा, वडापाव काहीतरी खाऊन पण घेता येईल.

केशव या विचारात असतानाच दोन गाड्या पार्टी ऑफिसच्या आवारात येऊन थांबल्या. पुढची गाडी संभादादांची होती. केशव त्यांना भेटायला गेला होता तेव्हा बाहेर ती उभी असलेली त्याला आठवत होती.
संभादादा केशवजवळ पोचले तसं केशवनं त्यांना वाकून नमस्कार केला. उत्साहानं सगळी तयारी दाखवली. दादा खूष झाल्याचं वाटत होतं.
"अरे, तुझ्यासारखे चारदोन तरतरीत गडी जरी मदतीला असले ना तरी आम्ही जग जिंकून दाखवू, बघ!" दादांनी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. पहाटेपासून एक कप चहावर केलेली धावपळ सार्थकी लागल्यासारखं वाटलं केशवला.
तेवढ्यात स्टॉलच्या आतल्या कोपऱ्यात ठेवलेल्या जास्तीच्या भाज्यांकडे संभादादांचं लक्ष गेलं. त्यांच्या कपाळाला अचानक आठी पडली.
"ही भाजी अशी इथे का ठेवली आहे?" त्यांनी जरा नाराजीच्या सुरातच विचारलं.
"दादा, ती जास्तीची भाजी आहे. विक्री सुरू झाली की लागेल तशी मी तुम्हाला ती देईन." केशवनं जरा चाचरतच उत्तर दिलं.
"नाही, नाही! तसलं काहीही करायचं नाही आणि ती भाजी तशी तिथेही ठेवायची नाही. दिनेश, याला काम नीट समजावून सांगितलं नव्हतं का? इतकी भाजी आणलीच कश्याला मुळात? आख्ख्या शहराला वाटायचीये का? ताबडतोब ती स्टॉलच्या मागच्या बाजूला नेऊन ठेवा. स्टॉलमध्ये तो पोत्यांचा पसारा दिसता कामा नये."
"पण दादा..."
केशव पुढे काही बोलणार इतक्यात संभादादांचा मोबाईल वाजला. ‘लवकर उरका’ असा इशारा करून ते फोनवर बोलत तिथून निघून गेले.
केशव मनातून थोडा खट्टू झाला. दिनेश, सदा आणि नितीनच्या मदतीनं त्यानं ती जास्तीची भाजी भराभर स्टॉलच्या मागे नेऊन ठेवली. इतक्यात रस्त्याच्या दिशेनं गडबड ऐकू आली. पुन्हा तीनचार गाड्या येऊन थांबल्या. जानगुडेसाहेब, महापौर वगैरे आपापल्या गाड्यांतून उतरले. इतका वेळ स्टॉलचं निरिक्षण करणारी गर्दी त्या दिशेला वळली. संभादादांनी सर्वांचं हार घालून स्वागत केलं. लगोलग कुणीतरी घोषणा दिल्या - "जानगुडे साहेबांचा विजय असो!", "धायरीकर साहेबांचा विजय असो!", "जानगुडे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है!". बाहेर रस्त्यावर अजून कुणीतरी फटाक्यांची माळ लावली. अजून एकानं तोपर्यंत रहदारी थोपवून धरली.
संभादादा सर्वांना स्टॉलपाशी घेऊन आले. जानगुडेसाहेबांनी स्टॉलवरची तयारी पाहून समाधान व्यक्त केलं. केशव मागे भाजीपाशी उभं राहून सगळं बघत होता. जानगुडेसाहेबांशी ओळख नाही तर नाही, दादांनी त्यांच्याशी बोलताना निदान एकदा आपलं नाव तरी घ्यावं असं त्याला फार वाटत होतं.

स्टॉलमध्येच एका बाजूला माईक वगैरेची व्यवस्था केलेली होती. या कार्यक्रमाचे आमंत्रक म्हणून आयुक्तांनी पाच मिनिटांचं मनोगत व्यक्त केलं. जानगुडेसाहेबांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष म्हणून महापौरांनी भाषण दिलं. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. उपमहापौरांनी गणपतीच्या फोटोला हार घालून स्वस्त भाजी विक्री योजनेचं उद्घाटन केलं. पेपरचा फोटोग्राफर सर्वांचे फोटो काढत होता.
केशव भाजीविक्रीला कधी सुरूवात होतेय याची वाट पाहत होता. त्याला खात्री होती की लोकांची गर्दी बघता समोर ट्रेमध्ये ठेवलेली भाजी थोड्याच वेळात संपेल आणि मग संभादादांना आपली मदत घ्यावीच लागेल.
संभादादांनी दिनेशला सांगून गर्दीतल्या काही बायका आणि पुरुषांना पुढे बोलावलं. काही सूचना दिल्या. स्टॉलसमोर त्यांना एका रांगेत उभं केलं. दादा त्यांच्याशी काय बोलले ते लांबून केशवला ऐकू आलं नाही. संभादादा सारखे घड्याळ बघत होते. दहापंधरा मिनिटं यातच गेली आणि एका न्यूज चॅनलची गाडी तिथे येऊन धडकली. त्यातून एक कॅमेरामन, एक निवेदिका आणि इतर दोघंतिघं उतरले. त्यांना बघताच संभादादांच्या चेहऱ्यावर पुन्हा उत्साह झळकला. भाजीविक्रीला अजून सुरूवात का झाली नव्हती ते केशवच्या आता लक्षात आलं.
चॅनलवाल्यांची सगळी तयारी झाली आणि त्यांनी इशारा करताच रांगेतल्या पहिल्या बाईला जानगुडेसाहेबांनी पुढे बोलवलं. तिला हव्या असलेल्या भाज्यांचं दिनेशनं वजनकाट्यावर वजन केलं, त्या भाज्या जानगुडेसाहेबांच्या हातात दिल्या आणि साहेबांनी त्या बाईच्या पिशवीत ओतल्या. प्रत्यक्षात त्या भाज्यांचे किती पैसे द्यावे लागले असते आणि या योजनेत ते कसे कमी द्यावे लागणार आहेत ते संभादादांनी गर्दीला उद्देशून मोठ्यानं जाहीर केलं. टी. व्ही. कॅमेरा जो इतका वेळ जानगुडेसाहेबांवर रोखलेला होता तो थोडा वेळ संभादादांवर स्थिरावून टाळ्या वाजवणाऱ्या गर्दीकडे वळला.
एक एक करून रांगेतली माणसं पुढे आली आणि जानगुडेसाहेबांच्या हस्ते भाज्या घेऊन गेली.
ट्रे मधली भाजी संपत आली तसे जानगुडेसाहेब, महापौर, आयुक्त सगळे उठून उभे राहीले. लोकांच्या दिशेनं हात हलवून, त्यांना जाहीर नमस्कार करून जायला निघाले. कॅमेरामन, निवेदिका त्यांच्यामागोमाग धावले.

केशव मागे भाजीपाशी उभं राहून सगळं बघत होता...

-------------------

संध्याकाळपासून आईची चाललेली धुसफूस, आप्पांची झालेली चिडचीड केशवच्या नजरेतून सुटली नव्हती.

"आख्ख्या जगाला स्वस्त भाज्या वाटल्या गेल्या आज. याला म्हटलं होतं चार दोन तू ही आण येताना, तर तेवढं नाही जमलं याला. फुकटात आण म्हटलं नव्हतं मी! मला मारे काल ऐकवलं - जनतेसाठी आणलेला माल पक्षाच्या कार्यकर्त्यानंच घरी आणायचा हे बरं नाही दिसणार म्हणे! त्या संभादादांनी लाटलीच ना उरलेली सगळी भाजी..." आईनं भाकऱ्या थापता थापता बडबड केली.
"पण ते पक्षाचे कार्यकर्ते कुठे आहेत? ते तर जानगुड्यांच्या मर्जीतले, दुसऱ्या फळीतले लोकप्रिय नेते आहेत..." आप्पांनी खोचक सुरात उत्तर दिलं.

‘लोकप्रिय नेते’वर आप्पांनी दिलेला जोर केशवच्या लक्षात आला. तो आतल्या खोलीतून सगळं ऐकत होता; एकटाच आढ्याकडे बघत पडला होता...