पूजाविधी: उगम ते आज, उद्या

सध्या सणांचा मोसम चालू आहे. गणपतींपासून एक विचार सतत मनात येत होता. थोडी माहितीची शोधाशोधही केली. विषय असा आहे की आपल्याकडे प्रचलित असलेली पूजा पद्धती षोडषोपचारी (किंवा पंचोपचारी) आहे. या पूजेचा प्रारंभ नेमका कधी झाला? पूजेच्या संकल्पावरून पूजेच्या प्रारंभाची माहिती मिळणार नाही. संपूर्ण पूजेत संस्कृत ऋचा वापरलेल्या असताना नि एक संस्कृत आरती असतानाही मराठी आरत्या कशा रुजल्या असाव्यात? आज प्रचलित असलेल्या पूजेतील सर्वात जुनी मराठी आरती कोणती असावी? (म्हणजे आजचा पूजाविधी त्या पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे असे म्हणता येईल). पूजेतील केवळ आरत्याच मराठीत का ? इतर उपचारांचे मराठीकरण का झाले नसावे ? पूजेतील पंचायतनाची कल्पना (मुख्य उपास्य दैवत मध्ये व इतर चार दिशांना चार) अशी  उपास्य दैवतापुरती बदलती का? रामदासांचे राम पंचायतन व या पूजेतील पंचायतन यांतही फरक आहे का? असे अनेक प्रश्न मनात होते. एकूणच पूजापद्धतीचा उगम, त्याच्या विकासाच्या अवस्था नि भविष्यातील त्यात होणारा बदल काय असेल हा अभ्यासाचा एक भाग ठरावा. पूजेविषयीची माहिती दुवा क्र. १  वर मिळते. मागे एकदा पुण्यातील डॉ. म. वि. गोखले यांनी मराठी आरती या विषयावर संशोधन केले असल्याचेही वाचले होते. परंतु त्यांचा Ph.D चा प्रबंध किंवा पुस्तक रुपाने काही प्रकाशन झालेले असल्यास अद्याप तरी पहायला मिळालेले नाही.  चर्चेचा हा प्रस्ताव अशासाठी की या निमित्ताने या संबंधातील माहिती एकत्र जमवावी.