ग - 'गच्छंति'चा

वास्तविक 'मी कझाखस्तानला जाऊन आलो' या एका वाक्यात हे प्रकरण संपवता येईल; पण काय करणार?  ... मला (अजून तरी) विसविशीत क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेट आवडतं.

'कझाखस्तान' या देशात जाण्याची इच्छा बाळगणारा मनुष्य मी अजून पाहिला नाहीये. (इच्छा नसणारे अनेक बघितलेत. ) कदाचित, 'पाक' लोकांचा पाकिस्तान तसा 'कजाग' लोकांचा कझाकस्तान अशी व्युत्पत्ती असावी!  (पाकिस्तानला जायची मात्र माझी मनोमन इच्छा आहे. ) माझ्या मनात मात्र तिथे जाताना थोडं कुतूहल होतं.  युरोपातल्या देशांप्रमाणे 'प्रगत' नसेल, आपल्या भारतासारखीच गत असेल असं वाटत होतं.

मँचेस्टर ते ऍमस्टरडॅम हा प्रवास - जितपत चांगला होऊ शकतो तितपत चांगला झाला - म्हणजे विमानात कॉफी आणि दोन पाव (चीझ घातलेले) मिळाले. विमान आम्ही आत शिरल्यावर चांगलं अर्धा पाऊण तास उशिरा निघालं; पण वैमानिकानं तत्परतेनं हवाई वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे घडत आहे असं सांगून आम्हां प्रवासी मंडळींना दिलासा(! ) दिला. पु. लं. च्या 'पहाटे पाचला निघणारी एस. टी....  ठेचेवर ठेच म्हणत जेव्हा सड्यावर आली तेव्हा सकाळचे सात वाजले होते. ' - यात आणि त्यात फारसा फरक नाही. मागे फ्रांकफुर्टला विमानातल्या प्रवाशांची गणती (गिनती? ) चुकल्यामुळे माझं विमान चांगलं तासभर उशिरा सुटलं होतं.

असो. ऍमस्टरडॅमला आम्ही (माझा साहेबही माझ्या बरोबर होता, इंग्लंडपासूनच.  इतर दोन साथीदार इथे येऊन भेटणार होते) भरगच्च नाश्ता केला. दुसरं विमान ३-४ तासांनंतर असल्यामुळे विमानतळावरची शोभा बघितली आणि लॅपटॉपची उरलीसुरली बॅटरी वापरून टाकली.  मध्येच मी साथीदारांना आठवणही करून दिली की आमचा परतीचा प्रवास ९/११ या दिवशी (२००९ मधल्या) होणार होता. मग ९/११ या विषयावर (२००१ मधल्या) थोडा वेळ चर्चा झाली. असं करता करता पुढच्या विमानाची वेळ झाली आणि आम्ही 'एअर अस्ताना'च्या विमानात पोचलो. 'अस्ताना' नाव ऐकून 'मुन्नाभाई' आठवणं साहजिकच होतं. हे 'रशियन' नाव आहे की 'कझाख' हे मला माहिती नाही. ('कझाख' ही एक वेगळी भाषा आहे. )

विमान प्रवासात मी खिडकीतली जागा मागितली की हमखास मला अशी खिडकी मिळते की जिच्यातून फक्त विमानाचे पंख दिसतात. शिवाय मी नेहमीच पुस्तक घेऊन जातो असं नाही;  यावेळी नेलं होतं - पण ते वर बॅगेत होतं.  सीटमागचे टी. व्ही. ही सोय लुफ्तांसाच्या भारतात जाणाऱ्या विमानांप्रमाणे एअर अस्तानातही नव्हतीच.  शेवटी मी शांतपणे इन-फ्लाइट मॅगेझीन वाचायला लागलो. ते चांगलं तीन-चार तास पुरलं. त्यात हंपी आणि बाली यांबद्दल अतिशय सुंदर लेख वाचायला मिळाले. (नाशिकच्या पोस्टात कानडी फॉर्म का मिळावा?... पु. ल.  आठवल्याशिवाय राहत नाहीत. ) 

रात्री आठ वाजता अटिरॉ विमानतळावर जेव्हा विमान उतरू लागलं तेव्हा विमानतळाची सुबक ठेंगणी रचना पाहून मन भरून आलं.  एकदा एअर सहारानं लखनौ विमानतळावर गेलो होतो, ते आठवलं. सगळं काही अगदी आटोपशीर होतं.  उगाचच कुठलाही बडेजाव नाही.

मी सामानातून माझ्या 'विसा' साठीची आवश्यक कागदपत्रं काढली. माझ्या कंपनीच्या कझाखस्तानातल्या 'अल्माटी' या शहरातल्या सहकारी बाईंनी पाठवलेली दोन पत्रं माझ्याकडे होती. ती दोन्ही कझाखस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलेली होती आणि त्यातलं एक पत्र मी 'अटिरॉ' विमानतळावर दाखवलं की 'विसा' मिळालाच अशी ठाम इ-मेलही माझ्याजवळ होती.

इथे माझे अबुधाबी प्रवासाचे दोन अनुभव लिहिणं आवश्यक आहे.

पहिल्या अबुधाबी प्रवासासाठी मी लंडनला विसा काढायला गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यानं माझ्याकडनं अर्ज, पारपत्र आणि शंभर पौंड घेतले आणि कुठलीही रसीद न देता 'तीन दिन बाद पता करो - या तो विसा मिलेगा या पैसा वापस' असं इंग्रजीतून सांगितलं होतं. मी '... पण पावती तरी द्या' वगैरे हट्टाग्रह करून बघितला होता; पण 'डोण्ट वरी सार' असं म्हणून त्यानं मला परत पाठवलं होतं. मग तीन दिवसांनी एका कुरिअर कंपनीला ऑथॉरिटी लेटर दिल्यावर मला माझं पारपत्र (विसासहित) परत मिळालं होतं; त्याबरोबर पावती मिळाली होती आणि प्रवासही व्यवस्थित पार पडला होता.

अबुधाबी/दुबईसाठी तुम्ही तिथल्या हॉटेलांमार्फत विसा मागवू शकता अशी माहिती मिळाल्यामुळे मी पुढच्या वेळी तो मार्ग अवलंबला. माझ्या कझाखस्तानच्या पत्राप्रमाणेच मला एक (अरेबिकमधलं) पत्र मिळालं. ते आणि पारपत्र घेऊन मी विमानातून बाहेर आलो,  तर एक सुंदर सुहास्यवदन (भारतीय वंशाची असावी) तरुणी माझ्या नावाचं प्लॅकार्ड घेऊन उभी होती. तिनं मला कुठल्याही रांगेत उभं न करता (इतरांच्या कुत्सित नजरा चुकवून) सर्व उपचार पार पाडत विमानतळाबाहेर आणलं होतं. मी टॅक्सीत बसतोय याची खात्री करूनच ती परत फिरली होती.

'ऑन अरायव्हल विसा' घेतला तर एवढं 'रेड कार्पेट' वेलकम मिळू शकतं याची मला कल्पना नव्हती. पण कझाखस्तान हा पूर्वीच्या साम्यवादी सोविएत युनियनचा भाग असल्यामुळे तिथलं कार्पेटही 'रेड' असायला हरकत नाही असं मला वाटायला लागलं होतं.  माझ्याकडची दोन्ही पत्रं रशियन (किंवा कझाख) भाषेत असल्यामुळे मला त्यांच्यावरचा पारपत्र क्र. आणि तारखा फक्त वाचता येत होत्या. त्यातलं एक पत्र अटिरॉला 'सिंगल एंट्री विसा' साठी आणि दुसरं पत्र लंडनला (परतल्यावर) 'मल्टिपल एंट्री विसा'साठी द्यायचं होतं. मी आत्मविश्वासानं 'विसा काउंटर'वर पहिलं पत्र पुढे सरकवलं. अधिकाऱ्यानं वाचून बघितलं आणि म्हणाला 'सॉरी, आय कांट ग्रांट यू विसा'. मी दुसरं पत्र पुढे सरकवलं.... उत्तरात फरक पडला नाही!

पुढचा काही काळ मी माझा भ्रमणध्वनी सुरू करण्यात, नेटवर्क शोधून काढण्यात आणि कंपनीतल्या संबंधित व्यक्तींशी संपर्क करण्यात घालवला. माझा साहेब माझ्या शेजारीच होता. त्याच्याकडे गेल्या वर्षीच काढलेला 'मल्टिपल एंट्री विसा' होता. इतर दोन साथीदारही सुटले. तेवढ्यात एक मुंबईचा मराठी मनुष्य येऊन त्याची कागदपत्रं दाखवून विसा घेऊनही गेला. मी मात्र त्या आटोपशीर विमानतळावर आपला कारभार कधी आटपतो याची वाट बघत उभा होतो. तो लवकरच आटोपणार हे लक्षात आल्यावर मी माझ्या साहेबाच्या हातात आमच्या मीटिंगच्या संबंधातली फाईल स्वाधीन केली आणि तो इतरांबरोबर हॉटेलवर निघून गेला. ते सगळेजण जाताना अगदी प्रेमानं मला 'सी यू टुमारो' म्हणाले खरे; पण माझा त्यावर काही फारसा विश्वास बसला नाही. यावेळी माझा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला असावा, कारण विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी माझं छायाचित्र काढलं (दुर्दैवानं ते मला बघायला मिळालं नाही. ) आणि माझं पारपत्रही ताब्यात घेतलं. मग दोन-चार रखवालदारांसोबत विमानतळाच्या शेजारी असलेल्या बराकीत मी गेलो. ते त्या रात्रपाळीला येणाऱ्या रखवालदारांचं वसतिगृह असावं. तिथल्या एका कॉंफरन्स रूम सारख्या दिसणाऱ्या खोलीत त्यांनी मला बसवलं. मग एका बाईंनी मला येऊन, माझ्या अशा येण्याचं कारण देणारं एक पत्र लिहायला सांगितलं. त्या इंग्रजी पत्रातला 'मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स' हा शब्द काही त्यांना कळला असं मला वाटलं नाही. इतर रखवालदारांना काही विचारलं तर ते मला हातांनी विमान उडाल्याचा अभिनय करून 'ऍमस्टरडॅम' असं सांगत होते! ऍमस्टरडॅमचं विमान दुसऱ्या दिवशी सकाळी असल्यामुळे रात्र याच खोलीत काढायची हे माझ्या लक्षात आलं. मग मी घरी फोन करून झाल्या प्रसंगाची कल्पना दिली. कंपनीतल्या स्थानिक मंडळींनी मला आदल्याच दिवशी विसाचे नियम बदलले आहेत असा एस. एम. एस. पाठवला. मी त्यांना मी  एका दुसऱ्या मुंबईकराला विसा घेताना बघितलं होतं हे सांगून उगाचच त्रास दिला नाही.

मी बॅग उघडून पुस्तक बाहेर काढलं. 'पर्ल बक' या नोबेल पारितोषिकप्राप्त लेखिकेची 'गुड अर्थ' ही कादंबरी वाचायचा संकल्प मी अनेक वर्षं करत होतो; पण दोन वर्षापूर्वी साठ-सत्तर पानं वाचल्यावर पुढची वाचायचीच राहून गेली होती. वाचता वाचता लक्षात आलं की आपल्या जेवणाचं काय? (मी देहभान हरपून वाचू शकत नाही. ) अटिरॉचे रात्रीचे अकरा वाजले होते आणि इंग्लंडमधले सात! इतका वेळ भूक लागली नसली, तरी पुढे लागू शकणार होती.  मी दुसऱ्या खोलीतल्या रखवालदाराकडे जाऊन त्याला जेवणाबद्दल विचारलं. त्यांनं 'तुझ्या बाहेर गेलेल्या सहकाऱ्यांकडून मागव' असा सल्ला दिला. मी ते शक्य नसल्याचं सांगितल्यावर 'काही तरी व्यवस्था करतो' असं म्हणाला. त्यानं मला कोरा चहा आणून दिला. (मला कोरा चहा आवडतो. )

हळू हळू त्या रखवालदारांशी माझी चांगली तोंडओळख झाली. भाषा कळत नसली तरी हसण्यावर (हसण्यावारी? ) बऱ्याच गोष्टी निभावून नेता येतात! त्यांनी मला पुन्हा एकदा चहा (कोरा - मला आवडतो - हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे) आणि भरपूर बिस्किटं आणून दिली.  खाऊन झाल्यावर माझ्यासाठी एक फोल्डिंग कॉट, गादी, उशी आणि चादरही आणली. मला 'खेड्यातली माणुसकी' ('म्हैस') आठवली... एक मात्र खरं होतं - ही सगळीच माणसं साधी होती. भारतातल्या माणसांसारखीच, पॉलिश न केलेली. कदाचित 'गुड अर्थ' वाचत असल्याचाही परिणाम असावा. चीनमधला शेतकरी, कझाखस्तानातली माणसं आणि भारतातले पूर्वानुभव (तुरुंगातले नव्हेत - कृपया गैरसमज नसावा) यांचा संबंध मनात नक्कीच जोडला गेला.  

भारताची आठवण यायचं अजून एक कारण म्हणजे खोलीत थोडेसे डास आणि माश्या होत्या. सुरुवातीला मला त्यांचीही सोबत/गंमत वाटली. हे प्राणी इंग्लंडच्या हवेला फारसे येत नाहीत. मला पलीकडच्या रखवालदारांच्या खोलीत लावलेलं एक गुड-नाईटही (त्याला तिथे गुड नाईट म्हणतात की ऑल आउट? ) दिसलं. अर्थात या सोबतीमुळे मी झोपेचा विचार रद्द करून पुस्तक वाचायचा संकल्प तडीस न्यायच्या मागे लागलो आणि रात्रीत दोनशेच्या वर पानं वाचून काढली.

सकाळी (रखवालदार) उठल्यावर माझी पुन्हा विमानतळावर रवानगी करण्यात आली आणि ऍमस्टरडॅमच्या विमानात बसवून देण्यात आलं. विमानात खाण्यात दवडलेल्या वेळाच्या व्यतिरिक्त मी झोप काढली. सुदैवानं माझ्याकडे युरोपात लागणरा 'शेंघन विसा' होता त्यामुळे ऍमस्टरडॅमच्या अधिकाऱ्यानं अतिशय प्रेमानं माझी विचारपूस केली. मी हा घोटाळा सांगितल्यावर 'मायनर प्रॉब्लेम' असं म्हणून तो मला माझं पुढचं तिकीट काढून देण्यासाठी स्वतःहून घेऊन गेला.  

कागदपत्रांत चूक काय असावी (मला रशियन / कझाख येत नाही) याचा मला रात्री उशिरा अंदाज आला होता. ते पत्र चुकून  'अल्माटी' विमानतळासाठी बनवण्यात आलं होतं आणि मला 'अटिरॉ'ला जायचं होतं. मी अटिरॉच्या अधिकाऱ्यांना अल्माटीला जाऊ का वगैरे विचारण्याचा प्रयत्न केला होता; पण तेवढं इंग्रजी त्यांना कळलं नाही. 'जाते थे जापान, पहुंच गए चीन' हे पूर्वी होत असावं, हल्ली मात्र अगदी एकाच देशाच्या दोन शहरांबाबत असं झालं तरी होते ती 'गच्छंति'!

... आता मी लंडनला दूतावासात जाऊनच  विसा काढणार आहे - कझाखस्तानसाठी आणि अबुधाबीसाठीही.

- कुमार जावडेकर