मद्यप्राशन

दारू पिताना काय काय घडते?

पहिला पेग अगदी काही कळायच्या आत, कुठल्याही तोंडीलावण्याशिवायच पोटात शिरतो. वीस मिनिटे म्हणजे परमावधी. आता वीस मिनिटांत साठ मिली म्हणजे मिनिटाला तीन मिली. या (वा याहून जास्त) गतीने सपासप द्रव्य पोटात गेल्यावर बऱ्यापैकी तरतरी वाटू लागते.

त्याबरोबरच 'रिकाम्या पोटी दारू वाईट' असे सुविचार सुचायला लागतात.  दुसरा पेग तयार करताना तोंडीलावणी कायकाय आहेत याची चाचपणी होते. त्यातले बरेचसे पदार्थ ताटल्यांत विराजमान होतात, दुसऱ्या पेगबरोबर मधूनअधून तोंडात उतरतात.

दुसरा पेग संपेस्तोवर शरीराने this means business असा संदेश स्वतःलाच पाठवून पोचपावती दिलेली असते. मनात खळबळ सुरू झालेली असते. "माणूस कशाला पितो" असले मौलिक प्रश्न मनात घुटमळू लागतात.

तिसरा पेग संथ लयीत येतो. तोंडीलावण्यांची परत चाचपणी होते. जेवणाची काय व्यवस्था आहे याची सविस्तर पाहणी केली जाते. मनातले झाकलेले कोपरे हळूहळू उजळू लागतात.

चौथा पेग येईस्तोवर किमान दीड तास उलटून गेलेला असतो. आतवर पोचलेल्या मद्यार्काने आपले काम सुरू केलेले असते. त्यामुळे "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" असे हायवे स्पेशल संदेश मनात घुटमळायला लागतात. असफल प्रेमाच्या आठवणी वारंवार उसळून येतात.

पाचवा एकदमच ठाय लयीत शिरतो. तोंडीलावण्यांची कसून पाहणी होते. दाणे रद्द होतात (पित्तकारक). चणे रद्द होतात (वातकारक). वेफर्स रद्द होतात (empty calories). शेवटी फ्रीजमधून काढलेली काकडी साथीला येते. काकडीतला high water content मुळे काकडी कशी drinks बरोबर ideal आहे हे स्वतःलाच बरळून बजावले जाते. आणि तरीही पेग संपायला वेळ लागतो. कारण वारंवार पाणी/सोडा मिसळून तो क्षीण केला जातो. "जर असे झाले असते तर" छाप विचार मनावर ताबा मिळवायच्या मार्गाला लागतात.

पाचवा संपेस्तोवर "जेवणाची वेळ झाली" असा शरीराने इशारा दिलेला असतो. त्यामुळे सहावा पेग जेवणाबरोबरच घेतला जातो.

तोवर

हर्षखेद ते मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले;

कंटकशल्ये बोथटली, मखमालीची लव वठली

अशी अवस्था प्राप्त झालेली असते.

अर्धे मन पाचव्या पेगने उठवलेल्या वादळांना तोंड देत असते, आणि अर्धे मन पुढच्या दिवसाच्या तयारीला लागलेले असते.

परिणामी, जेवण संपले तरी सहावा थोडासा उरतोच. मग तो टाकून द्यावा की उदरस्थ करावा यावर माफक विचारविनिमय होतो.

अर्ध्या मनांच्या लढाईत कुणाची जीत होते त्यावर अंतिम निर्णय ठरतो.

टीपः बऱ्याच वेळेस पेग मोजण्याचा counter १ किंवा २ नंतर सुरू होतो. म्हणजे, पहिले एक/दोन पेग काही कळायच्या आतच आत पोचतात. त्यानंतरची पटकथा आधी सांगितल्याप्रमाणे घडते.

पण ती चित्रपटाची बांधीव पटकथा न होता तमाशाची open-source कथा होते. ऐन वेळेस काहीही बदल होऊ शकतात, आणि होतात. जेवण अर्धवट (वा संपूर्ण) सोडून बिछाना गाठण्यापासून ते जेवण पुरतावून परत बाहेर पडून 'प्यासा'मधून क्वार्टर खरेदी करायला जाण्यापर्यंत काहीही होऊ शकते.

दुसऱ्या दिवशीची सकाळ सवडीने (सातपासून तीनपर्यंत केव्हाही) उजाडते.

वैधानिक इशारा - मद्यप्राशन हा एक सामाजिक सोपस्कार आहे अशी समज असणाऱ्या हौशी कलाकारांनी (जे 'पार्टी'मध्ये एक स्मॉल तासभर पुरवतात, जे I can have four (स्मॉल) pegs and still stand straight अशा बढाया मारतात) इकडे लक्ष देऊ नये.

तसेच, एखादा पेग पोटात/हातात जाताच जर तुम्हांला शायरी सुचायला लागत असेल, तर कृपया गुलजार/जगजीतसिंग यांना भेटा/लिहा. मनसेचे कार्यकर्ते असाल तर संदीप खरेंना भेटा/लिहा.

थोडक्यात, तुम्ही वरील दोन्हीपैकी एका (वा दोन्ही) वर्गात मोडत असलात तर कृपया या प्रकटनाच्या वाटेला जाऊ नका. जगा आणि जगू द्या.