रिडालोस - कशासाठी? कुणासाठी?

राज ठाकरेंनी मनसे ची स्थापना करून एव्हाना २ वर्षे झाली होती. इथपर्यंत सारं काही आलबेल होतं.

पण.....

"महाराष्ट माझा" म्हणत "मराठीपणासाठी" मनसेने आंदोलने पेटवायला सुरुवात केली आणि हुशार कांग्रेस नेत्यांनी इथेच दुरचा विचार करून सुमडित राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. हि मराठीपणाची आग "पाहिजे तेवढी" आणि "पाहिजे तशी" फोफावी म्हणून मुद्दामहून कॉग्रेसनेच कारवाई करण्यास वेळ लावला हे सर्वश्रुत आहेच. त्यावर आगीत तेल ओतणारे निरुपम, क्रुपाशंकर यांसारख्या आपल्याच तोंडपाटिल नेत्यांची "वाजती घंटा" अहोरात्र वाजवत ठेवली.   ज्या मराठी टक्क्यांच्या भरवशावर शिवसेना आणि राष्टवादी सत्तेच्या जवळ जाऊ पाहत होते त्या मतांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करून त्या दोन्ही "महाराष्टिय" पक्षांना शह देण्याची हि "तिरकस" चाल होती.

सेना, राष्टवादिनेही या चालीकडे काहीसे दुर्लक्षच केले होते. पण....... काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत मनसेने अनपेक्षित प्रमाणात "मराठी" मते गोळा करून "कांग्रेशची चाल" किती अचूक होती याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कांग्रेस नं. १ तर राष्टवादी चोथ्या स्थानाला फेकला गेला आणि....... शरद पवार खाडकन जागे झाले. राष्टवादिच्या अस्तित्वावर शंका घेतली जाऊ लागली, विलिनीकरणाची मागणीही झाली.

आता......

कांग्रेसच्या या "तिरकस" चालिला, कांग्रेसच्यच तंबूत राहून, काहीतरी " वाकडी चाल" करून शह देणे गरजेचे होते अन्यथा येणाऱ्या विधानसभेत राष्टवादिची घसरणं थांबविणे अवघड आहे हे पवारांच्या ध्यानी एव्हाना आलेले होतेच.

आणि...... मग शोध चालू झाला वाकडया चालीसाठी वापरायच्या घोडयाचा.... घोडाही ठरला आणि चाल हि.

पवारांनी वाकडी चाल खेळण्यासाठी पटावरचे आपलं नेहमीचं, अगतिक असलेलं प्यादं हातात घेतलं. शिर्डीतल्या दारुण पराभवामुळे का होईना पण, त्यांच्यात शिल्लक राहिलेल्या स्वाभिमानाने (? ) लाचारीवर मात केली होती. कांग्रेसकडून पुरते फसवलो गेल्याची पीर-पीर, धुस-फुस दलित नेत्यांमध्ये चालू होतीच.   कॉग्रेसची परंपरांगत असलेली "दलित" आणि मुस्लिम मते तोडण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम प्यादे आणि ह्यापेक्षा उत्तम वेळ(संधी) ह्या राजकीय डावात नाही हे ओळखूनच ह्या प्यादाला वजिराची वस्त्रे चढवून "रिडालोस" ची स्थापना करवून घेण्यात आली. आता हा वजिर कांग्रेसच्या राजाला शह देण्यास कितपत यशस्वी होतो यावर राष्टवादिचे यशापश बरेच आधारीत आहे.

"तुम्ही आमची गाय मारली आम्ही तुमचे वासरू मारू" ह्याच साठी हि नवी आघाडी आहे, हि पवारांचीच एक जातीय+राजकीय खेळी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पण निवडनुकीनंतर, मनसे शिवसेना-भाजपाच्या वळचनीला आणि आठवले मिळतिल तेवढ्या शिलेदारांसह परत कांग्रेस दरबारी मुजऱ्यास गेले तर पवारांच्या राष्टवादिचे भवितव्य परत दोलायमान होणार हेही नक्की.

(रिडालोस - रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, नाव मुद्दाम नोंद करतो आहे कारण निवडणुका नंतर हिचे अस्तित्व टिकेल का या बाबत शंका आहे. )

सचिन, नारायणगाव, पुणे.