कै. शंकर रामचंद्र भागवत

कै. शंकर रामचंद्र भागवत (जन्म: ८ ऑगस्ट १८८२) हे पुणे नगरपालिकेचे त्यावेळचे चीफ ऑफिसर. त्यांची कारकीर्द एकूण १७-१८ वर्षांची होती. मात्र, पुण्यामध्ये त्यांचा एकूणच दरारा फार. कडक शिस्त, अचूकपणा, वेळेचे पालन आणि न्यायी स्वभाव अशा गुणांमुळे ब्रिटिश अधिकारीही त्यांना वचकून होते. पारतंत्र्यात असताना त्यांनी ज्या संकल्पना पुण्यात आणण्याचे ज्या हिरिरीने प्रयत्न केले तसे आज स्वातंत्र्यानंतरही कोणी करताना दिसत नाही. स्वतःच्या घरात (पूर्वीचे २८२ सदाशिव पेठ, सध्याचे ८३५ सदाशिव पेठ, पुणे ३०) सोयी त्यांनी केल्याच नाहीत. मात्र, रस्त्यांवरची दिवाबत्ती वेळच्यावेळी लागणे, साफ-सफाई, इ. पुण्यातील लोकांसाठी काय काय करता येईल याचा सखोल विचार, अभ्यास आणि पूर्तता त्यांनी वेळोवेळी केली.
निवृत्त झाल्यानंतर तीर्थयात्रा वगैरे करण्याऐवजी त्यांनी एका खेडेगावात जीवन व्यतीत केले. त्या गावातील लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. स्वतः सतत मेहेनत करून पाण्यासंबंधी नवनवीन प्रयोग यशस्वी करून दाखविले. वयाच्या ७०व्या वर्षी ते घर सोडून त्यागावी १६ वर्षे राहिले. स्वतःचे शासकीय संपर्क वापरून सुविधा निर्माण केल्या. कलेक्टरपासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांशी त्यांचा संपर्क होता. अशा या महान आत्म्याला प्रणाम!
कै. शंकर रामचंद्र उर्फ आप्पासाहेब भागवत यांच्या जीवनावरील काही मजकूर मी वेळोवेळी देईनच.
अस्तु.