लोकमान्य टिळक २.० हवेत?

मी आणि माझे कुटुंब १९८२ सालपासून भारताबाहेर असल्याने माझ्या दोन्ही मुलीना मराठी आणि भारतीय सण कसे साजरे केले जातात याची मर्यादीतच माहिती आहे. मागील काही वर्षे त्या दोघीही शिकण्यासाठी अमेरिकेत असल्यने भारतात जाणेसुद्धा बरेच कमी झाले आहे. अशा परिस्थितीत या वर्षी अनंत चतुर्दशीला मुंबईत असण्याचा योग आल्याने मी आणि माझी मोठी मुलगी दादर चौपटीवर गणपतीविसर्जन पाहण्याकरिता उत्साहाने संध्याकाळी हजर झालो.

आम्ही सगळेच होंग्कोंगमध्ये १९८२ ते १९९१ या काळात गणपती उत्सवात पुढाकाराने सामिल होत असू. विसर्जन सोहळा तर बहुतेक वेळी "एखादी मोठी नाव भाड्याने घेऊन मूर्ती सकट कुठल्यातरी लांबच्या (कारण निर्मनुश्य) बेटावर सहल, विसर्जन आणि परत" अशा स्वरूपाचा असायचा, किमान समुद्रकिनारी "आरत्या, विसर्जन व जेवण" एवढेतरी! म्हणून माझ्या मुलीला "विसर्जन" हे नवीन नव्हते पण ..........  समुद्रावरची अफाट गर्दी हा संपूर्ण नवा अनुभव!! आम्ही चांगले दिसावे म्हणून थोडेसे लांबच राहून अनेक लहान मोठ्या मूर्तींचे विसर्जन पाहिले. "गर्दीच गर्दी चहूकडे" असे असलेतरी अनेक पोलिस आणि स्वयम्सेवक उत्तमप्रकारे गर्दीचे नियंत्रण करत होते. आपण भारतातच आहोत ना - असे आमचे आम्हालाच विचारावेसे वाटत होते!!

परत येताना पाहिलेला शहर प्रमुखांच्या बंगल्यातला नवीन प्रकारचा विसर्जनाचा कार्यक्रम - पोहोण्यच्या तलावात मूर्ती सोडणे - अतीशय कालानुरूप वाटला. या अनुक्रमाला विरोध करणारे लोक देखील पाट्या घेवून उभे असलेले दिसत होते. त्यांच्यामते हा प्रकार "धर्मा विरुद्ध" होता आणि म्हणून "विसर्जन वाहत्या पाण्यातच व्हायला हवे" असा त्यांचा दावा होता.

या धर्म रक्शकाना दुसरे दिवशी समुद्राच्या पाण्यातून बाहेर वाहत येवून वाळूवर पडलेली केविलवाणी धडे, तुटके हात आणि मळकी शोभावस्त्रे दिसतच नसावीत!! ज्या बुद्धिदात्याला आपण अत्यंत आदराने १० दिवस वंदन करतो त्याचीच विसर्जनानंतर होत असलेली ही विटंबना थाम्बवण्याकरिता आता लोकमान्य टिळक २.० च यायला हवेत?

आता समजा जर लोकमान्य टिळक २. ० खरोखरच अवतरले तर त्याना आणखीही एक मोठेच आव्हान! दारू पिऊन मिरवणुकीत जोरजोरात नाच - गाण्याचा जल्लोश ज्याना हवाच असतो अशा अति-धार्मीक आणि उत्साही लोकाना आवरण्याचे!!