एक सुंदर गजल - नासिर - दिल मे इक लहरसी उठी है अभी

नासिर रजा उर्फ नासिर काजिमी (नुकता कसा लिहायचा माहीत नाही. ) हा शायर कदाचित फारसा विख्यात वाटत नसेलही, पण गुलाम अलीने त्याची एक गजल गायली आहे जी फार सुंदर आहे. हा शायर १९२५ साली जन्माला आला व १९७२ मध्ये अल्लाला प्यारा झाला. त्याची ती सुप्रसिद्ध गजल म्हणजेः

दिले मे इक लहरसी उठी है अभी

------------------------------------------------------------------------------------------

१) दिलमे इक लहरसी उठी है अभी
    कोइ ताजा हवा चली है अभी

शब्दार्थ - आत्ता मनात एक लाट निर्माण झाली आहे, (बहुतेक / कारण / किंवा) एकदम ताजा ताजा वारा येत आहे.

अर्थ - हे कसे झाले? अचानक माझ्या निष्क्रीय जीवनात / हृदयात एक हालचाल? जणू अत्यंत ताजी हवा ( अत्यंत ताजे स्वप्न ) निर्माण झाले असावे? पुन्हा पुन्हा असे का होत असावे? हे हृदय कसले बनलेले असावे? इतके अनुभव येऊनही परत नवीन स्वप्न का पाहात असावे? माझ्या इच्चेविरुद्ध माझ्या मनात असे विचार का येतात?
---------------------------------------------

२) शोर बरपा है खाना-ए-दिल मे
    कोइ दीवारसी गिरी है अभी

शब्दार्थ - हृदयाच्या घरात एक हल्लकल्लोळ माजलेला आहे. घराची कुठलीतरी भिंत'शी' आत्ताच पडली आहे ( असावी ).

अर्थ - त्यात काय एवढे? हे रोजचेच आहे. हृदयात काहीतरी भयानक अशांतता जाणवत आहे. कुणाचीतरी आठवण आली असणार. ती व्यक्ती कशी दुरावली, त्या व्यक्ती संदर्भात आपल्याला किती प्रेम होते अन काय झाले याची उजळणी हृदयात झाली असावी. मन आपल्या ताब्यात आहेच कुठे? काही का होईना?
----------------------------------------------------

३) कुछ तो नाजुक मिजाज है हम भी
    और ये चोटभी नयी है अभी

शब्दार्थ - एकतर मुळात मी हळवा, त्यात ही (मनाची) जखम 'अजून' ताजी ताजी!

अर्थ - माझी अशी निंदानालस्ती नका करू! मी अत्यंत भावनिक, हळव्या मनाचा आहे. आत्ताच (खरे तर खूप पुर्वीच ) मनावर ही जखम झाली होती. प्रियेने / काळाने / आवडत्या लोकांनी केलेली! 'अजून' ताजी ताजी आहे. 'अजून' त्या जखमेची आठवण आली की गदगदून येते.

-------------------------------------------------------

४) तुम तो यारो अभीसे उठ बैठे
    शहरमे रात जागती है अभी

शब्दार्थ - मित्रांनो? तुम्ही इतक्यात निघून चाललात? अजून गावात रात्र जागत आहे.

अर्थ १ - मी जागा असेपर्यंत कसे काय उठता? मी जागा आहे म्हणजे अजून जागे राहायला हवेत.
अर्थ २- नका रे जाऊ, तुम्ही गेलात तर ही जी रात्र आहे ती मला पुन्हा नष्ट करेल ( पुन्हा रितेपणाची जाणीव देईल)
अर्थ ३ - ही काळरात्र संपल्यावर मग जीवन उपभोगून तरी निघा, इतक्यात काय घाबरून जीव सोडता?
----------------------------------------------------------------------

५ ) यादके बेनिशाँ जजीरोसे
     तेरी आवाज आ रही है अभी

शब्दार्थ - स्मृतींच्या न दिसणाऱ्या साखळ्यांमधून तुझी साद ऐकू येत आहे.

अर्थ - लोकांना काय कळणार मी असा का दिसतो? न दिसणाऱ्या आठवणी असतात. त्या सगळ्या तुझ्या आठवणी असतात. कुठेतरी मनात खूप खोलवर तू आहेस. तुझा आवाज पुन्हा येतो. पुन्हा मी गलबलून जातो.

----------------------------------------------------------

६) भरी दुनियामे जी नही लगता
   जाने किस चीजकी कमी है अभी

शब्दार्थ - सगळं आहे पण मन लागत नाही, आता कशाचा अभाव आहे कोण जाणे?

अर्थ - 'किस चीज' चा अर्थ दुरावलेले प्रेम, दुरावलेले मित्र, मृत्यू, आत्मशांती काहीही! अत्यंत साधे शब्द, वरवर साधा वाटणारा आशय! पण...
एखाद्या एकांतवेळी हा शेर ऐकला / वाचला / आठवला तर मन पाणी पाणी होणे शक्य आहे.

-------------------------------------------------------

या गजलेतील सर्वात चित्रदर्शी शेर!

७) सोगये लोग उस हवेली के
    इक खिडकी मगर खुली है अभी

शब्दार्थ - त्या घरातील माणसे झोपली (पण ) एक खिडकी मात्र उघडी आहे.

अर्थ - आमचे हे प्रेम कसे व्यक्त करता येईल जगासमोर? शक्यच नाही! फार फार तर काय? सगळे झोपल्यानंतर (वारा यावा या सबबीखाली ) तिने तिच्या खोलीची खिडकी उघडी ठेवली आहे यावरून समजायचे की तिचे माझ्यावर प्रेम असून ते व्यक्त करण्याचा हा एकच मार्ग आहे. खिडकी उघडी ठेवण्यात तिला असेच म्हणायचे आहे की नाही हे तरी कुठे नक्की आहे? ती त्या खिडकीत नेहमी दिसते अन तिला तेथून मी कायम ( तिच्याकडे बघताना ) दिसतो म्हणून असा अर्थ काढायचा एवढेच! अन्यथा, कशाचाच कशाशी काहीच ताळमेळ नाही. असो! आपण गोड गोड समजुती करून घेण्यास काय हरकत आहे?

------------------------------------------

मक्ता

वक्त अच्छभी आयेगा 'नासिर'
गम न कर जिंदगी पडी है अभी

शब्दार्थ - चांगले दिवससुद्धा येतील नासिर, वाईट नको वाटून घेऊस, अजून बरेच आयुष्य आहे.

अर्थ - कोणत्याही क्षणी माणसाला असेच वाटत राहते की जणू अजून आपण खूप जगणार आहोत. 'आशा' ही त्यामुळे त्याची एकमेव साथीदार असते. 'आशा' या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी संस्कृतमध्ये एक अत्यंत छान सुभाषित आहे.

आशा नाम मनुष्याणां काचिद आश्चर्य शृंखला
बद्धा यया प्रधावंती.. मुक्ताः तिष्ठंती पंगुवत

आशा नावाची माणसाची एक अशी विस्मयजनक साखळी आहे की जिने बांधले गेलेले लोक धावतात व जिच्यातून मुक्त झालेले लोक असतातते पंगू माणसाप्रमाणे निष्क्रीय होतात.

सदर 'द्विपदी'मध्ये शायर स्वतःलाच समजावत आहे. खरे तर मनातून त्यालाही त्याच्या सांत्वनाबाबत खात्री नाही.

------------------------------------------------------------------------------------------

वरील गजल 'लज्जिता' वृत्तात असून उर्दूमध्ये अनेक शब्दांचा वापर उच्चाराप्रमाणे भिन्न पद्धतीने केला जातो याचे एक चांगले उदाहरण आहे.

व क्त अ च्छा भि आ ये गा ना सिर
गा ल गा गा  ल गा  ल गा गा गा

या ओळीत 'भी' पहिला ( लघू ) आलेला आहे.

कुछ तो ना जुक मि जा ज है हम भी
गा  ल  गा गा   ल  गा ल गा गा गा

या ओळीतील 'भी' दुसरा (गुरू ) आलेला आहे.

(अर्थात, हे विधान मी देवनागरी लिपीच्या दृष्टिकोनातून मांडत आहे. उर्दू लिपीत काही भिन्नत्व असले तर माहीत नाही.)

-------------------------------------------------------------------------------------------------------------

नासिरचीच खालील गजलही याच वृत्तात आहे

कौन इस राहसे गुजरता है
दिल युही इंतजार करता है
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

हफीज होशियारपुरीचा हा शिष्य खरे तर मीरच्या शायरीवर प्रचंड प्रेम करायचा. त्यामुळेच त्याच्या काव्यात 'विरह' प्रामुख्याने आला आहे. तो स्वतःचे काव्य गायचाही! गायन, शिकार, पक्षीनिरिक्षण हे त्याचे छंद! अंबाल्यात राहणारा नासिर १९४७ मध्ये पाकिस्तान (लाहोर ) येथे स्थलांतरीत झाला. पोटाच्या कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या किमान २५ गजला जालावर उपलब्ध आहेत.

(ही माहिती मी जालावरूनच मिळवलेली आहे.)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------


-सविनय
'बेफिकीर'!