बॉंबे ‘हाय’चे ‘कोर्ट’ पुराण - मी वाचलेला एक चांगला लेख - प्रकाशनाच्या प्रतिक्षेत

बॉंबे ‘हाय’चे ‘कोर्ट’ पुराण

हायकोर्टातील नामांकित वकील रूस्तमजी दिवसभराचे काम आटोपून मित्तल टॉवरमधील आपल्या कार्यालयात आळसावून बसले होते. एका मोठ्या उद्योगसमूहाच्या भाऊबंदकीचे घाऊक वकीली कंत्राट मिळाल्यामुळे ते ज्याम खूष होते. इतक्यात मोबाईलवर त्यांच्या धाकट्या मुलीचा पेरिझाद बेबीचा फोन वाजला. ‘आज बेबीची लॉ एक्झॅम संपली ना, तिला आपण मोठ्ठा कॉर्पोरेट लॉयर बनवायचे. ह्या मल्टीनॅशनल कंपन्यांचे इंटलेक्च्युल राईटस, पेटंट, ग्लोबल ट्रेड करार ज्याम भानगडी असतात. शिवाय जगभर पसारा आणि भारतासारख्या देशात तर कोर्टात इंग्रजीच चालते, त्यामुळे मोकळे रानच. पेरिझाद बेबीला या गोतावळ्यात घुसवायचे. साला लीगल लाईनीत पण आता केवढ्या वेरियेशन आल्यात, नाहीतर आम्ही प्रॉपर्टी केसेस करतच कितीतरी वर्ष घासत बसलो’, फोनच्या कंपनांमुळे विचारांच्या तंद्रीतून एकदम भानावर येत त्यांनी फोन उचलला. पेरिझाद बेबी फोनवर जवळजवळ किंचाळलीच, ‘डॅड, वेक अप सिद बघायला आलो होतो, पण इकडे प्रॉब्लेम झालेत... सम ऑफुल पीपल येलींग मुंबई कोणाची... पिक्चर बंद पाडलाय’. ‘तू आधी घरी जा’, तिला दरडावून रुस्तमजींनी लगेच टी०व्हीवर आपला आवडता चॅनल ‘कल-तक’ लावला. अद्वातद्वा बोलत हिंदीतून ‘मुंबईवाल्यांच्या’ विरोधात आग ओकणारा ‘कल-तक’चा पंकज त्रिपाठी त्यांचा आवडता रिपोर्टर.   ‘कल-तक’ चॅनलवर त्रिपाठी आता चेकाळला होता, ‘फिरसे गुंडागर्दी... मुंबई आखीर किसकी’. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला;    खुद्द हायकोर्टाचे न्यायमूर्ती. ‘डिड यू सी द न्यूज रुस्तमजी... दे आर सेयींग हेन्सफोर्थ बॉंबे नेम विल नॉट बी टॉलरेटेड एनीव्हेअर. विल दे आस्क अस ऑलसो, व्हॉट डू यू थिंक’, न्यायमूर्तींनी कातर स्वरात विचारले. ‘डोंट वरी सर... दे कॅनॉट टच अवर होली इन्स्टि्ट्यूशन’, रुस्तमनजींनी न्यायमूर्तींना निश्चिंत केले. न्यायमूर्ती रुस्तमजींना मानायचे. मागेसुद्धा काही मराठीप्रेमी संघटना उच्च न्यायालयातील खटले मराठीतून चालले पाहिजेत वगैरे ‘बॅकवर्ड’ मागण्या घेऊन आल्या होत्या तेव्हा रुस्तमजींनी ‘ज्युडिशअरी इज कन्सर्ड अबाऊट जस्टिस, लॅंग्वेज इज इनकॉन्सिक्वेन्शिअल’, अशा कडक इंग्रजी भाषेत त्यांना तासले होते. रुस्तमजींचा दराराच असा होता की हायकोर्टाच्या अस्मितेवर प्रांतियतेचे सावट आले की पहाड होऊन ते न्यायसंस्थेचे जीवाभावाने रक्षण करीत. मराठीकरणासारख्या क्षुल्लक बाबींसाठी कमिट्या वगैरे नेमल्याचे हायकोर्टाच्या वार्षिक अहवालात ते वाचत तेव्हा त्यांच्या मस्तकात तिडीक जायची. पण त्या कमिट्यांचे कामही अशा गोगलगाय गतीने चालायचे की वर्षानुवर्षे यांचे काहीदेखील होणार नाही ह्या विचारांनी त्यांना बरे वाटायचे. एकदा ‘खालच्या कोर्टांतील सुधारणा समितीवर’ नेमणूक झाल्याने नाईलाजाने रुस्तमजींना अकोल्यात जावे लागले होते. काय ती माणसे, काय ती भाषा.... दंडाधिकारी, प्रतिज्ञापत्र, अधिग्रहण, अधिक्षेप... ऐकवत नव्हते. कुठे परग्रहावर आलो असे रुस्तमजींना तेव्हा झाले होते. एकदा एक फाटका मराठी अशील रुस्तमजींकडे असेच ‘खालच्या कोर्टातून वर आलेले’ गावातील इस्टेटीचे मॅटर मराठीतून घेऊन आला होता. खरेतर अशा खालच्या कोर्टातून आलेल्या ‘लो-प्रोफाईल केसेस’ रुस्तमजी कधीच घेत नाहीत. पण एरियातील एका ‘मुंबईवाल्या’ एम०एल०ए चा वशीला आणला होता म्हणूनच रूस्तमजींनी त्याला उभा केला होता. बॉंबेतील अनेक ‘लॅंड मॅटर्स’ त्या एम०एल०ए मुळेच रुस्तमजींकडे यायची. त्यामुळे  त्याचे सगळे मॅटर इंग्रजीत भाषांतरीत करून घेण्याची व्यवस्था तेव्हा रुस्तमजींनाच पाहावी लागली होती. भाषांतराचे महागडे रेट ऐकल्यावर रुस्तमजी उडालेच होते. हा प्रांत त्यांना अगदीच नवीन होता. ‘म्हणूनच फक्त इंग्रजीच हवे सगळीकडे, अगदी खालच्या कोर्टातपण’; हा रुस्तमजींचा त्यावरील तोडगा. एकदा त्यांच्या एका मराठी आडनावाच्या ज्युनिअरला मराठी न्यायव्यवहार कोश घेऊन बसलेले पाहिल्यावर त्यांनी सुनावले होते, ‘ डोंट वेस्ट युवर टाइम, अशीलाला कशाला काय कळायला हवे, साला केस तर आपणच लढवतो’.... असो...     

आता पुन्हा हे बॉंबे प्रकरण. हायकोर्टाची नामांतर झालेली पाटी रुस्तमजींच्या डोळ्यांपुढे आली. ‘साला जग कुठे चाललाय आणि काय हे रिग्रेसिव्ह लोक’, रुस्तमजीही आता चांगलेच तापले होते. बीयरचा कॅन तोंडाला लावून बॉंबेतील प्रख्यात इंग्रजी दैनिकाच्या विख्यात बॉंबेवादी संपादकाला त्यांनी फोन लावला. हा संपादक त्यांचाच मित्र... दोघेही समविचारी... मुंबईला बॉंबेच मानणारे. ‘संपादक साहेब मिटींगमध्ये आहेत’, तीन तासात तीनवेळा तेच उत्तर मिळाले. तोपर्यंत रिचवलेल्या बीयरच्या तीन कॅन्समुळे रुस्तमजींचे विचार आता चांगलेच झोकांड्या खाऊ लागले होते, ‘साला आपल्या तीन पिढ्या या हायकोर्टात गेल्या, अशी इन्स्ट्टिट्यूशन बांधायची म्हणजे काय खाऊ हाय आणि नाव बदलल्यावर कामकाजात काय फरक पडणार आहे’. आपला हा विचार मात्र रुस्तमजींना जिव्हारी लागला. प्रलंबित खटल्यांच्या थप्प्या, वर्षानुवर्ष चाल(व)लेले खटले, एकूणच सिस्टममधील अनागोंदी कारभार हा सद्य ‘कोलोनिअल’ नावानेदेखील तसाच चालला आहे हे त्यांना कळत होते. ‘पण तरी साला आय वेहेमंटली रिप्युडिएट धीस परोकिअल शॉव्हीनिझम’, रुस्तमनजींनी आता ठेवणीतील वकीली भाषेचा साज विचारांना चढवला. ‘पुन्हा कंटेंप्ट ऑफ कोर्ट आहेच, अवर लिथल वेपन... हे लोक जास्त अंगावर आलेच तर घालू केसेस... चालतील वर्षानुवर्षे. साला माझा बाप काय भांडलेला तेव्हा १९५७ मध्ये. व्हॉटस युवर कॉंट्रिब्युशन इन बिल्डिंग धीस मॅगनिफिसंट कॉस्मोपॉलीटन हब, असा खडा सवाल आमच्या बापाने टाइम्समधून तमाम मराठी माणसांना विचारला होता. कोणीतरी अत्र्यांनी मराठा नावाच्या शॉव्हिनीस्ट पेपरमधून मराठीत त्यांच्यावर डिस्गस्टींग टीका केली होती म्हणतात, पण आम्हाला कोणाला  कशाला यायला हवे मराठी.... आम्ही असल्या शॉव्हिनिस्ट क्रीचर्सना अनुल्लेखानेच मारतो... पण कसचे काय, बॉंबे गेले ते गेलेच. पण आता... एकदम बदला घेतील साले. वेळीच संपादक महाशयांकडून अग्रलेख लिहून घेतला पाहिजे.. सबव्हर्जन ऑफ कॉस्मोपॉलिटन व्हायब्रन्सी बाय शॉव्हिनिस्ट थग्स’, ‘कॉस्मोपॉलिटन एलिटांसाठी’ रुस्तमजींनी मनातच मायना तयार केला. आयला पण हा फोन का उचलत नाहीये’. कंटाळून रुस्तमजींनी शेवटी घरची वाट धरली. रात्री झोपेत त्यांनी तमाम महाराष्ट्र व मुंबईवाद्यांवर ‘कंटेंपट ऑफ कोर्ट’ दाखल केला होता. ‘नोबेल समितीने’ भाषिक दहशतवादाचा हिकमतीने मुकाबला केल्याबद्दल ‘नोबेल शांतता पुरस्काराने’ त्यांचा गौरव केला होता. ‘वेक अप बॉंबे’ नावाचा चित्रपट स्वत:  रुस्तमजीच निर्माण करत होते... त्या खेळाला दस्तुरखुद्द दिल्लीच्या तख्तावरील भावी वारसदारांनी हजेरी लावली होती. सकाळ झाली ते रुस्तमजींना पेरिझाद बेबी त्यांच्या दंडाला हलवत ओरडत असल्यामुळे कळले, ‘डॅडी डॅडी... हे बघ... तुझा फ्रेंड पॉलिटीक्सला जॉईन झालाय’. डोळे चोळत रुस्तमनजींनी प्रख्यात इंग्रजी दैनिक पाहिले व त्यांच्या डोळ्यावरची झोपच उडाली. त्यांचा विख्यात बॉंबेवादी संपादक मित्र ‘मुंबई कोणाची’ वाल्यांबरोबर फोटोत हस्तांदोलन करत होता. त्याला त्या पक्षातर्फे राज्यसभेवर पाठवण्यात येण्याचे वृत्त होते. ‘रास्कल’ रुस्तमजींनी दातओठ खाल्ले. तिरीमिरीत त्यांनी नव्याने ‘मुंबईकर’ झालेल्या आपल्या जुन्या बॉंबेवादी मित्राला फोन लावला. ‘आपण फिरवलेला क्रमांक आवाका क्षेत्राच्या बाहेर आहे, कृपया थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा’, मोबाईलवरील बाई मराठीत दरवळली. चिडून रुस्तमजींनी पुन्हा पेपर वाचायला सुरुवात केली. एक हेडलाईन त्यांच्या नजरेवर येऊन आदळली, ‘मोबाईलमध्ये मराठी सक्तीचे नाहीतर’... रुस्तमजींचा पारा आता चांगलाच चढला होता. टेबलावरील वडीलांच्या  फोटोकडे रुस्तमजींची नजर गेली. ‘द फ्युचर ऑफ धीस सॅंक्टीमोनियस इन्स्ट्टिट्यूशन इज इन युवर हॅंड माय सन’, आपल्या परंपरेला जागण्याचे आवाहन त्यांच्या नजरेत रुस्तमजींनी वाचले. काळ बदलला व ‘मुंबईवाले’ सोकावले तर हायकोर्टाची इज्जत कशी वाचवायची याचा विचार करण्यासाठी रुस्तमजी पुन्हा डोळे मिटून रात्रीच्या स्वप्नाला आळवू लागले.             

राममोहन खानापूरकर....