बऱ्याच वेळा ...

             बऱ्याच वेळा


लपवून आसवांना,  हसतो बऱ्याच वेळा
मीही नको नको ते, करतो बऱ्याच वेळा


अंदाज याचसाठी, मी बांधणार नाही ...
अंदाज माणसाचा, चुकतो बऱ्याच वेळा

कुठल्या दिव्याप्रमाणे, माझा उजेड नाही 
आतून मी स्वत:च्या, जळतो बऱ्याच वेळा


लाऊ नकोस आता, हा मुखवटा पुन्हा तू
आतील चेहराही, दिसतो बऱ्याच वेळा

सोयी नुसार माझे, असणे हवे तुम्हाला
जाणून हेच मीही, नसतो बऱ्याच वेळा


सारेच सर्प कोठे, असतात जीवघेणे
माणूस जीवघेणा, असतो बऱ्याच वेळा


प्रत्येक वादळाला, ठेऊ नकोस नावे
नाजूक जोड अपुला, असतो बऱ्याच वेळा


पुतळ्यासमोर माझ्या, कोणी तरी प्रवासी .....
येतो बऱ्याच वेळा, रडतो बऱ्याच वेळा

                                     - यादगार


( पूर्वप्रसिध्दी - लोकप्रभा, एप्रिल २००२ )