टोपली

     राज्य शासनाच्या खेड-चिपळूण बसमध्ये बसलो. मागच्याच आसनावर जावे लागले. तेच ते.....लांबलचक आसन. सगळी 'शिटं' आधीच भरलेली होती. डावीकडील खिडकी पकडली.
     एक शिडशिडीत कोळीण (वयस्कर, हे नमूद.)आपल्या टोपलीसह चढली. माझ्याच आसनावर येऊन बसली. मी, माझ्याशेजारी दोघं, त्यानंतर ती. आसनाच्या मध्यभागी.
     तिच्या टोपलीतल्या वासाचा 'घमघमाट' सगळीकडे पसरला. रुमाल बाहेर आले. माना मागे वळल्या.
     वाहक तिकिटे फाडत फाडत मागे आला. त्याला टोपली दिसताच-
     "ए बाई, मी मागच्याच वेळेला तुला सांगितलं होतं. टोपली बसमध्ये आणायची नाही. माझ्या प्रवाशांना वासाचा त्रास होतो..."
     "आमाला प्रावेट गाडीत जागा न्हाय..."
     "ते मला माहीत नाही. मी पुन्हा सांगतो. टोपलीसकट आत चढायचं नाही. वर टाकायची. एकट्याने आत यायचं. परत दिसलीस तर अख्खी गाडी धुवून घेईन तुझ्याकडून."
    
     खटका उडाला. वाहक पुढे गेला.
     एकेकाची तोंडं उघडली.
    
     "तब्येत फार गरम दिसतीये..."
     "कंडक्टरला काय अधिकार आहे पण हे सांगायचा? गाडी काय त्याच्या मालकीची आहे का?"
     "गाडीत काय कोणीही काहीही आणू शकतो..."
     "अहो, ब्राम्हण आहे ना तो. त्याला कसा वास सहन होणार?"
     "ओ बाई, तुम्ही तरी टोपली कशाला आणता हो?"
     "सायझ जरा कमी करा की त्या टोपलीचा.."
     "कंडक्टरने आगारात सांगितले पाहिजे."
     "बाई, तुम्हीच जाऊन सांगा आगारात."
     "टोपली वर टाकायला पाहिजे होती.."
     "माशांचा वास सहन होत नाय..."

     बाई सरावलेली असावी. वाहकाला ती ओळखत होती. संबंध संवादात मोजक्या उत्तरांपलीकडे काही भाग घेतला नाही.
     शेजारचीला सांगून झालं, "ज्या मानसानं मला आमच्या घराजवळ टोपली उचलायला मदत केली तो बी बामनच व्हता. आमाला या गाडीशिवाय कोने? प्रावेट गाडीत जागा नाय....

     मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही त्याप्रमाणे तोंडात तंबाखू धरून ती पुसट बोलत, मधूनच हुंकार भरत थांबा येईपर्यंत निवांत बसून राहिली.
थांबा आल्यावर टोपली सरकवत सरकवत दारापाशी नेली व उतरून गेली. 

     अवघा पंचवीस-तीस मिनिटांचा प्रवास.
     लक्षात राहिलेला.
    

     दीपावलीच्या शुभेच्छा !