ऑक्टोबर २० २००९

लग्नाची गोष्ट

त्याच्या एकविसाव्या वाढदिवसाआधी एकदा
विशीची वेस पार केलेलं आमचं लग्न आलं समोर
आणि म्हणालं, 'माझं आता मतदानाचं वय झालं,
निवडणूका कधी घेताय बोला !
माझा येता वाढदिवस करु मतदानाचा दिवस.
मी एकटा मतदार, तुम्ही दोघे उमेदवार
फोडा नारळ आजच, सुरु करा प्रचार !'
मी सपत्नीक चपापलो, गोरामोरा होउन म्हणालो,
" आमचं आहे सहमतीचं राजकारण
मग निवडणूकीला रे काय कारण ?"
लग्न म्हणालं ' ते तुमच्या मतदारालाच ठरवू द्या,
बर्‍या बोलाने मला माझा हक्क बजावू द्या !...'
.......
प्रक्रिया सुरु झाली,  सभांना भरती आली
दोषारोप,घोषणा, आश्वासनं आणि वल्गना
मतदानाची गुप्तता लग्नाला ठाऊक होती
परिस्थिती त्यामुळेच जरा नाजूक होती...
लग्नाच्या वाढदिवसाला येणार बरेच प्रेक्षक,
शुभचिंतक आणि काही...राजकीय निरीक्षक
समारंभपूर्वक शोभा होण्याची दोघांना चिंता होती,
आचारसंहितेमुळे घरी निवडणूकपूर्व शांतता होती....
.......
प्रचार संपल्यावर आमची गुप्त सभा झाली
सल्लामसलतीतून एक योजना पुढे आली
अंतर्गत सुरक्षा आणि गृहशांतिच्या नावाखाली
आम्ही घरातच आणिबाणी जाहीर केली --
-- आणि सर्वप्रथम निवडणूकच रद्द झाली....
.......
बिचार्‍या आमच्या लग्नाचा
अंदाज जरा चुकला
आमच्याएवढा प्रजासत्ताकाचा
त्याला अभ्यास कुठला !

Post to Feed

कविता कळल्यासरखी वाटते ... पण
मीही कवींच्या प्रतिसादांची ......
मंडळी...
अर्थ समजल्यावर आवडली
वाढदिवस लग्नाचा आणि कवितेचा

Typing help hide