लक्ष्मीपूजन

आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो. लक्ष्मीपूजनाकरिता आपण घरातील सोन्याचे दागदागिने, जडजवाहिर, सोन्याचांदीचे जिन्नस व चांदीची नाणी एकत्र करुन, तीच लक्ष्मी आहे व संपत्ती देणारी देवता आहे अशा भावनेने तिची पूजा करतो. असेच लौकिकद्रुष्ट्या सर्वत्र लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाने पैसा, संपत्ती तसेच सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होते अशी आपली श्रद्धा असते.

लक्ष्मी ही संपतीची देवता आहे हे खरे आहे. तशीच ती नित्य विष्णूच्या सेवेत असते हे ही तितकेच खरे आहे. हरिप्रिया म्हणजे श्रीहरीला प्रिय अशी ती आहे. श्रीविष्णूला सोडून ती जात नाही. अशा परिस्थितीत दिवाळीच्या प्रसंगी लक्ष्मीपूजनाचे वेळी तिला आवाहन केल्यास ती एकटी येईल कां ? ती तर विष्णूच्या सेवेत गर्क आहे. श्रीविष्णू हा क्षीरसागरी शेषाच्या शय्येवर विराजमान असून हरीप्रिया लक्ष्मी ही त्याच्या सेवेत रममाण झालेली आहे. ती विष्णूला सोडून कशी येणार ?

श्रीविष्णूला श्रीमान असे म्हटले आहे म्हणजे श्री अर्थात लक्ष्मी, संपत्ती शोभा व सौंदर्य ज्याच्याजवळ नित्य आहे किंवा श्री म्हणजे लक्ष्मीदेवता पत्नीरुपाने ज्याच्याजवळ असते असा महविष्णु. विष्णूला माधव असेही म्हणतात. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती अर्थात लक्ष्मीचा पती. म्हणूनच त्याला श्रीपती असेही म्हणतात. विष्णूचे असे स्वरुप पाहता लक्ष्मी विष्णूला सोडून एकटी कशी येणार ? म्हणूनच लक्ष्मीपूजनाचे प्रसंगी लक्ष्मीनारायण या दांपत्यास आदराने बोलावले पाहिजे.

तुम्हाला लक्ष्मी, संपत्ती वैभव पाहिजे ना? मग लक्ष्मीपूजनाचे दिवशी श्रीविष्णूना आवाहन करून त्यांची यथासांग पूजा करा. तो महाविष्णू भक्तवत्सल आहे. हाकेसरशी धावून येतो असा त्याचा लौकिक आहे. श्री विष्णूंचे आगमन झाले की त्यांचेबरोबर महालक्ष्मी येणारच यात शंका नाही कारण ती नित्य विष्णूसमवेत छायेसारखी वावरत असते. अशा लक्ष्मीचा आदर करा. ती देवता आहे. तिला बँकेच्या लॉकर मध्ये बंदिस्त करुन तिचा कोंडमारा करू नका.

तेव्हा लक्ष्मीप्राप्तीकरिता लक्ष्मीपूजनाचे दिवशी महाविष्णूला प्रथम आवाहन करून त्याची पूजा करा. त्याचे स्तवन करा. विष्णुसहस्रनामाचा पाठ करा म्हणजे लक्ष्मीदेवतानक्कीच प्रसन्न होईल. करण कोणत्या पतिव्रतेला आपल्या प्राणप्रिय पतीचा गौरव आवडणार नाही ? अहो, एक बाब विसरलीच. लक्ष्मी हे सुद्धा प्रत्यक्ष विष्णूचे दुसरे नाव आहे. संपत्तीची अधिदेवता असलेली लक्ष्मी ही ज्याचे स्वरुप आहे असा महाविष्णू आहे असे विष्णुसहस्त्रनामात आहे ( श्रीविष्णूचे ९४३ वे नाव) अतएव विष्णूची पूजा म्हणजेच लक्ष्मीपूजन.

एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. महाविष्णू हा पांचजन्य नावाचा शंख धारण करणारा आहे. श्रीविष्णूच्या पूजेला शंखाची आवश्यकता असते. शंखाशिवाय विष्णूची पूजाच होऊ शकत नाही. यास्तव प्रथम शंखमहाराजांना बोलवणे पाठवा आणि मगच लक्ष्मीनारायणाला.

लक्ष्मीपूजनाचे दिवशी खऱ्या अर्थाने महालक्ष्मीस्वरुपी विष्णूची पूजा श्रद्धेने भावनेने आणि शुद्ध अन्तःकरणाने करून ऐहिक तशीच मानसिक श्रीमंती मिळवावी, हाच या लेखाचा मतितार्थ.

_नारायण भु. भालेराव.